आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांनी केली दारू दुकानाची तोडफोड, उपजिल्हाधिकाऱ्यांनी काढला पळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
बोरगावमंजू : लक्ष्मीनगरात नव्याने स्थानांतरीत करून सुरू केलेल्या दारूच्या दुकानात दारू साठा शुक्रवारी भरण्यात आला. याची चाहुल लागताच शनिवारी सकाळी संतप्त महिलांनी एकत्र येऊन दुकानावर हल्ला चढवला. दुकानातील देशी दारूच्या बॉक्ससह बाटल्यांची तोडफोड करून आमच्या परिसरात देशी दारूचे दुकान सुरू होऊ देणार नाही, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार पी. के. काटकर यांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेऊन संतप्त महिलांना शांत केले. 
 
दरम्यान, दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावरही मोर्चा काढण्यात आला. जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक कलासागर यांनी बोरगावमंजुत पुढील १५ दारू बंद ठेवावीत, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क विभागला दिले. 
 
शनिवारी सकाळी १० वाजता बस थांब्यावर सोपीनाथ महाराज सभागृहात एका सभेचे आयोजन करून सभेत निर्णयाचा निषेध करून गाव दारूमुक्त करण्याचा ग्रामस्थांसह महिलांनी निर्धार केला. निवेदन उपविभागीय पोलिस अधिकारी कल्पना भराडे, ठाणेदार पी. के. काटकर यांना दिले. शासन प्रशासनविरोधी रोष व्यक्त केला. जोपर्यंत दुकाने बंद होत नाहीत, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा निर्धार दारूबंदी महिला संघर्ष समिती, संत गजानन महाराज सेवा समितीसह ग्रामस्थांनी केला. 
 
उपजिल्हाधिकाऱ्यांनी काढला पळ 
लहान मुलांसह ३०० च्या वर महिलांचा शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेला मोर्चा पाहून उपजिल्हाधिकाऱ्यांनी पळ काढला. मोर्चेकऱ्यांचे म्हणने ऐकून घेण्यास त्यांनी टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलांनी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोरच ठिय्या दिला. शेवटी मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे यांना देण्यात आले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...