आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडीलांची तेरवी करता शाळेला २५ हजार रुपयांची आर्थिक मदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - आपल्या जुन्या रुढी, परंपरा यात काळानुरूप बदल होण्याची गरज आहे, हे नुसते भाषणात म्हणता सोनाग्रे कुटूंबियांनी कृतीतून करून दाखवले आहे. खडकी बुद्रूक येथील राजेश महेश सोनाग्रे यांनी वडिल स्व. श्रीकृष्ण सोनाग्रे गुरूजी यांच्या निधनानंतर त्यांच्या तेरवीवर होणाऱ्या अनाठायी खर्चाला फाटा देत, वडिलांनी सेवा दिलेल्या जिल्हा परिषद शाळेला डिजीटल क्लासरूम साठी २५ हजार रुपयांचा धनादेश दिला. 

खडकी बुद्रूक येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्रीकृष्ण सोनाग्रे गुरूजी यांचे जुलै महिन्यात निधन झाले. सोनाग्रे गुरूजी यांना शिक्षणाची आवड होती. त्यांनी स्वत:चे संपूर्ण जीवन ज्ञानदानासाठी वाहिले होते. वडिलांनी शिक्षण क्षेत्रात काम करताना एकदाही वैद्यकिय रजा घेतली नाही. शाळा विद्यार्थी यांचे नाते मनापासून जपले शिक्षण क्षेत्रात आदर्श शिक्षक म्हणून नावलौकीक मिळवला. ज्ञानदानासाठी आयुष्य वाहणाऱ्या वडिलांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहावी यासाठी तेरवीवर अनाठायी खर्च करण्यापेक्षा त्यांनी शेवटची १० वर्ष सेवा दिली अशा शाळेला डिजीटल क्लासरूम साठी सहाय्य करण्याचा निर्णय त्यांच्या कुटूंबियांनी घेतला. त्यानुसार स्व. सोनाग्रे गुरूजी यांच्या पत्नी राधाबाई सोनाग्रे यांच्या हस्ते २५ हजार रुपयांचा धनादेश शाळेचे मुख्याध्यापक विजय भोरे यांना सुपूर्द करण्यात आला. 

तसेच या वेळी त्यांच्या पत्नी राधाबाई सोनाग्रे यांच्या हस्ते सोनाग्रे गुरूजींच्या नावाने शाळेच्या परिसरात वृक्षाचे रोप लावण्यात आले. या वेळी त्यांचा मुलगा राजेश सोनाग्रे, महेश सोनाग्रे, मुलगी जयश्री सुरोशे, शाळा शिक्षण समितीचे अध्यक्ष राजेश काळे, गोविंद नवलकार, संजय सोनाग्रे, संजय अडकणे, दर्यापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक साहेबराव भदे, रूपाली सोनाग्रे, दर्शना सोनाग्रे, सुनिल सुरोशे, संतोष सोनाग्रे, प्रफुल्ल भदे, अनंता सोनाग्रे, सुजय सुरोशे, आवारे, राऊत, कांबळे, खडसे, मोरे, नालींदे, अग्रवाल यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 

 
बातम्या आणखी आहेत...