आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीरगती : वाढदिवस करु इच्छिणाऱ्या माता-पित्यांवर आली कलेवर नेण्याची वेळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जवान सुमेध गवईंची प्रतिमा जवळ घेतलेल्या त्यांच्या शोकाकूल आईसह आप्त,महिला. - Divya Marathi
जवान सुमेध गवईंची प्रतिमा जवळ घेतलेल्या त्यांच्या शोकाकूल आईसह आप्त,महिला.
अकोला - अत्यंत मन मिळाऊ आणि सदैव हसतमुख राहणारा सुमेध गवई आगामी पंधरा दिवसात त्याच्या लोणाग्रा या मूळ गावी येणार होता. एक ऑगस्ट ही त्याची जन्मतारीख असल्याने याच भेटीत त्याचा वाढदिवस साजरा करू, असा कुटुंबीय मित्रमंडळीचा बेतही होता. परंतु काश्मीरमधील शोपियान येथे दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत शनिवारी त्यांना वीरगती प्राप्त झाली. त्यामुळे वाढदिवस साजरा करु इच्छिणाऱ्या हातांवरच आता त्याचे कलेवर उचलण्याची दुर्दैवी वेळ ओढवली आहे. 
 
जिल्हा प्रशासनाने पुरविलेल्या माहितीनुसार सुमेधचे पार्थिव जम्मू-काश्मीर येथून आज सायंकाळीच दिल्लीला पोहोचले आहे. सैन्यदलाच्या विशेष विमानाने उशीरा रात्री ते नागपूरच्या विमानतळावर पोहोचेल. त्यानंतर उद्या, सोमवारी सकाळी हेलीकॉप्टरने अकोला विमानतळावर आणल्यानंतर पुढचा प्रवास सैन्यदलाच्या विशेष वाहनाने सुरु होईल. अधिकाऱ्यांच्या मते सुमेधचे पार्थिव सकाळी ११ वाजताच्या सुमारास त्याच्या गावात पोहोचेल. 
 
सुमेधच्या शहीद होण्याची माहिती सैन्य अधिकाऱ्यांमार्फत आज सकाळी सर्वप्रथम त्याच्या वडिलांना फोनद्वारे देण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, आमदार बळीराम सिरस्कार, जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी एसडीओ संजय खडसे, तहसीलदार राजेश्वर हांडे, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकांत सागर आदी अधिकारी-पदाधिकाऱ्यांनीही त्याच्या घरी पोहचून आई-वडिलांचे सांत्वन केले. 
 
बारावी उत्तीर्ण सुमेध गवई २७ वर्षांचा होता. वयाच्या २२ व्या वर्षी तो सैन्यात दाखल झाला. देशाच्या तीन-चार राज्यात कामगिरी बजावण्याची त्याला संधी मिळाली, अशी कौटुंबीक सूत्रांची माहिती आहे. दरम्यान त्याच मार्गावर जायचा प्रयत्न करणारा शुभमही काही काळ आधी सैन्यात दाखल झाला. तो सध्या मध्य प्रदेशातील सागर येथे प्रशिक्षण घेतो आहे. महाविद्यालयीन शिक्षणासाठी सुमेधने कला शाखेची निवड केली होती. तर सैन्यात जाण्यापूर्वी त्याचा भाऊ शुभम वाणिज्य शाखेत शिकत होता. दोघेही अविवाहित आहेत. 
 
दरम्यान सुमेधच्या अंत्यसंस्कारासाठी लोणाग्राच्या मोक्षधाममध्ये संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. अकोल्याचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार राजेश्वर हांडे यांनी ही तयारी करवून घेतली आहे. तेथील काटेरी झुडपे तोडण्यात आली असून त्याभागातील खड्डे बुजवण्यात आले आहे. उर्वरित.पान ४. 
 
गावातील जण सैन्यात 
या गावातील सहा व्यक्ती सैन्यात अाहेत. त्यामुळे बहुतेक कुटुंबांमध्ये सैन्याबद्दल आदर असून, त्यांना मिल्ट्रीची तोंडओळख आहे. सैन्यात दाखल असलेल्या तरुणांमध्ये दिनेश नवले, मिलींद डोंगरे, सुमेध गवई, त्याचा भाऊ शुभम गवई, काका मंगेश गवई सूरज तिवारी या सहा तरुणांचा समावेश आहे. यापैकी सुमेध गवईला शनिवारी वीरगती प्राप्त झाली. 
 
घरी अगदी सहज राहायचा तो 
सुमेधचाशालेय शिक्षणाच्या काळातील मित्र जानराव डिके म्हणाला, सुमेध अगदी सहज राहायचा. गावात आल्यानंतर आम्ही (सर्व मित्र) त्याला म्हणायचो.. तू तर मेजर आहेस. तुला कशाला हवे घरच्या जनावरांचे शेण-पाणी काढणे, शेतातील निंदण-खुरपण करणे, उगाच दाढी वाढवणे. पण तो म्हणायचा... अरे मेजर म्हणून तर मी तिकडे सुटा-बुटात असतोच. घरी आल्यानंतर किमान तुमच्यासारखं जगू द्या....त्याच्या या संवादाला आमचे मित्रमंडळ आता कायमचे मुकले आहे. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, वडील शेतकरी, आई गृहीणी... 
बातम्या आणखी आहेत...