आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅलीतील नारेबाजीमुळे दगडफेक, जाळपोळ, पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांसह १७ जण जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भडका, मलकापूर येथे समाजकंटकांनी पेटवलेले दुकान. - Divya Marathi
भडका, मलकापूर येथे समाजकंटकांनी पेटवलेले दुकान.
मलकापूर - हजरत मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त परवानगी घेता निघालेल्या मोटार सायकल रॅलीत आक्षेपार्ह नारेबाजी केल्यामुळे आज सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास मलकापूर येथील सालीपुऱ्यात तणाव निर्माण झाला होता. यानंतर शहरात विविध ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. तर सकाळी घडलेल्या या घटनेचे पडसाद उमटत दुपारी दुकान गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणतांना पोलिसांनी अश्रु धुराचा वापर करत हवेत गोळीबार केला. दरम्यान दंगलग्रस्तांनी केलेल्या दगडफेकीत १० पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह तर इतर असे एकूण १७ जण जखमी झाले आहेत.
आज मलकापूर शहरात सकाळी निघालेल्या मिरवणुकीत एका विशिष्ट समाजातील तरुणांनी जुन्या गावात देशविरोधी नारेबाजी केली. तर सालीपुऱ्यातील ग्रामीण पोलिस स्टेशनवर दगडफेक करण्यात आली. प्रत्युत्तर म्हणून दुसरीकडूनही दगडफेक करण्यात आली. दरम्यान ११ वाजता बारादरी दुर्गानगर भागात, तसेच संचेती गल्लीतही दगडफेक झाली. दुपारी १२ वाजताच्या सुमारास नळगंगा नदीवरील रेल्वे पुलावरून दगडफेक करत शिवाजीनगर परिसरातही दगडफेक करण्यात आली. मात्र प्रत्युत्तर मिळत असल्याने दगडफेक करणाऱ्यांनी काढता पाय घेतला. या घटनांची माहिती कळताच गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. तर या घटनेवेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असताना नवनिर्वाचित नगराध्यक्ष अॅड.हरीष रावळ तसेच आ.चैनसुख संचेती यांचेवर दगडफेक झाल्याने ते दोघेही जखमी झाले.

जखमींची नावे : उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र सोळंके, एपीआय प्रकाश झांबरे, एएसआय प्रमोद राऊत, पोकाँ प्रदीप जाधव, जितेश सुशीर, साहेबराव सोनोने, सचिन सदाफुले, हिरा रहेमान पसुवाले, मोहन हिवाळे, सचिन जाधव आदी पोलिसांसह लखन माहोरकर, गौरव रामा पाटील, पुरुषोत्तम पाटील, संदीप भंसाली, दिलीप भास्कर सनिसे, शेख रहीम शेख गफुर आदींसह अनेकजण जखमी झाले.बुलडाणा येथे शेख असिफ शेख बिस्मिल्ला वय १६ शेख साजीक शेख रफीक वय १५ या दोघांनाही जखमी अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा येथे हलविण्यात आले होते. मात्र, गंभीर अवस्थेत त्यांना अकोला येथे हलविण्यात आले आहे.
मागीलवर्षीही घडला होता प्रकार: दरवर्षीमलकापुरात हजरत महम्मद पैगंबर यांच्या जयंती उत्सव साजरा करण्यात येतो. या मध्ये सकाळी मोटार सायकल रॅली दुपारी जयंती मिरवणूक काढण्यात येते. या करता प्रशासनाची परवानगीही देण्यात येते. मात्र, आयोजकांमध्ये एकसूत्रता नसल्याने मागील वर्षीही रॅली दरम्यान दगडफेकीचा प्रकार घडला होता. त्याची पुनरावृत्ती या वेळी झाली.

अनधिकृत रॅलीतील मुलांची दगडफेक : मलकापूर शहरात माजी नगराध्यक्ष रशीदखाँ जमादार यांचे नेतृत्वातील रॅलीला परवानगी होती. त्यांनी चार ते पाच हजार मुस्लीम बांधवांची काढलेली मिरवणूक शांततेत पार पडली. परंतु, इतर भागातील एका समुदायाच्या काही मुलांनी काढलेली मोटार सायकलची अनधिकृत मिरवणूक मिश्र वस्ती असलेल्या बारादरी, सालीपुरा भागातून काढण्यात आली. या वेळी आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांनी रॅलीतील वाहने थांबविण्याचा प्रयत्न केला असता रॅलीतील मुलांनी दगडफेक केली. या मध्ये आठ ते दहा पोलिस जखमी झाले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिस प्रशासनाचे वतीने देण्यात आली.
दुपारनंतर घडले जाळपोळीचे सत्र
दुपारनंतर बुलडाणा रोडवरील विश्रामगृहा नजीकची दुकाने, बस स्थानक परिसरातील टायरची दुकाने, या खेरीज दुचाक्या, चारचाक्या पेटवून जाळपोळ तोडफोड करण्यात आली. पोलिस घटना स्थळावर पोहचल्यानंतर प्रकरण आटोक्यात आले. विशेष म्हणजे, शहरात कुठलीही अघटित घटना घडू नये. म्हणून पोलिस प्रशासनाने एका दिवसापूर्वीच राज्य राखीव दलाचे एक पथक तैनात केले होते. या पथकात १०० पोलिस असून, इतरही बंदोबस्त तगडा लावण्यात आला आहे.

शांतता राखावी
-मलकापूर शहरामध्ये घडलेली ही घटना निश्चितच योग्य नसून, मलकापूरची शांतता भंग झाली आहे. तेव्हा नागरिकांनी शांतता राखून प्रशासनास सहकार्य करावे.’’
अॅड.हरीश रावळ, नवनिर्वाचित नगराध्यक्ष, मलकापूर.

हा सामान्यांना त्रास
-राजकीय अपयशानंतर समाजात तेढ निर्माण करण्यासाठी जातीयवाद्यांनी विशिष्ट लोकांना हाताशी धरून घडवून आणलेला प्रकार आहे. त्याचा निषेध अाहे. मात्र या घटनेपासून सामान्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल दु:ख आहे.’’
हर्षवर्धनसपकाळ, आमदार बुलडाणा.

परवानगी देणारे दोषी
-मागीलवर्षीचाअनुभव पाहता रॅलीची परवानगी देऊ नये. अशा सूचना आम्ही दिल्या होत्या. मात्र, प्रशासनाला शहराची शांतता कायम राखण्यात साफ अपयश आले आहे. रॅलीस परवानगी मिळवून देणारे जबाबदार आहेत.’’
चैनसुखसंचेती, आमदार, मलकापूर

हा षडयंत्राचा प्रकार
-राजकीय पार्श्वभूमी पाहता एमआयएमसारख्या जातीयवादी संघटनांना हाताशी धरून त्यांना पैसा वेगळी रसद पुरवणाऱ्यांचेच षडयंत्र ही घटना आहे. त्याचा आम्ही निषेध करतो.''
आ.राहुल बोंद्रे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.
बातम्या आणखी आहेत...