आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटनस्थळांची भरमार, सुविधांची मारामार, पर्यटन बस सुरू करण्याची पर्यटकांची एकमुखी मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मातृतीर्थ,सिंदखेड राजा - Divya Marathi
मातृतीर्थ,सिंदखेड राजा
धाड - जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटनाला वाव असूनही एमटीडीसी एसटी महामंडळाच्या उदासीन धोरणांमुळे पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी बसची सुविधाच उपलब्ध नाही. त्यामुळे पर्यटकांना आर्थिक झळ साेसून खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असल्याने याचा परिणाम जिल्ह्याच्या पर्यटन विकासावर होत आहे. पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्ह्यात एक तरी पर्यटन बस सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.
जिल्ह्याला पर्यटनात नैसर्गिक, धार्मिक भौगोलिकदृष्ट्या महत्व आहे. राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थळ सिंदखेडराजा, जगविख्यात लोणार सरोवर, संत गजानन महाराजांचे संस्थान शेगाव, वारी हनुमान नांदुरा येथील १०५ फुटांची हनुमान मूर्ती आदी पर्यटनस्थळांमुळे जिल्ह्याला वेगळ महत्व प्राप्त झाले आहे. यासह जिल्ह्याभरात सर्वधर्मीय तीर्थ क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे सैलानीबाबा संस्थान, जाळीचा देव संस्थान, पिंपळगाव देवी संस्था, मोताळा तालुक्यातील तारापूरची अंबादेवी संस्थान, चिखलीची रेणुका देवी संस्थान, सुपो पळशी येथील सुपो महाराज संस्थान या ठिकाणी वर्षाला भरणाऱ्या यात्रासह दररोज भाविक भक्त पर्यटकांची रेलचेल असते. यात्रा दरम्यान परिवहन महामंडळ लाखो रुपयांची कमाई करते. त्यावेळी यात्रेसाठी जिल्ह्याच्या ठिकाणाहुन यात्रा स्पेशल बसेस मोठ्या प्रमाणात सोडण्यात येतात. परंतु या सर्व पर्यटन स्थळांना पर्यटक भाविक भक्त दररोज मोठ्या संख्येने भेटी देत असतात. त्यांच्यासाठी परिवहन महामंडळाकडून जिल्ह्याच्या ठिकाणवरुन संपूर्ण पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी कोणतीच बस सेवा उपलब्ध नाही. महामंडळाने इतर जिल्ह्यांसारखी पर्यटन बस सुरु केल्यास त्याचा मोठा आर्थिक लाभ महामंडळाला होईल. त्याच प्रमाणे पर्यटकांना सोयीचे आर्थिक लाभाचे ठरु शकते. यामुळे पर्यटकांचा ओघ जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे ओढता येईल. पर्यटन विकासासाठी ही बाब फायद्याची ठरणारी असून परंतु या सर्व बाबींकडे राजकीय, शासकीय दुर्लक्षामुळे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास रखडला आहे. तसेच अलिकडे पर्यटनाचा चालना देण्यासाठी शासनाकडून जाहिराती ह्या बसेसवरच दिल्या जातात. परंतु पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी बसेसची व्यवस्था नाही. त्यामुळे पर्यटन विकासासाठी पर्यटन बस नवसंजीवनी ठरु शकते.

पर्यटन बसमुळे त्रास सर्वांचा होईल कमी
-जिल्ह्यातील सर्वच पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी एकच बसची व्यवस्था झाली. तर परिवारासह जिल्ह्यातील बहुतेक पर्यटन स्थळांना भेटी देणे सोयीचे सोपे होईल. वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेटण्यासाठी वेळोवेळो बसेस बदलण्याचा शारिरीक मानसिक त्रास कमी होईल. याच प्रमाणे खासगी वाहनांच्या वापराचा धोकाही कमी होईल.
अविनाशकाळे, पर्यटक, बुलडाणा.

भविष्यात पर्यटन बस सेवा आहे विचाराधीन
-मीनुकताचपदभार स्विकारला अाहे. महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सुविधा बसेस भविष्यात सुरु करण्याच्या मानस असून, वरिष्ठांशी चर्चा करुन भविष्यात पर्यटन बस सुरु करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जातील.
अनिलमेहतर, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, बुलडाणा.
बातम्या आणखी आहेत...