अकोला- महिलांचे बनावट अकाउंट उघडायचे त्यावर त्या महिलांच्या मैत्रिणीलाच अश्लील मेसेज पाठवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या युवकाला चांगलाच चोप देऊन त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. असा प्रकार कोणत्याही महिलेसोबत होऊ शकतो, म्हणून अशा घटनांपासून महिलांनी सावध होण्याची वेळ आली आहे.
अमोल उर्फ पिंटू खराबे,असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. तो विवाहित असून, उमरी येथे राहतो. शहरातील एका जणाकडे हा युवक पाच वर्षांपूर्वी प्लम्बर म्हणून काम करत असे. त्याने त्यांच्या पत्नीच्या नावाने १५ ऑगस्टला बनावट
फेसबुक अकाउंट उघडले. त्यानंतर काही महिलांसोबत त्याने चॅटिंग केले. बनावट अकाउंट उघडून हा
आपला नवीन नंबर असल्याचे दाखवून अमोलने एक मोबाइल क्रमांकही त्यांच्या नावे फेसबुकवर टाकला.
अकाउंट उघडल्यानंतर संबंधित महिलेच्या परिचयातील व्यक्ती, मैत्रिणी यांनी त्या नंबरवर चॅटिंग सुरू केले. रात्री उशिरानंतर या नंबरहून अश्लील चॅटिंग करण्यात येत असल्यामुळे ती महिला अशा प्रकारचे मेसेज कशा पाठवू शकतात, अशी शंका त्यांच्या काही मैत्रिणींना आली. त्यांनी प्रत्यक्ष कॉल करून विचारले असता, आपले फेसबुक अकाउंटच नसल्याचा खुलासा त्यांनी केला. आपल्या नावाचा गैरवापर कुणी करत असल्याचे लक्षात आल्यानंतर ते दाम्पत्य आणि त्यांचे मित्र यांनी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांना सर्व प्रकार सांगितला. या मोबाइलचे लोकेशन पोलिसांनी घेतल्यानंतर सिमकार्ड हे हिंगणा तामसवाडी येथील असल्याचे समोर आले. पण, आम्ही हे सिमकार्ड वापरतच नसल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर या नंबरवर कॉल करून मोठ्या शिताफीने अमोल याला पकडले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करून पोलिसांनी अमोल खराबे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस तपासात या युवकाकडे १० ते १२ सिमकार्ड आढळले आहे. पोलिस अधिक तपास करत आहे.
महिलेच्या मैत्रिणींना अश्लील मेसेज
बनावटमोबाइल नंबर मिळवायचा आणि चांगल्या घरच्या महिलेला शोधणे. त्यांच्या मैत्रिणीची यादी बनवणे आणि त्यानंतर त्याच महिलेचा हा नवीन नंबर आहे, असा मेसेज महिलेच्या मैत्रिणींना पाठवून त्यांच्या नावाने चॅटिंग करणे, त्याही पुढे जाऊन त्यांना अश्लील मेसेज पाठवून ब्लॅकमेल करण्याचा अमोल उद्योग करत असल्याचे समोर आले.