आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलाठी कार्यालयांना टाळे, सिंदखेडराजा तलाठ्यांनी कार्यालयाच्या चाव्या दिल्या तहसीलदारांकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंदखेडराजा- तलाठी सांजाची पुनर्रचना करून सातबारा संगणकीकरण, फेरफारमधील येणाऱ्या अडचणी सोडवण्यात याव्यात, यासह इतर मागण्यांसाठी काळया फिती, निदर्शने धरणे आंदोलन केले होते. परंतु अद्याप शासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे तलाठी मंडळ अधिकारी संघटनेच्या वतीने मंगळवार, २६ एप्रिलपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसण्यात आले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील ६२० तलाठी मंडळ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. या आंदोलनामुळे महसूलची कामे प्रभावित झाली असून, जिल्ह्यातीत सर्वच तलाठी कार्यालये बंद आहेत. या बंद आंदोलनाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

प्रशासन अधिक गतिमान करण्याच्या हेतूने शासनाने डिसेंबरपासून सर्व तलाठी कार्यालयांचा कारभार ऑनलाइन केला आहे. त्यामुळे लिखित सातबारे, फेरफार आदी कागदपत्रे मिळणे बंद झाले. परंतु कधीकधी ऑनलाइन प्रणालीमध्ये खराबी येत असल्याने शेतकऱ्यांना वेळेवर सातबारे इतर कागदपत्रे मिळत नाहीत. त्यामुळे तलाठी ग्रामस्थांमध्ये वादाच्या घटना घडत आहेत. सातबारा फेरफारमधील अडचणी दूर कराव्या, यासह इतर मागण्यांसाठी ११ एप्रिल रोजी काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले. त्यानंतर १६ एप्रिल रोजी दुपारी सुटीच्या सत्रात निदर्शने करण्यात आली, तर २० एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, याच दिवशी संघटनेचे पदाधिकारी महसूल सचिवाची बैठक झाली. परंतु या बैठकीत मागण्यांसंदर्भात कुठलाच ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे तलाठी सांजाची पुनर्रचना करून सातबारा संगणकीकरण फेरफारमधील येणाऱ्या अडचणी सोडवण्यासह इतर मागण्यांसाठी तलाठी मंडळ अधिकारी संघटनेने आजपासून बेमुदत संप पुकारला आहे.
जिल्ह्यातील शेकडो तलाठ्यांनी आपापली कार्यालये बंद ठेवली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील महसुलीची कामे ठप्प पडली आहे. पीक कर्जासाठी अनेक शेतकरी तलाठी कार्यालयात जात आहेत. परंतु बंद आंदोलनामुळे कार्यालय बंद असल्याने त्यांना आल्यापावली परत यावे लागत आहे. त्यातच ३० एप्रिलपर्यंत कर्जाच्या पुनर्गठनासाठी शेतकऱ्यांना सातबाऱ्यासह इतर कागदपत्रांची आवश्यकता आहे. परंतु वेळेवर कागदपत्र मिळणार नसल्याने शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

तोडगा निघाल्यास संप मागे घेण्यात येईल
विविध मागण्यांसाठीतलाठी मंडळ अधिकारी संघटनेने मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. दरम्यान, शासनाने पुन्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मागण्यासंदर्भात तोडगा निघाल्यास संप मागे घेण्यात येईल, अन्यथा बेमुदत संप करण्यात येईल. रमाकांत मोकोने, जिल्हासचिव, तलाठी मंडळ अधिकारी संघटना.