आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवणी रेल्वेस्थानकाचे उत्पन्न एक कोटी १० लाख रुपयांपर्यंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- शिवणी-शिवापूररेल्वेस्थानकाचे उत्पन्न महिन्यापोटी कोटी १० लाख रुपयांच्या दरम्यान आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रेल्वेस्थानकाचे उत्पन्न असताना मात्र उत्पन्नाच्या तुलनेत येथे सुविधांची बोंब आहे. या रेल्वेस्थानकाला अकोला उपरेल्वेस्थानकाचा दर्जा मिळाल्यास अनेक समस्या सुटण्यास मदत होणार आहे प्रवासी संख्या वाढणार आहे. त्यादृष्टीने रेल्वेस्थानकाला उपरेल्वेस्थानकाच्या दर्जाची आवश्यकता आहे.

नांदेड मराठवाड्याकडे ये-जा करणाऱ्यांसाठी शिवणी-शिवापूर रेल्वेस्थानक महत्त्वाचे उपरेल्वेस्थानक ठरू शकते. मात्र, मूलभूत सुविधेअभावी या रेल्वेस्थानकावरून प्रवाशांचे आवागमन होत नसल्यामुळे हे रेल्वेस्थानक प्रवाशांसाठी नाहीच, असे चित्र प्रत्यक्षदर्शी दिसून येत आहे. रेल्वेस्थानकावरून एमआयडीसीमधील उत्पादित मालाची निर्यात, कच्च्या मालाची आयात होत आहे. त्यामुळे ट्रान्सपोर्टिंगसाठीच हे रेल्वेस्थानक आहे की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. शहरातील निम्म्या प्रवाशांसाठी हे रेल्वेस्थानक महत्त्वाचे आहे. मात्र, या रेल्वेस्थानकावर मूलभूत सुविधांची वानवा असल्यामुळे हे रेल्वेस्थानक अडगळीत पडलेले आहे. त्यावर अकोलेकरांचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. आता या रेल्वेस्थानकाला अकोला उपरेल्वेस्थानकाचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी शिवणी-शिवापूर उपरेल्वेस्थानक कृती समितीने कंबर कसली असून, त्या िदशेने प्रयत्न सुरू आहेत. कृती समितीने आतापर्यंत रेल्वे प्रबंधक, रस्ता दुरुस्तीसाठी एमआयडीसी प्रशासन, खासदार संजय धोत्रे यांच्यासोबत चर्चा केली असून, त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

प्रत्येक रेल्वेस्थानकावर दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची सुविधा असते. मात्र, या रेल्वेस्थानकावर पार्किंगची सुविधा नाही. रेल्वेस्थानकावरील कर्मचारी, येथून ये-जा करणाऱ्या नियमित प्रवाशांना त्यांची वाहने ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पार्किंगचे टेंडर काढण्याची आवश्यकता आहे.

ज्या रेल्वेस्थानकावर जिने आहेत त्यांना लिफ्ट बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या रेल्वेस्थानकावरील तीन आणि चार नंबरच्या फलाटावर जाण्यासाठी जिनाच नाही. फलाट क्रमांक एकच्या प्रवाशाला चार नंबरवर जाण्यासाठी दोन नंबर फलाटावरून रेल्वे रूळ ओलांडून जावे लागते.

साधे चहाचे दुकानही नाही
रेल्वेस्थानकावर हमालांची संख्या पाचशेच्यावर आहे. त्यात रेल्वेस्थानकावरील कर्मचाऱ्यांची संख्या वेगळीच आहे. या रेल्वेस्थानकावर रेल्वेस्थानकाच्या मापदंडानुसार कॅन्टीन असणे आवश्यक आहे. मात्र, रेल्वेस्थानक परिसरात सरकारीच नाही तर खासगी कॅन्टीनही नाही.