आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदार नोंदणीचा मेगा इव्हेंट फ्लॉप, अत्यंत थंड प्रतिसाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - एक जानेवारी २०१७ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नव मतदारांची नोंदणी करण्यासाठी आज, शनिवार जुलैला घेतलेली विशेष मोहीम अगदीच फ्लॉप झाली. माहितीचा अभाव, कर्मचाऱ्यांची अनास्था यामुळे या मोहिमेदरम्यान नवमतदारांची हवी तशी नोंद होऊ शकली नाही. 
 
नव मतदारांच्या नोंदीसाठी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघातील १४४६ मतदान केंद्रांवर व्यवस्था उपलब्ध राहील, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले होते. परंतु, वास्तविकता अगदी याविरुद्ध दिसून आली. काही केंद्रांवर केवळ नोंदणी सुरु आहे, असे फळ्यावर लिहून ठेवले होते. तर काही केंद्रांवर डेस्क-बेंच ठेवून कर्मचारी गायब होते. इतर काही ठिकाणी नोंदणी कर्मचारी अशाप्रकारे बसले होते की त्या शाळेत ते कुणाला दिसूनच आले नाही. त्यामुळे मतदार नोंदणीला अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. मतदार नोंदणीसाठी शहरात निवडक चौकात मोठाले होर्डिंग लागले होते. जाणकारांच्या मते नवमतदारांनी त्यांची नावे मतदार यादीत नोंदवावी, असे आवाहन करणारी पत्रके शहरातील महाविद्यालये, वाचनालये युवकांची गर्दी असणाऱ्या ठिकाणी वितरित झाली असती किंवा त्यांच्यापर्यंत हा संदेश गेला असता तर कदाचित या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला असता. परंतु वास्तवात तसे झाले नाही. सदर प्रतिनिधीने शहरातील काही केंद्रांवर भेटी दिल्या तेव्हा मोठी लहान उमरी, जवाहरनगर, जठारपेठ, कृषिनगर आदी भागांतील मतदान केंद्रांवर या मोहिमेला पोषक असे वातावरण दिसून आले नाही. काही ठिकाणी तर अगदीच शुकशुकाट आज विविध केंद्रावर नव मतदार नोंदणीदरम्यान दिसून आला आहे. 

दुपारी १.५८ वाजता जवाहरनगरातील विद्यालयात केवळ डेस्क-बेंच दिसून आले. मागे फळ्यावर मतदार नोंदणी मोहिमेबद्दल लिहिले होते. परंतु,पाच-सात मिनीटे वाट पाहिल्यानंतरही रिकाम्या डेस्क-बेंचवर कुणी फिरकले नाही. त्यानंतर दहा मिनीटांच्या अंतराने उमरी भागातील फुलपाखरु शाळेत हा प्रतिनिधी पोहोचला. त्यावेळी दोन कर्मचारी दिसून आले. परंतु नमूना सहा भरायला तेथे कुणीही उपस्थित नव्हते. शिवाय त्यापूर्वी तेथे कुणी असा अर्ज भरला, याचीही नोंद आढळली नाही. पुढे भारत विद्यालयात मात्र थोडेसे आशादायी वातावरण दिसून आले. याठिकाणी मतदार नोंदणी सुरु आहे, असे दर्शनी भागात लिहलेले नव्हते. परंतु बीएलओ ज्या ठिकाणी बसले होते, त्या कक्षात मात्र नवमतदारांचे अर्ज भरुन घेण्याचे काम सुरू होते. 

ग्रामीण भागात बोंबच 
अकोला शहरात अकोला पश्चिम अकोला पूर्व असे विधानसभेचे दोन मतदारसंघ आहेत. दोन्ही मतदारसंघ मिळून ५२७ मतदान केंद्रे होतात. वरील तीन केंद्रांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवल्यास इतर ठिकाणी काय स्थिती असेल, याचा अंदाज बांधता येतो. दरम्यान मुर्तीजापूर, अकोट आणि बाळापूर विधानसभा मतदारसंघातही याहून वेगळे चित्र नव्हते, अशी माहिती आहे. 

‘शो कॉज’ देणार, २२ ला पुन्हा संधी 
^जिल्हाभरात झालेल्या मतदार नोंदणीचे आकडे सोमवारपर्यंत माझ्याकडे येतील. त्याद्वारे स्थिती स्पष्ट होणार असून,ज्या केंद्रांवर नोंदणी झालीच नाही, तेथे बीएलओ होते किंवा नाही हेदेखील त्यातून स्पष्ट होईल. दरम्यान, ज्यांनी हयगय केली, त्यांना शो कॉज नोटीस दिली जाईल. शिवाय २२ जुलैच्या दुसऱ्या टप्प्यात योग्य काम होईल, याची सर्व बीएलओंकडून हमी प्राप्त केली जाणार आहे.’’ आस्तिक कुमारपाण्डेय, जिल्हाधिकारी तथा जिल्हा मतदार नोंदणी अधिकारी, अकोला. 
 
 
बातम्या आणखी आहेत...