आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता 'सभापती' आरक्षणाकडे लक्ष, पाच पंचायत समितींमध्ये भारिपचे प्राबल्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणानंतर आता तालुक्याच्या कारभारात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पंचायत समिती सभापतीपदाच्या आरक्षणाकडे जनतेचे लक्ष लागले आहे. दोन दिवसांपूर्वीच जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होऊन पुढील अडीच वर्षांची सत्ता आता नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी उमेदवाराकडे निश्चित झाली आहे. अध्यक्षपदाच्या आरक्षणाइतकेच महत्त्वाचे ठरणारे पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गाकडे येते याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
सद्य:स्थितीत बार्शिटाकळी, अकोट, तेल्हारा, बाळापूर पातूर या पाच पंचायत समितीचे सभापती भारिप बहुजन महासंघाचे आहेत. पाच तालुक्यांचा कारभार भारिप बहुजन महासंघाने आतापर्यंत सक्षमपणे चालवण्यात यश मिळवले आहे. ग्रामीण भागातील जनतेची नाड ओळखून भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी लाेकाभिमुख निर्णयांची अंमलबजावणी केलेली दिसून येते. अकोला मूर्तिजापूर पंचायत समिती सोडली, तर पाचही तालुक्यात भारिप बहुजन महासंघाने चांगली कामगिरी बजावली आहे. पक्षीय बलाबलाचा विचार करता अकोला पंचायत समितीत सेना-भाजप मिळून १५ भारिपचे सदस्य आहेत. बार्शिटाकळीत ६-६ असे समीकरण आहे. अकोटात भारिप बहुजन महासंघ बहुमतात आहे. तेल्हाऱ्यातसुद्धा बहुमताने भारिप बहुजन महासंघ आहे. बाळापुरात एक जागा कमी पडते. पण, या वेळेस अपक्ष किंवा इतर पक्षातील सदस्याला हाताशी धरून या ठिकाणीसुद्धा बाजी मारल्या जाईल, अशी फिल्डिंग लावल्या जात आहे. पातुरातही भारिपला तोड नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे पुढील अडीच वर्षांसाठी सुद्धा आमचाच सभापती असेल, असा दावा भारिप बहुजन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

दोन ठिकाणी बाजी मारणे कठीण
अकोला मूर्तिजापूर पंचायत समितीत सेना-भाजपची सत्ता आहे. येथे पक्षीय बलाबलाचा विचार करता भारिप-बमसंला थारा दिसत नाही. त्यामुळे बाजी मारणे भारिपला कठीण जाईल असे दिसून येते.