आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलजागृती सप्ताहानिमित्त खुल्या निबंध स्पर्धेचे केले आयोजन, पाटबंधारे विभागाचा पुढाकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अकोला पाटबंधारे विभागाच्या वतीने १६ ते २१ मार्चदरम्यान राबवण्यात येणाऱ्या जलजागृती सप्ताहानिमित्त सर्वसामान्य नागरिकांना पाण्याचे महत्त्व कळावे, त्याच बरोबर पाणी टंचाईबाबत त्यांच्या मनातील विचार, उपाययोजना कळाव्यात, या उदात्त हेतूने दिव्य मराठी अकोला पाटबंधारे विभागाच्या वतीने भव्य खुली निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. या खुल्या निबंध स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थी, नागरिक, महिला , ज्येष्ठ नागरिक यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 
 
दिवसेंदिवस पावसाची सरासरी कमी होत आहे. पाऊस आता पूर्वी सारखा राहिलेला नाही. पावसाने आता लहरीपणाचे स्वरुप घेतले आहे. एखाद्या वर्षी धो-धो तर एखाद्या वर्षी पाण्याचा थेंबही नाही. एकीकडे हा प्रकार सुरु असताना दुसरीकडे पाण्याच्या बचतीकडे अद्यापही गांभीर्याने पाहिले जात नाही. उच्च शिक्षित तसेच स्वत:ला सामाजिक कार्यकर्ते म्हणवून घेणारेही पाण्याच्या बचतीकडे लक्ष देत नाहीत. या सर्व प्रकारामुळे जमिनीतील पाण्याची पातळी चिंताजनक स्थितीत घटली आहे. त्यामुळेच भविष्यात आणखी तिव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
 
या सर्व बाबी लक्षात घेऊन नागरिकांना पाण्याचे महत्त्व कळावे तसेच पाणी टंचाईवर नेमक्या कोणत्या उपाय योजना कराव्यात? याबाबतचे त्यांचे मत, प्रोजेक्ट जाणून घेण्यासाठीच ‘भविष्यातील पाणी टंचाई उपाय योजना’ या विषयावर खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. या खुल्या निबंध स्पर्धेत विद्यार्थी,सर्व सामान्य नागरिक, महिला, युवती, युवक, ज्येष्ठ नागरिक सर्व सहभागी होऊ शकतात. निबंध स्पर्धेसाठी भव्य रोख बक्षिसे दिली जाणार आहे.
 
 प्रथम क्रमांकास तीन हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह आणि पुस्तक,द्वितीय क्रमांकास दोन हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह, पुस्तक तर तृतीय क्रमांकास हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह,पुस्तक त्याच बरोबर उत्तेजनार्थ पारितोषिक दिले जाणार असून ५०० रुपये रोख पुस्तक असे त्याचे स्वरुप राहील. निबंध स्पर्धेत शब्द मर्यादा ५०० शब्द असून, कागदाच्या एका बाजूस समास अंतर सोडून सुवाच्च अक्षरात निबंध द्यावा लागणार आहे.
 
 परीक्षकांचा निर्णय अंतिम निर्णय राहणार असून ज्या इच्छुकांना निबंध स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी आपले निबंध दिव्य मराठी कार्यालय , गोरक्षण रोड, सहकार नगर,पूजा कॉम्प्लेक्स जवळ अकोला, यशवंत ईलेक्ट्रिकल्स युगंधर चौक, डाबकी रोड ,अकोला किंवा लोकमान्य वॉच कंपनी, टिळक रोड,अकोला या पत्त्यावर १६ मार्चपर्यंत आणुन द्यावीत किंवा पोस्टाने पाठवावीत. निबंध देताना आपले संपूर्ण नाव, मोबाईल नंबर पत्ता लिहावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 
बातम्या आणखी आहेत...