आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौटुंबिक वादातून आत्महत्येचा प्रयत्न, जिल्हाधिकारी कार्यालयातच केले विष प्राशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- शेतजमिनीच्या कौटुंबिक वादातून पातूर तालुक्यातील शिर्ला अंधारे येथील शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयात १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११.४५ वाजताच्या दरम्यान विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दोन महिन्यांत शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न करण्याची ही चौथी घटना आहे. शेतकऱ्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकारास तलाठी अथवा महसूल विभाग जबाबदार नसून, शेतकऱ्याने जमिनीच्या कौटुंबिक वादातून आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी स्पष्ट केले.

अकोला तालुक्यातील चिखलगाव येथील गट नंबर ३९४ मधील क्षेत्र १.२६ हेक्टर आर असून, पूर्वी ही शेतजमीन विक्रम साधू इंगळे यांच्या नावाने होती. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे वारसाचे नावे डिगांबर विक्रम इंगळे इतर यांचे शेतजमिनीची वारसाची नोंद झाली. ही शेतजमीन व्यक्तींच्या नावे सामाईकमध्ये होती. त्यानंतर शेतीचे वाटणीपत्र झाल्यामुळे प्रत्येकाच्या नावे ०.२५ हेक्टर आर प्रमाणे नोंद करण्यात आली. डिगांबर विक्रम इंगळे यांचे नावे गट नंबर ३९४ मधील ०.२५ हेक्टर आर प्रमाणे नोंद झाली आहे. शेतकरी अशोक डिगांबर इंगळे यांनी म्हटले आहे की, जमीन स्वत:च्या नावावर करून घेण्यासाठी वडिलांचे नावे ११ जून २०१५ रोजी १०० चे स्टॅम्पपेपरवरील अनोंदणीकृत संमतीपत्र तलाठी चिखलगाव यांच्याकडे सादर केले आहे. त्यानंतर संमतीलेखानुसार नोंद घेण्यापूर्वीच त्यांचे वडील डिगांबर विक्रम इंगळे यांनी १६.०७.२०१५ रोजीचा आक्षेप आॅगस्ट २०१५ रोजी तलाठ्याकडे दाखल केला. यानुसार अशोक इंगळे यांनी संमतीलेख लिहिला त्यावर माझी खोटी सही केली. त्यामुळे माझे नाव सात/बारामधून वगळण्यात येऊ नये, अशी आक्षेपाद्वारे विनंती केली होती. वडिलांच्या संमतीशिवाय मुलाच्या नावे जमीन करणे शक्य नसल्याने अशोक इंगळे यांची विनंती अमान्य करण्यात आली. त्यातूनच हा प्रकार घडला.

समस्या सोडवू
कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास त्यांनी प्रशासनास त्याची माहिती द्यावी. त्याआधारे तक्रारीचे तत्परतेने निराकरण करण्यात येईल. प्रशासनाच्या कार्यक्षेत्राबाहेरील तक्रारीबाबतही योग्य समुपदेशन करून समस्या सोडवू. कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या किंवा आत्मदहनासारखे टोकाचे पाऊल घेऊ नये.'' जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी

प्रकृती स्थिर
शेतकऱ्यानेआत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्यास सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याठिकाणी एसडीओ प्रा. संजय खडसे, तहसीलदार संतोष शिंदे, नायब तहसीलदार महेंद्र आत्राम, मंडळ अधिकारी अजय तेलगोटे यांनी भेट देऊन तब्येतीची विचारपूस केली.

घेतली माहिती
उपविभागीयअधिकारी प्रा. संजय खडसे तहसीलदार संतोष शिंदे यांनी या प्रकरणाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी घटनास्थळासह रुग्णालयात शेतकरी कुटुंबातील अन्य व्यक्तींकडून माहिती घेतली. याशिवाय तलाठ्याकडून प्रकरणाची माहिती घेतली. शेतजमिनीचा वाद हा कौटुंबिक असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येते. या घटनेस तलाठी अथवा महसूल विभागाकडून कोणतीही दिरंगाई झालेली नाही, असे स्पष्ट झाले आहे.