आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • On Festivel Season, Akola Municipal Corporation Behave Very Cruel Manner

ऐन दिवाळीत मनपाचा ‘राडा’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गांधी राेडवरील साहित्य विक्रेत्यांना हटवण्याच्या प्रयत्नानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते.
अकोला - आनंद अन् उत्साहाची उधळण करणारी दिवाळी ही गोरगरिबांसाठी रोजगाराचे साधनही ठरते. चार दिवसांवर आलेल्या दिवाळीत साहित्याची विक्री करण्यासाठी आजूबाजूच्या गावांवरुन कामगार आले आहेत. हे कामगार गांधी रोडवर आपल्या साहित्याची विक्री करतात. मात्र, महापालिका प्रशासनाने गुरुवारी या व्यावसायिकांवर ‘ट्रॅफिक जाम’च्या नावाखाली कारवाई करण्याचा प्रयत्न केला.

दोन महिने पणती, देवीच्या मूर्ती, बोळकी, खेळभांडी, फडे, बत्तासे, लाह्या आदी साहित्य बनवल्यानंतर दिवाळीत गांधी चौक, जैन मंदिर परिसर, गांधी रोड, खुले नाट्यगृह परिसर दिवाळीच्या चार ते पाच दिवस लघू व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांनी फुलून गेलेला असतो. त्यामुळे या भागातील वाहतूक या काळात जाम होते. ही प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, वाहतुकीचा खाेळंबा हाेत असल्याचे सांगत मागील वर्षापासून या लघू व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उचलला जात आहे.

मागच्या दिवाळीतही बोळक्यावर बुलडोझर चालवण्यात आले होते. या वर्षीही दिवाळी सहा दिवसांवर आली असताना दुकाने थाटली गेली आहेत. प्रशासनाने या लघू व्यावसायिकांना भाटे क्लब येथे दुकाने थाटण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. परंतु, या भागात चालणारी दादागिरी आणि त्यामुळे होणारा त्रास लक्षात घेऊन, लघू व्यावसायिकांनी या जागेत व्यवसाय करण्यास नकार दिला. परिणामी, महापालिका प्रशासनाने नोव्हेंबरला या लघू व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला. प्रशासनाच्या आदेशान्वये अतिक्रमण विभागाने गांधी चौक ते जैन मंदिर मार्गावर साहित्य विक्रीसाठी बसलेल्या लघू व्यावसायिकांचा माल जप्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु, विविध वस्तूंची विक्री करणाऱ्या महिला जेसीबी मशीनसमोर उभ्या ठाकल्याने पथकाला कारवाई थांबवावी लागली. परंतु, यादरम्यान पथकाने विविध वस्तू आणि टेबल जप्त केले. गांधी चौकात झालेल्या या कारवाईमुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण होते. दरम्यान, लघू व्यावसायिकांनी महापालिका कार्यालय गाठून पदाधिकारी अधिकाऱ्यांना व्यवसाय करू देण्याची विनंती करण्याचा प्रयत्न केला. परंतु, महापालिकेत एकही पदाधिकारी अधिकारी उपस्थित नव्हते. दरम्यान, विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण, नगरसेवक दिलीप देशमुख, युवा नेते गौतम गवई, अफसर कुरेशी, सामाजिक कार्यकर्ते मोनू घुमन यांनी क्षेत्रीय अधिकारी जी. एम. पांडे यांच्याशी चर्चा करून वातावरण शांत केले.

"वन-वे'चा केवळ फलकच
दिवाळीसणामुळे गांधी मार्गावर लघू व्यावसायिक दरवर्षीच येतात. त्यामुळे किमान दिवाळीच्या पाच ते सात दिवसांच्या काळात या मार्गावरील वाहतूक एकेरी केल्यास वाहतूक खोळंबण्याच्या प्रकाराला आळा बसू शकतो. परंतु, एकेरी वाहतूक करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनानेही घेतला नाही किंवा महापालिकेने तशी मागणीही केली नाही. विशेष म्हणजे गांधी मार्गावरून एकेरी वाहतुकीचा फलक वर्षभरापासून केवळ लावलेला आहे.

साजिदखानसह अनेक जण धावले मदतीला
सामाजिककार्यकर्ते मोनू घुमन यांनी लघू व्यावसायिकांना चार दिवस व्यवसाय करू देण्याची मागणी केली. वाहतुकीत अडथळा येऊ देणार नाही, याबाबत हमी दिली. परंतु, काहीही फायदा झाला नाही. यादरम्यान, विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण यांनी हजेरी लावून लघू व्यावसायिकांना हटवल्यास खबरदार, असा इशारा दिला. तसेच याबाबत आयुक्त अजय लहाने यांची शुक्रवारी भेट घेऊ, असे आश्वासनही या वेळी लघू व्यावसायिकांना दिले.

हिंदुत्ववाद्यांचे केवळ भ्रमणध्वनी
हिंदुत्ववादीपक्षाचे नगरसेवक तसेच पदाधिकारी म्हणवून घेणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या आदेशान्वये कारवाई करणाऱ्या पथकातील अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून कारवाई बंद करण्याचा इशारा दिला. परंतु, घटनास्थळी कोणताही पदाधिकारी हजर झाला नाही.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे केवळ आदेश
आयुक्तबैठकीमुळे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या पश्चात असलेल्या अधिकाऱ्यांनी लघू व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे कडक आदेश अतिक्रमण विभागाला दिले. अतिक्रमण पथकाने कारवाईही सुरू केली. परंतु, कारवाई करताना होणारा त्रासही त्यांना सहन करावा लागला. या वेळी मात्र, शहरात असलेले वरिष्ठ अधिकारी हातात हात धरून बसले होते.

या जागाही उपलब्ध होऊ शकतात
भाटेक्लबवर दादागिरीमुळे लघू व्यावसायिकांनी व्यवसाय करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या जागेव्यतिरिक्त जागा प्रशासनाला उपलब्ध करून देता येणे शक्य आहे. प्रमिलाताई ओक सभागृहामागील शाळेचे प्रांंगण, होमगार्डच्या बाजूला बंद पडलेल्या शाळेचे प्रांगण, अकोला क्रिक्रेट क्लबचा फटाके विक्रीनंतरचा राहिलेला भाग, भरतिया हॉस्पिटलमधील मोकळी जागा आदी जागाही या लघू व्यावसायिकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध होऊ शकतात.

आयुक्तांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
आयुक्तअजय लहाने दौऱ्यावरून शुक्रवारी अकोल्यात येत आहेत. गुरुवारी झालेल्या या प्रकारानंतर आता ते लघू व्यावसायिकांवर कारवाई करतात की भाटे क्लबव्यतिरिक्त आणखी पर्यायी जागा या लघू व्यावसायिकांना उपलब्ध करून देतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कायदा सुव्यवस्था धोक्यात
शहरातीलकायदा सुव्यवस्था यापूर्वीच बेलगाम झाली आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येवर झालेल्या या कारवाईमुळे वातावरणात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे यापुढे अशी कारवाई सुरू राहिल्यास शहरातील कायदा सुव्यवस्था ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पदाधिकाऱ्यांनी फिरवली पाठ
भाजप-सेनेचीसत्ता असलेल्या महापालिकेत न्याय मागण्यासाठी गेलेल्या या लघू व्यावसायिकांना पदाधिकारी महापालिकेत नसल्याने कुणालाही भेटता आले नाही. विशेष म्हणजे लघू व्यावसायिकांवर सुरू असलेल्या कारवाईमुळे तणाव निर्माण झाल्याची माहिती या पदाधिकाऱ्यांना अनेकांनी भ्रमणध्वनीवरून दिली. परंतु, पदाधिकाऱ्यांनी या लघू व्यावसायिकांकडे पाठ फिरवली.

भाटे क्लबची जागा नको
प्रशासनानेया व्यावसायिकांना भाटे क्लबवर व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे. परंतु, या भागात होणाऱ्या दादागिरीमुळे व्यवसाय करता येत नाही. जेवढे कमावले तेवढे पैसे दादागिरीमुळे द्यावे लागतात. त्यामुळे आम्हाला भाटे क्लबऐवजी दुसरी जागा द्या, अशी मागणीही लघू व्यावसायिकांनी केली.