आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेनऊ वर्षांच्या ‘गार्गी’ ने वाचली तब्बल 1500 पुस्तके

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर जन्मदिवस वाचन प्रेरणा म्हणून साजरा केला जातो. शासनाद्वारे वाचन कौशल्य विकासाच्या उद्देशाने उपक्रम राबवले जात असले तरी एक मुलगी आवड म्हणून वाचन सुरू करते अन् नवा विक्रम घडवते. आजच्या या वाचन प्रेरणा दिनानिमित्त या बाल वाचकाची ही ओळख. 

मुलांना शाळेचा अभ्यास करायलाच कंटाळा येतो मग अवांतर वाचन कधी करणार?, शाळा- ट्युशन- स्पोर्ट्स- हॉबी क्लासेस यातून वाचनाला वेळच मिळत नाही किंवा आमचे मुलं कॉन्व्हेंट मध्ये शिकतात मग मराठी, हिंदी जमतंच नाही वाचायला, अशा तक्रारी करणाऱ्या पालकांची संख्या कमी नाही. आजूबाजूला मोबाईल मध्ये गेम खेळणारे मुले दिसतात. पण हातात महाभारत, मराठी शब्दकोश, हॅरी पॉटर, एक होता कार्व्हर असे पुस्तक घेऊन वाचणारी मुलगी दिसली तर धक्काच बसेल. पण अशी मुलगी आहे, गार्गी आशु आल्हाद भावसार. साडेनऊ वर्षांच्या गार्गीने आतापर्यंत तब्बल १५०० पुस्तके वाचली आहेत. 

जठारपेठेत राहणारी गार्गी बालशिवाजी प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीत शिकते. तिचे वडील प्रा. आल्हाद भावसार हे बाळापूरला, आई प्रा. डॉ. आशु भावसार या भंडाऱ्याला प्राध्यापक आहेत. गार्गीला वाचनाचे बाळकडू आई वडिलांकडूनच मिळाले. गार्गी सहा महिन्याची होती तेव्हापासून तिचे वडिल तिला बालगीते, गोष्टी, कथा तसेच नाट्य लेखन करत असल्याने नाटक वाचून दाखवायचे. आई जेवताना, झोपवताना बालकथा वाचायची. त्यामुळे बालवयात अनेक शब्द तिच्या कानावर पडल्याने तिला भाषा अवगत झाली. घरी खेळण्यांसह चित्र रूपी कथांची पुस्तके असायची. गार्गीला कथा ऐकताना मजा यायची. घरात दिसणारी चित्ररूपी कथांची पुस्तके ती न्याहाळू लागली. दीड दोन वर्षांची झाल्यानंतर तिची अ, आ, इ, अक्षर ओळख सुरू झाली. पुस्तकातील शब्दांवरून भिरभिरणारे गार्गीचे डोळे वाचनासाठी थांबू लागले. दोन वर्षांची चिमुकली अस्खलितपणे पुस्तकातील गाणी, गोष्टी जोडाक्षरांसह, आरोह अवरोह लक्षात घेऊन वाचते हे पाहून आश्चर्य होणार नाही तर नवल. 

तीन वर्षांची झाली अन् शाळेत प्रवेश घेतला तसा वाचनाचा छंद बहरत गेला. तिची पुस्तकांशी मैत्री झाली की पाचव्या वर्षांपर्यंत तिने रामायण, महाभारत, कमला सुब्रम्हण्यम् लिखीत मंगेश पाडगावकर अनुवादित महाभारत खंडे, राजीव तांबे, माधुरी पुरंदरे, शांता शेळके, दुर्गा भागवत, डॉ. लीला पाटील, विं. दा. करंदीकर, हेरंब कुळकर्णी आदी साहित्यिकांचे साहित्य, इसापनीती, अकबर- बिरबल, देशोदेशींच्या कथा, संस्कार कथा, प्राचिन कथा, चिंटूचे १६ भाग, त्तोत्तोचान, एक होता कार्व्हर, हॅनाची सुटकेस, हॅरी पॉटरचे सात भाग, मी अश्वत्थामा चिरंजीव,शेरलॉक होम्स, मराठी शब्दकोश, शब्दरत्नांकर, इंग्रजी भाषा शब्दकोश, माधुरी पुरंदरेंचे लिहावे नेटके भाग अशी अनेकानेक पुस्तके वाचली आहेत. याच्या जोडीला नाटक,एकांकिका,कथा,कविता यांचा संग्रह असणारे किशोर मासिकाचे विविध खंड, विज्ञानावरील लेख, का?, कसे?, कोण?, केंव्हा?, किती?, कुठे?, खगोलशास्त्र, भूगोल अशा सर्व विषयांवरील हिंदी, मराठी, इंग्रजी भाषेतील पुस्तके, कविता संग्रह तिने वाचून काढली आहेत. अनेक पुस्तकांचे तर तिने ४-५ वेळा पुनर्वाचन केले आहे. 

दर १५ दिवसांनी बाबा घरी आणणारे २५-३० पुस्तक रुपी खाद्य गार्गी जेमतेम ५-६ दिवसात ती वाचून संपवते. घरी असणाऱ्या पुस्तकांचे तीने ग्रंथालय केले असून, याला ‘गार्निम’ असे नाव दिले. तिच्या ग्रंथालयातील पुस्तके तिच्या मैत्रिणी वाचनासाठी घेऊन जातात. गार्गीने अधिकाधिक पुस्तके वाचता यावी यासाठी घरी येणाऱ्या पुस्तकांच्या सोबतीला ती कै. काकासाहेब ठोंबरे वाचनालयाचे सदस्यत्व घेतले. ती नुसते पुस्तक वाचत नाही तर पुस्तकाचे लेखक, प्रकाशक, आवृत्ती, पुस्तक अनुवादित आहे की मुळ लेखकाचे आहे या सर्वांचा विचार करून ती पुस्तक खरेदी करते. गार्गीला कोणत्याही पुस्तकाचे नाव सांगा ते तिने वाचलेले असतेच. वाचनासह तिला संगीताची आवड असल्याने तीने अखिल भारतीय गांधर्व महामंडळाच्या दोन परिक्षा दिल्या असून, पुढील शिक्षण सुरू आहे. शाळेचा अभ्यास, संगीत, बॅडमिंटन हे सर्व करून ती दररोज दोन ते अडीच तास वाचन करते. हॅरी पॉटर आणि सॅनाची सुटकेस हे आवडते पुस्तक असले तरी हातात पडेल ते पुस्तक, वर्तमान पत्र वाचनाशिवाय गार्गीचा दिवस संपत नाही. 
बातम्या आणखी आहेत...