आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षणात कोसळले सहा फ्लॅट, आठ मार्चच्या घटनेची झाली पुनरावृत्ती सुदैवाने जिवित हानी नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - ओपन स्पेसमध्ये अनधिकृत बांधकामावर १४ डिसेंबरच्या कारवाईदरम्यान पापणी लवते तोच सहा फ्लॅट कोसळले. अत्यंत कमकुवत असलेल्या या चार मजली इमारतीवर कारवाईदरम्यान जिवित हानी झाली नसली तरी महापालिकेची जेसीबी मशिन मात्र मलब्याखाली दबली. विशेष म्हणजे याच इमारतीतील सहा फ्लॅट आठ मार्च २०१६ ला कारवाई दरम्यान पत्त्यासारखे कोसळले होते.
बिर्ला परिसरातील जलाराम मंदिरा समोर शासनाचा ओपन स्पेस आहे. हा ओपन स्पेस मधुकर गवई यांनी आठ ते दहा वर्षापूर्वी त्यांच्या नावावर करुन घेतला. त्यानंतर महापालिकेच्या नगररचना विभागाची परवानगी घेता बांधकाम सुरु केले. विना परवानगीने काम सुरु केल्या नंतर याबाबत महापालिकेकडे तक्रार दाखल झाली. प्रशासन आणि न्यायालयानेही बांधकाम करण्यास मनाई केली. तरी मधुकर गवई यांनी बांधकाम सुरुच ठेवले. दरम्यान तत्कालीन प्रशासनाने १४ जुन २०१४ ला नोटीस बजावून बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले. तरीही बांधकाम सुरुच ठेवण्यात आले. चार मजली इमारतीत २४ फ्लॅट आणि दहा दुकाने बांधण्यात आली होती. टाईल्स, इलेक्ट्रिक फिटींग, किचन ओटा, पिओपी आदी कामेही आटोपली होती. दरम्यान विद्यमान आयुक्त अजय लहाने यांच्याकडे मोकळ्या जागेवरील अनधिकृत बांधकामाबाबत तक्रार प्राप्त झाल्या नंतर त्यांनी विधिज्ञांनी चर्चा करुन आठ मार्च २०१६ ला अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले. दोन जेसीबी आणि दहा मजुरांच्या मदतीने बांधकाम पाडण्याचे काम सुरु असताना आठ मार्चला सहा फ्लॅट पत्त्यासारखे कोसळले. सुदैवाने बांधकाम पाडणारे मजुर सुखरुप बचावले. प्रशासनाच्या या कारवाई विरुद्ध मधुकर गवई यांनी न्यायालयातून स्थगनादेश आणला. त्यामुळे उर्वरित अनधिकृत बांधकामावर महापालिकेला कारवाई करता आली नाही. हा स्थगनादेश न्यायालयाने १३ डिसेंबरला उठवला.

स्थगनादेश उठल्या बरोबर आयुक्त अजय लहाने यांनी त्वरित १४ डिसेंबर रोजी उर्वरित अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले. या कारवाईत पापणी लवते तोच पुन्हा सहा फ्लॅट कोसळले. हा सर्व मलबा जेसीबी मशिनवर कोसळला. सुदैवाने जेसीबी चालक बचावले. ही कारवाई आयुक्त अजय लहाने यांच्या उपस्थितीत क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे, सहाय्यक आयुक्त राजेंद्र घनबहादूर, नगररचना विभागाचे संदीप गावंडे यांच्यासह अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांनी केली.
आज शाळेवर कारवाई ?
या चार मजली अनधिकृत इमारती लगत शाळा आहे. ही शाळा देखील ओपन स्पेस मध्ये असून अनधिकृत असल्याची माहिती मिळाली आहे. या शाळेला खाली करण्याचे आदेश संबंधित संस्थेला देण्यात आले असून ही शाळा इमारत पाडण्याची कारवाई गुरुवारी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

तेजराव बनसोड थोडक्यात बचावले
बांधकाम पाडण्याची कारवाई सुरु असताना तकलादू पिल्लर मुळे वरचे चारही मजल्यातील सहा फ्लॅट कोसळले. जेसीबी मिशनचा भाग दबला. या दरम्यान जेसीबी चालक तेजराव बन्सोड जेसीबी मशिन मध्येच होते. मलब्यामुळे सर्वत्र धुराळा उडल्याने दोन मिनिटे काहीच दिसत नव्हते. धुराळा खाली बसल्यावर वाहन चालक बाहेर आले. चौथ्या मजल्यावरील पिल्लर दुसऱ्या पिल्लरला अडकल्याने तो पडला नाही. हा पिल्लर वाहन चालकाच्या केबीनवर कोसळला असता.
जीव धोक्यात घालून करतात कर्मचारी काम
चार मजली इमारत पाडण्याची कारवाई करताना प्रशासनाने कारवाईत सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना हेल्मेट देणे अथवा वापरणे सक्तीचे करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे ही इमारत अतिशय कमजोर असल्याने ही इमारत केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु कर्मचाऱ्यांना कोणत्याही सुविधा नसताना आपले कर्तव्य बजावावे लागते. सकाळी सहा वाजल्या पासून कर्मचारी कर्तव्यावर होते. मात्र या कर्मचाऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची तसेच नाश्ता अथवा भोजनाची व्यवस्था प्रशासनाने केली नाही.
बातम्या आणखी आहेत...