आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश मंडळांना परवानग्यांसाठी एक खिडकी योजना, जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - गणेश मंडळांना परवानग्यांसाठी एका विभागातून दुसऱ्या विभागात जाण्याची गरज नाही. त्यासाठी यंदापासून एक खिडकी योजना सुरु करण्यात येणार आहे. ही सोय महापालिकेच्या इमारतीत असणार आहे, अशी ग्वाही जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी दिली. ते मंगळवारी नियोजन भवनात आयोजित जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय् होते. 
 
२५ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहिल, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, मी स्वत: मातीपासून बनविलेल्या मूर्तीची स्थापन करणार आहे. उत्सवाच्या काळात स्वच्छतेवर भर दयावा. पर्यावरण सामाजिक दृष्टया नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या गणेश मंडळांना सर्वोत्कृष्ट गणेश मंडळाचा पुरस्कार देण्यात येईल. वैयक्तिक गणपतींच्या विसर्जनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पाण्याचा टँक उभारण्यात येणार आहे. येथे गणेश विसर्जन करावे. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर म्हणाले की, उत्सव काळात सुरक्षेच्याबाबत सर्वतोपरी दक्षता घेतली जाईल. प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी एक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येईल. सोशल मिडियावर कुठल्याही प्रकारची अफवा पसरवू नका. गैरप्रकार आढळल्यास तत्काळ पोलीसांना संपर्क साधा. 

यावेळी हनुमान आखाडा गणेशोत्सव मंडळ अनिकटचे अध्यक्ष संतोष पांडे, अॅड. महेंद्र साहू, नगरसेवक सतीश ढगे यांनी सूचना मांडल्या. बैठकीस महापौर विजय अग्रवाल, आमदार गोवर्धन शर्मा, जिल्हयातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, सचिव सिध्दार्थ शर्मा, पोलीस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधिक्षक विजयकांत सागर, मनपा आयुक्त अजय लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे आदीं उपस्थित होते. प्रास्ताविक अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी केले. यावेळी नियमांबाबत शहर पोलीस विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने यांनी माहिती दिली. सुत्रसंचालन जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक डी.सी.खंडेराव यांनी केले. 
 
सन्मान करा 
गणपती मंडळाना पाहिजे तसा चांगला अनुभव नाही. काही पोलिस अधिकारी अतिरेक करतात. सर्वच गोष्टी नियमांवर बोट ठेऊन होत नसतात. नंबर दोन वाल्यांचा सन्मान करता मग काय हरकत आहे गणपतीवाल्यांचा गणेशोत्वादरम्यान सम्नान केला तर. असे पोलिसांना सांगून आमदार गोवर्धन शर्मा यांनी रात्री उशिरापर्यंत चहाची हॉटेल बंद करण्याच्या सूचना दिल्या. 
बातम्या आणखी आहेत...