आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याच्या उपशामुळे ‘पूर्णा माय’ आताच मोजतेय शेवटच्या घटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डिसेंबर महिन्यातच पूर्णा नदीचे असे डबक्यात रुपांतर झाले आहे - Divya Marathi
डिसेंबर महिन्यातच पूर्णा नदीचे असे डबक्यात रुपांतर झाले आहे
नांदुरा - जिल्ह्यातून सर्वात मोठी नदी म्हणून ओळख असलेल्या पूर्णा मायच्या पात्रातून अनेक शेतकरी पाण्याचा अवैध उपसा करून सिंचन करीत आहेत. त्यामुळे एैन हिवाळ्यात पूर्णा माय शेवटच्या घटका मोजत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास नदी काठावरील अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत. अवैधरित्या पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
पूर्णा काठ परिसरातील लाखो नागरिकांसह हजारो जनावरांची तहान भागवणारी पूर्णा माय पाणी उपशामुळे संकटात सापडली आहे. याच नदीवर जिल्ह्यातून सर्वात मोठा जिगाव प्रकल्प उभारण्यात येत आहे. या नदी शेजारी असलेल्या विहिरीवरून भोनगाव, आस्वंद, खिरोळा, कुंदेगाव भोन गावाला पाणी पुरवठा करण्यात येत आहे. परंतु मागील काही दिवसापासून या नदी पात्रातून परिसरातील अनेक शेतकरी अवैधरित्या पाण्याचा उपसा करून सिंचन करीत आहेत. जवळपास या नदी पात्रात शंभरहून अधिक शेतकऱ्यांनी मोटारी बसवल्या आहेत. त्यामुळे या नदी पात्रातून दररोज लाखो लिटर पाण्याचा उपसा होत आहे. त्यामुळे मागील महिन्यात खळखळा वाहणाऱ्या पूर्णा मायचे अाताच डबक्यात रुपांतर झाले आहे. असाच पाण्याचा उपसा राहिल्यास काही दिवसातच पूर्णा नदी कोरडी ठाक पडणार आहे. त्यामुळे भविष्यात नदी काठावरील अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. विशेष म्हणजे नदी काठावरील अनेक जनावरे या नदी पात्रातून पाणी पिऊन आपली तहान भागवित आहेत. परंतु येत्या काळात त्यांनाही पाणी टंचाईची झळ सहन करावी लागणार आहे. भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेवून नदी पात्रातून अवैध पाण्याचा उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

पाण्याचा उपसा बंद करण्यात यावा
-पूर्णानदीपात्रातून अनेक शेतकरी अवैधरित्या पाण्याचा उपसा करीत आहेत. त्यामुळे ऐन हिवाळ्यात नदीचे डबक्यात रुपांतर झाले आहे. भविष्यात पाणीटंचाई निर्माण होवू नये, यासाठी नदी पात्रातील पाण्याचा उपसा तातडीने बंद करण्यात यावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल. कुसुमशेळके, सरपंच भोनगाव
बातम्या आणखी आहेत...