आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्वनी प्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष, नोडल अधिकाऱ्यांची कारवाई कुचकामी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - जिल्हा वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या पोलिसांचे ध्वनी प्रदूषण कायदा २००० च्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत आहे. किरकोळ कारवाई व्यतिरिक्त ठोस कारवाया होत नसल्याने ध्वनी प्रदूषणास बंदी असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात कर्णकर्कश हॉर्न वाजवले जात आहेत. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी काढलेल्या ध्वनी प्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीच्या आदेशापेक्षा वाहतूक पोलिसांचे वसुलीकडे अधिक लक्ष असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. 
 
विशेष म्हणजे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेले ३३ नोडल अधिकारी त्यांना मार्गदर्शन करणारे प्राधिकृत अधिकारी मात्र मूग गिळून बसले आहेत. उच्च न्यायालय मुंबई याचिका क्रमांक १७३/२०१० डॉ. महेश बेडेकर विरुद्ध महाराष्ट्र शासन अन्य ध्वनी प्रदूषण (नियंत्रण नियमन) नियम २००० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघनाबाबत तक्रार करावयाची असल्यास संबधित पोलिस ठाण्यात किंवा १०० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते. तर ध्वनी प्रदूषण संदर्भात तक्रार करण्यासाठीी pidsb.bul@mahapolice.gov.in. हा इमेल आयडी उपलब्ध करून दिला आहे. मात्र पोलिसांचेच नियंत्रण मोटार सायकल अन्य मोठ्या वाहनांद्वारे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर नाही. त्यामुळे अनियंत्रित वेगाने वाहने चालवत ध्वनी प्रदूषण करून नागरिकांना त्रास देण्याचे प्रमाण जिल्ह्यात वाढले आहे. 
 
वाढत्या ध्वनीप्रदूषणामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत असताना पोलिस प्रशासन मात्र केवळ वसुली करण्यातच मग्न असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन नागरिकांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करण्याची मागणी होत आहे. वाढत्या ध्वनी प्रदूषणासोबतच वायू प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक वाहनचालक वाहनामध्ये रॉकेलचाही वापर करतात. त्यामुळे या वाहनातून निघणाऱ्या धुरामुळेही नागरिकांच्या आरोग्याला बाधा पोहचू शकते. त्यामुळे ध्वनी प्रदूषणासोबतवायू प्रदूषण करणाऱ्यांवरही कारवाई करण्याची अावश्यकता आहे. या कायद्याची अंमलबाजवणी होण्याची मागणी होत आहे. 
 
वाहनांच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनी प्रदूषण : ज्याभागात ध्वनी प्रदूषणाला बंदी आहे, अशा भागातून रेतीचे टिप्पर जातात. या टिप्परच्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. मात्र, यावर कारवाई केली जात नाही. आरटीओकडूनही अशा वाहनांवर कारवाई केल्या जात नाही. शहरातील युवा वर्ग दुचाकी चालवताना मोठ्या प्रमाणात हॉर्न वाजवत ध्वनी प्रदूषण करत आहे. अशी वाहने पोलिसांजवळून गेली तरी त्याला अडवून जाब विचारण्याचे काम पोलिस करत नसल्याचे चित्र आहे. 
 
येथे नसावे ध्वनी प्रदूषण 
नगरपालिका असो वा इतर संस्थांनी ठरवल्यानुसार ध्वनी प्रदूषण दवाखाने, न्यायालय, शाळा, महाविद्यालय, धार्मिक स्थळांसह ज्या ठिकाणी शासनाने निर्देश दिलेले आहे, अशा ठिकाणी ध्वनी प्रदूषण करू नये. या बाबत नुकतेच बदलून गेलेले जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बावीस्कर यांनी सूचनाही दिल्या होत्या. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. 
 
क्षमतेपेक्षा जादा प्रवासी 
मोटार वाहन कायद्यानुसार विविध प्रवाशी वाहनांना प्रवाशी क्षमतेची मर्यादा ठरवून दिलेली आहे. मात्र, जिल्ह्यात बिनधास्तपणे जादा प्रवाशी वाहतूक केली जात असताना जिल्हा वाहतूक शाखेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच स्थानिक पातळीवरील पोलिसही याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. शहरातही युवक बिनधास्तपणे ट्रिपल सीट जाताना दिसून येतात. 
बातम्या आणखी आहेत...