आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेगाव ते पंढरपूर वारी मार्ग; १६६ झाडे तोडण्यास प्रारंभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेहकर - शेगावते पंढरपूर राष्ट्रीय वारी महामार्गाच्या बांधकामास लवकरच प्रारंभ होणार असल्याने उपविभागाअंतर्गत येणाऱ्या ३० किमी मार्गातील हद्दीत १६६ झाडांची कत्तल करण्यास सुरुवात झाली. याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी झाडे तोडण्याच्या आदेशासोबतच ठेकेदाराला १४ नवीन झाडे लावण्याचे आदेशही दिले आहेत. परंतु या मार्गात हजारच्या वर झाडे असल्याने या आदेशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे आदेश १६६ तर कत्तल हजारो झाडांची अशी स्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या सुरू असलेल्या कोटी वृक्ष लागवड संकल्पाला मेहकर उपविभाग तिलांजली देत असल्याचे चित्र दिसून येत असून, यामुळे निसर्गाच्या या मौल्यवान संपत्तीचा फार मोठा ऱ्हास होणार आहे. 
 
राज्य शासनाच्या वतीने कोटी वृक्ष लागवड अभियान सुरू आहे. हे अभियान एक चळवळ बनली असून संस्था, संस्थान, शाळा, महाविद्यालय यासह विविध सामाजिक संघटना यामध्ये सहभागी झाल्या आहेत. परंतु याच अभियानाला गाजर दाखवत मेहकर उपविभाग विकास कामांच्या नावावर १६६ वृक्षांची कत्तल करत आहे. शेगाव येथून दरवर्षी पंढरपूर या तिर्थक्षेत्र संत गजानन महाराज यांची पायी पालखी ७०० ते ८०० वारकऱ्यांसह ५० वर्षांपासून अकोला पातूर, मालेगाव, रिसोड, सेनगाव, औंढा, माजलगाव मार्गे पंढरपूर जात आहे. तर परतीच्या प्रवासादरम्यान ही पालखी बीड, जालना, सिंदखेडराजा, लोणार, मेहकर मार्गे शेगाव प्रस्थान करते. तर विदर्भातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले संत श्री गजानन महाराज शेगाव येथून विठ्ठल भक्तांना पंढरपूर जाण्यासाठी हा महामार्ग सोईस्कर होणार असून, या मार्गावर वाहतुकीची वर्दळ वाढणार आहे. तसेच या मार्गावर लोणार पर्यटन स्थळाचा देखील विकास होणार आहे. याच विकास कामांसाठी उपविभागाअंतर्गत पालखीच्या परतीच्या मार्गात येणाऱ्या ३० किमी अंतराच्या मार्गावरील १६६ झाडांची कत्तल करण्याचे आदेश मेहकर उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत. यानुसार कडू निंब, बाभूळ, चिंच या झाडांची कत्तल केली जाणार आहे. तसेच ठेकेदाराला १४ झाडे लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल झाल्यावर निसर्गाच्या मौल्यवान संपत्तीचा ऱ्हास होणार अाहे. 
पालखी मार्गावरील झाडांची कत्तल करताना मजूर. 

१४ झाडे लावण्याचा आदेश चुकला 
^शेगाव-पंढरपूरवारी मार्गासाठी वृक्ष तोडण्याची परवानगी देण्यात आली असून, यामध्ये ठेकेदाराला १४ झाडे लावण्याचे आदेश देण्यात आले. ते १४ झाडे लावण्याचे आदेश चुकले आहे.’’ नीलेश अपार, उपविभागीय अधिकारी, मेहकर. 

श्रींच्या पालखीचा परतीचा मार्ग 
मेहकर उपविभागांतर्गत बिबी, किनगाव जट्टू, घायफळ, लोणार, शारा, वडगाव, सुलतानपूर, सारंगपूर, मेहकर हा श्रींच्या पालखीचा परतीचा मार्ग असून, या मार्गावरील वृक्ष तोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. 

उपविभागीय अधिकारी यांचे आदेश 
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम नुसार उपविभागीय अधिकारी नीलेश अपार यांनी वृक्ष तोडण्यास परवानगी दिली आहे. ही परवानगी जुलैपासून ते आठ दिवसांकरिता वैद्य असून, येत्या पावसाळ्यात नवीन १४ झाडे लावण्यात यावी, असे पत्रात नमुद करण्यात आले आहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...