आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या बँकेत पैसे नव्हे, ‘रायटर्स’ मिळतील!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - बँक म्हटले की, आर्थिक व्यवहार आले. कर्ज देणे आणि डिपॉझिट ठेवणे, असे बँकेत व्यवहार चालतात. मात्र, शहरात एका महाविद्यालयात अशा बँकेची स्थापना झाली आहे की, त्या बँकेतून कर्जही दिले जात नाही आणि डिपॉझिट ठेवल्यावर व्याजही मिळत नाही. परंतु, या बँकेचे सभासद झाल्यास आपणास सामाजिक दायित्व निभावण्याची ठेव वृद्धिंगत करण्याची संधी मात्र मिळते. अशी ही आगळीवेगळी बँक अंध-अपंग विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे.
राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयात मूल्य शिक्षण समितीच्या समन्वयक दीप्ती दीपक जोशी यांनी प्राचार्या डाॅ. वीणा माेहाेड अाणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने या रायटर्स बँकेची स्थापना केली आहे.

सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे अंध, अपंग विद्यार्थी जिद्दीने शिक्षण घेतात. एवढेच नव्हे, तर धडधाकट विद्यार्थ्यांवर प्रतिकूल परिस्थितीत मात करून आपले उद्दिष्ट साध्य करतात. दृष्टिहीन अपंग विद्यार्थ्यांना वर्षभर इतर विद्यार्थ्यांप्रमाणे ज्ञानार्जन केल्यानंतर मात्र, परीक्षेच्या वेळी अडचणींचा सामना करावा लागतो. अशा विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी रायटर्स ठेवून उत्तरपत्रिका सोडवण्याची संधी देण्यात आली आहे. परंतु, रायटर्स उपलब्ध होत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागते. परिणामी, वर्षभर केलेली धडपड व्यर्थ जाते. या कठीण समस्येचा सामना करणारे विद्यार्थी सर्वत्र आहेत. दृष्टिहिनांसाठी नेत्रदानाची चळवळ राबवली जात आहे, तर अपंग असलेल्या व्यक्तींना कृत्रिम हात-पाय बसवले जातात. मात्र, परीक्षा देण्यासाठी रायटर्स उपलब्ध व्हावेत, या हेतूने फारसा प्रयत्न झालेला दिसत नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊनच आरडीजी महाविद्यालयातील मूल्य शिक्षण समितीच्या समन्वयक दीप्ती जोशी यांनी पुढाकार घेऊन या समितीअंतर्गत रायटर्स बँक स्थापन केली आहे.

सामाजिक दायित्व निभवा
रायटर्स बँकेचे सभासद होऊन अंध अपंग विद्यार्थ्यांना मोलाचे सहकार्य करण्याची संधी केवळ विद्यार्थ्यांनाच आहे. विद्यार्थ्यांनी सभासद होऊन आपल्याच बंधू-भगिनींना सहकार्य करावे. दीप्ती जोशी, समन्वयक, मूल्य शिक्षण समिती, आरडीजी

विद्यार्थीच होऊ शकतात रायटर्स
ज्यावर्गाची विद्यार्थी परीक्षा देणार असेल त्या खालच्या वर्गातील विद्यार्थी रायटर्स होऊ शकतात. बाराव्या वर्गाची परीक्षा देताना ११ व्या वर्गात शिकणारे विद्यार्थी रायटर्स बँकेचे सभासद होऊन, अशा विद्यार्थ्यांना मदत करू शकतात. या अनुषंगाने ज्या शहरातील विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होऊन बँकेचे सभासद व्हायचे असेल, त्यांनी ९४२३१५०५१५ या क्रमाकांशी संपर्क साधावा.