आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अकोल्‍यात 79 उमेदवारी अर्ज; सरपंचपदासाठी 28, सदस्यांसाठी 51 अर्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - आगामी ऑक्टोबरला होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यात आतापर्यंत ७९ उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत. यामध्ये सरपंच पदासाठीचे २८ तर सदस्यपदासाठीचे ५१ उमेदवारी अर्ज आहेत. 
 
ग्रामपंचायतीसाठीचे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया गेल्या १५ सप्टेंबरपासून सुरु झाली. पहिल्या दिवशी सदस्यपदासाठी केवळ एक नामांकन दाखल झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १६ सप्टेंबर रोजी सरपंचासाठी आठ आणि सदस्यासाठीचे चार असे १२ अर्ज भरले गेले. दरम्यान रविवार, १७ सप्टेंबरला साप्ताहिक सुटी असल्याने हा विभाग बंद होता. त्यामुळे रविवारी ऑनलाईन अर्ज दाखल केलेल्यांनी त्याच्या प्रिंटस्् तहसील कार्यालयांतील निवडणूक अधिकाऱ्यांकडे सोमवारी सादर केल्या. अशाप्रकारे सोमवारी जिल्ह्यातील सर्व ६७ निवडणूक अधिकाऱ्यांकडे सरपंच पदासाठी २० तर सदस्यपदासाठी ४६ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. 

यामध्ये शुक्रवार-शनिवारचे अर्ज मिळविल्यास एकूण संख्या ७९ वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमधिल मतदारसंघांची (वार्डांची) संख्या १६३१ आहे. बहुसदस्यीय प्रणालीमुळे या मतदारसंघांतून हजार १२६ ग्रामपंचायत सदस्य निवडून येणार आहेत. यापैकी हजार ३८९ महिला असतील. डिसेंबर २०१७ मध्ये कार्यकाळ संपणाऱ्या म्हणजेच निवडणुकीस पात्र असलेल्या ग्रामपंचायतींची एकूण संख्या २७२ आहे. यामध्ये सर्वाधिक ५७ ही संख्या अकोला तालुक्याची आहे. त्याखालोखाल ५१ ग्रामपंचायती मुर्तीजापूर तालुक्याच्या असून बार्शिटाकळी तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींमध्ये ही निवडणूक होत आहे. अकोटच्या ३७, पातूरच्या २८, बाळापुरच्या २७ आणि तेल्हारा तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींमध्ये मतदान घेतले जाणार आहे. 
 
सुटी असली तरी निवडणूक विभाग सुरु : सार्वपित्री अमावस्यानिमित्त उद्या, मंगळवार, १९ सप्टेंबर रोजी स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. मात्र नामनिर्देशनपत्र पत्र भरण्याची प्रक्रीया सुरु राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. त्यामुळे मंगळवारीही उमेदवारांना सदर वेळेत आपले नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 
 
बाळापुरमध्ये खातेच नाही उघडले 
निवडणूक सातही तालुक्यात असली तरी बाळापूरमध्ये अद्याप खाते उघडले नाही. या तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे. परंतु अद्याप एकाही ठिकाणी सरपंच किंवा सदस्यपदासाठीचे नामांकन दाखल केले गेले नाही. आगामी २२ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 
बातम्या आणखी आहेत...