आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ‘स्वाधार’चा आधार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जागा उपलब्ध नाही म्हणून वसतिगृह प्रवेशापासून वंचित राहणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना यापुढे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळवता येणार आहे. त्याबाबतचा जीआर समाज कल्याण विभागाच्या स्थानिक सहायक आयुक्त कार्यालयात पोहोचला असून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. ही योजना दहावीनंतरचे महाविद्यालयीन उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी आहे. 

या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४११ विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असून त्यासाठीचे अर्ज आगामी १६ मार्चपर्यंत मागवण्यात आले आहेत. बाहेर गावांहून शिकण्यासाठी अकोला जिल्ह्यात दाखल झाले, परंतु अर्ज करुनही शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांची संख्या भरपूर आहे. या विद्यार्थ्यांना ‘स्वाधार’चा लाभ मिळवता येणार आहे. निवड झाल्यानंतर यातील प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षी ४३ हजार रुपये दिले जाणार असून त्यातील पहिल्या तिमाहीची रक्कम अग्रिम राहणार आहे. याशिवाय वैद्यकीय अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी हजार तर इतर शाखेच्या विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी हजार रुपये दिले जाणार आहे. 

मागासवर्गीय संवर्गातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी त्यांना दहावी आणि बारावीच्या परीक्षेत ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेले असणे आवश्यक असून त्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक नसणे अनिवार्य आहे. याबाबतचा जीआर पोहोचला असून अंमलबजावणी सुरू झाली. 

दिव्यांगांना सूट 
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत ६० टक्के गुणांची अट असली तरी दिव्यांगांना १० टक्क्यांची सूट देण्यात आली आहे. दहावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या किंवा बारावीनंतर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना ५० टक्के गुण असले तरी पात्र ठरतील. 

असे आहे वास्तव 
राज्यात दरवर्षी ६० हजार वद्यार्थी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करतात. परंतु वसतिगृहांची क्षमता ३० हजार असल्यामुळे तेवढेच विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात. त्यामुळेच शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली आहे. वंचित विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकेल. 
 
बातम्या आणखी आहेत...