आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टंचाईचे सावट: जिल्ह्यातील प्रकल्प तहानलेलेच, भर पावसाळ्यात ओढवली बिकट स्थिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा- मागीलवर्षी झालेले पावसाचे अत्यल्प प्रमाण, सिंचनासाठी होत असलेला पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर, दिवसेंदिवस खोल जात असलेली भूगर्भातील पाणीपातळी, बोअर घेण्याचे वाढलेले प्रमाण यासह अन्य कारणांमुळे जिल्ह्यातील मोठ्या मध्यम प्रकल्पाच्या जलसाठ्यात कमालीची घट होत आहे. जिल्ह्यात मोठ्या असलेल्या पेनटाकळी प्रकल्पात सध्या १८.९२ टक्के जलसाठा असून, खडकपूर्णा प्रकल्पात ३६. १९ टक्के जलासाठा शिल्लक आहेे. सावखेडभोई विद्रुपा या लघू प्रकल्पांमध्ये केवळ मृतसाठा शिल्लक आहे. करडी प्रकल्पही शेवटच्या घटका मोजत असून, या प्रकल्पात केवळ १.०२ एवढाच पाणीसाठा आहे. या आकडेवरून भर पावसाळ्यात जिल्ह्यातील प्रकल्प तहानलेले दिसून येत आहेत.

जिल्ह्यात तीन मोठे, सात मध्यम आणि ७४ लघू प्रकल्प आहेत. मागील वर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पाची पाणीपातळी खालावली होती. परंतु फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला होता. त्यामुळे प्रकल्पाच्या जलसाठ्यात काही अंशी वाढ झाली होती. या वर्षी अपेक्षेप्रमाणे जून महिन्यात पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे पाणीटंचाईपासून सुटका होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, एक ते दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे आणि सिंचनासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने दिवसागणीक प्रकल्पांमधील जलसाठ्यात घट होत आहे. सावखेड भोई विद्रुपा या दोन लघू प्रकल्पांमध्ये आता केवळ मृतसाठाच शिल्लक आहे. धाड गावाच्याया बाजूला असलेल्या करडी प्रकल्पात जेमतेम १.०२ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.

दिवसेंदिवस जिल्ह्यातील प्रकल्पांमधील जलसाठा कमी होत असल्याने अनेक पाणीपुरवठा योजना प्रभावित होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. पुढील काही दिवसांत दमदार पाऊस आल्यास मध्यम प्रकल्पासह लघु प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट राहणार आहे. सध्या भर पावसाळ्यात जिल्ह्यातील १६ गावांना २६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पावसाची अशीच स्थिती राहिल्यास टँकरग्रस्त गावांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रकल्पांची ही समस्याग्रस्त स्थिती पाहता प्रशासनाने या प्रकल्पातील साठा पिण्यासाठी आरक्षित करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये असा आहे जलसाठा