आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाेटाबंदीचा परिणाम, अाता ‘कॅशलेस’ व्यवहारांसाठी राबवण्यात येणार मोहीम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - चलनाचा तुटवडा अद्यापही जाणवतो आहे. शहारातील बँकांमध्ये पाच हजार, तीन हजार याप्रमाणे विड्रॉल दिले जात आहेत. ही स्थिती ताळ्यावर यायला आणखी किती वेळ लागेल या बाबत कोणीच सांगायला तयार नाही. ही अडचण लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने अधिकाधिक व्यवहार ‘लेस’ कॅश व्हावेत याला प्राधान्य दिले आहे.
मंगळवार, १३ डिसेंबर १६ पासून जिल्ह्यामध्ये विविधस्तरावर मोहीम राबवली जाणार आहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गुरुवार, १२ डिसेंबर रोजी या संदर्भात बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. अकोला जिल्ह्यातील अधिकाधिक व्यवहार कॅशलेस व्हावेत. यादृष्टीने सेक्टरनिहाय प्रशिक्षण घेण्यात येणार आहेत. मंगळवारपासून शहरात तसेच ग्रामीण भागातही मोहिमेला गती देण्यात येणार आहे. व्यापारी, ग्राहक यांचे कॅशलेस सेवेबाबत प्रबोधन करण्यासाठी ५०० स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ते संबंधितांना
सिस्टीम वापरण्याबाबत माहिती देतील. २६ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील ६० ते ७० टक्के व्यवहार कॅशलेस व्हावेत अशी रुपरेषा ठरवली जात आहे.
आरटीजीएस, पेटीएम, एनईएफटी, डेबीट कार्ड, क्रेडिट कार्ड, रुपे कार्ड, स्वाईप मशीन्स आदी पर्याय उपलब्ध आहेत त्याद्वारे व्यवहाराला गती मिळाल्यास चलनाची चणचण भासणार नाही, याकडेही ग्राहकांचे लक्ष वेधण्यात येत आहे. स्टेट बँकेला चलन मिळण्यामध्ये अडचण येत असल्याने अन्य बँकांच्या शाखांना चलन मिळण्यामध्ये अडचण जात आहे. नोटबंदीच्या निर्णयाला महिना झाला तरी शहरातील काही एटीएम समोरील रांगा अद्याप कायम
आहेत. आडीबीआयसारख्या काही बँकांची एटीएम तर अद्याप सुरु झालेली नाहीत. त्यातून मार्ग स्वाईप मशीन विविध ठिकाणी बसवण्यात येत आहे. स्टेट बँकेची यंत्रणा या कामाला लागली आहे. प्रोव्हिजन स्टाेअर्स, मेडिकल शॉपमध्ये ग्राहकांच्या सोयीसाठी स्वाईप मशीन बसवून देण्यात येत आहेत. बहुतांश पेट्रोलपंपावर सोय केली आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार आरटीजीएस किंवा धनादेशाद्वारे करण्यात येत आहेत. शैक्षणिक संस्थांचाही यामध्ये पुढाकार आहे.
मुख्यमंत्र्यांचे व्हिडीआे कॉन्फरंसिंग
‘रोख विरहित महाराष्ट्र’ संदर्भात गुरुवार, १२ डिसेंबरला सकाळी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिआे कॉन्फरंसिंगद्वारे संवाद साधला. रोख विरहित व्यवहारांना जिल्ह्यामध्ये गती देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्याची माहिती देण्यात आली. लीड बँकेचे प्रबंधक तुकाराम गायकवाड, मनपा आयुक्त अजय लहाने, जिल्हा उपनिबंधक माळवे या प्रसंगी उपस्थित होते, अशी माहिती प्राप्त झाली.
आरडीजी महाविद्यालयात स्वाईप मशीन : राधादेवीगोयनका महिला महाविद्यालयामध्ये विद्यार्थिनींच्या सोयीसाठी स्वाईप मशीन बसवण्यात आली आहे. विद्यार्थिनींना ऑनलाईन व्यवहाराविषयी तज्ज्ञांकडून माहिती देण्यात येत आहे. महाविद्यालयातील विद्यार्थिनींची त्यामुळे सोय झाली आहे. अन्य शैक्षणिक संस्थांनी हा कित्ता गिरवल्यास फायद्याचे ठरेल.
ऑनलाईन सेवेविषयी प्रबोधन
-गावागावामध्ये व्यापारी,शासकीय कर्मचारी, विविध ग्राहक यांची वर्गवारी करुन कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य द्या, या बाबत माहिती देण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अकोला जिल्हा या बाबतीत अव्वल ठरेल, यादृष्टीने पावले टाकली आहेत.
तुकाराम गायकवाड, प्रबंधक, लीड बँक, अकोला.
पैसा टाकण्यात अडचणी
-मागणीनुसार चलन उपलब्ध होत नसल्याने अजूनही एटीएममध्ये पुरेसा पैसा टाकण्यात अडचण येत आहे. तरीही स्टेट बँकेचे बहुतांश एटीएम सुरू आहेत. अडचणीतून मार्ग काढून सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न आहे.
एस.डी. बोर्डे, मुख्य शाखा प्रबंधक, स्टेट बँक, अकोला.
२५ % ऑनलाईन
-नोटबंदीच्या निर्णयानंतर स्वाईप मशीन लावल्या आहेत. शहरातील कार केअर सेंटर, वजिफदार, जय गुरुदेव, प्राईड सर्व्हो याठिकाणि स्वाईप मशीन लावल्या आहेत. हळुहळु अन्य पंपांवरही त्या लावल्या जातील. सध्या २५ टक्के व्यवहार ऑनलाईन झाले आहेत. राहुलराठी, अध्यक्ष, पेट्रोल डिलर्स असो.
व्यवसाय ४० टक्क्यांवर
-थोककिराणाबाजारातील व्यापार नोटबंदीनंतर प्रचंड प्रमाणात प्रभावित झाला आहे. गेल्या महिनाभराचा विचार करता ४० टक्केच व्यवसाय होत आहे. व्यापाऱ्यांनी स्वाईप मशीन लावण्याचे तसेच बँक टू बँक व्यवहार करण्याचे आवाहन करत आहोत. परंतु त्याला वेळ लागणार आहे.
- रमाकांत खेतान, उपाध्यक्ष,फेडरेशन ऑफ असो.ऑफ महाराष्ट्र.
मुबलक पैसा हवा
-कृषी उत्पन्नबाजार समितीमध्ये ऑनलाईन व्यवहार होत असले तरी जितका माल बाजारामध्ये येतो आहे त्याच्या ०.५ टक्के रक्कम देखील उपलब्ध होत नाही. तरी देखील व्यवहार सुरू आहेत. तालुका आणि ग्रामीण भागामध्ये खूप अडचणी येत आहेत. चलन पुरवठा होण्याची आवश्यकता आहे.
- आेमप्रकाश गोयनका, उपाध्यक्ष,ग्रेन मर्चंट असोसिएशन, अकोला.
एटीएमवर नागरिकांच्या अशा रांगाच रांगा लागल्या अाहे.
बहुतांश एटीएममधून दोन हजाराच्या नोटा अधिक प्रमाणात मिळत आहेत. त्यामुळे ग्राहकांची अडचण होत आहे. लहानसहान व्यवहारांसाठी दोन हजार रुपयांचे सुटे करावे लागत आहेत. शंभर, दोनशे रुपयांचा व्यवहार होत असल्यास अठराशे रुपये देणे दुकानदाराला शक्य नाही. त्यातून वाद होत आहेत. तसेच शहरामध्ये पाचशेच्या नोटा काहीअंशी मिळू लागल्या आहेत. त्या मुबलक मिळाल्यास सोयीचे होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...