आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Only Two Minutes Discussion On Two Hundred Labours

दोनशे कामगारांच्या प्रश्नांवर केवळ दाेन मिनिटांची चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - एमआयडीसीतील एडीएम अॅग्राे कंपनीने दाेनशे कर्मचाऱ्यांना नाेकरीवरून काढत त्यांच्या पाेटावर लाथ मारली. हा सर्व प्रकार राज्याचे उद्याेग राज्यमंत्री प्रवीण पाेटे यांना माहिती असूनही त्यांनी कामगारांच्या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत कंपनीला पाठीशी घालत असल्याचा अाराेप कामगारांनी केला अाहे. एकीकडे बैठकीत उद्याेगातील अडचणी दूर करण्याच्या सूचना केल्या, तर दुसरीकडे कामगारांच्या प्रश्नाची अास्थेने चाैकशी करण्याची अाैपचारिकताही मंत्रिमहाेदयांनी दाखवली नाही. या प्रकाराबाबत नेमका न्याय काेणाकडे मागायचा, असा प्रश्न अाता कामगारांना पडला अाहे.

उद्याेग राज्यमंत्री प्रवीण पोटे मंगळवारी अकोला दौऱ्यावर आले होते. दुपारी १२ वाजता शासकीय विश्रामगृहावर सार्वजनिक बांधकाम, उद्योग, खनिकर्म, पर्यावरण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक झाली. शासकीय विश्रामगृहावर बैठक सुरू असताना एडीएमच्या कामगारांच्या शिष्टमंडळाने कमलेश सिन्हा यांच्या नेतृत्वात मंत्रिमहोदयांची भेट घेतली. कंपनीकडून झालेल्या अन्यायकारक कार्यमुक्तीची निवेदनस्वरूपात तक्रार केली. मात्र, मंत्रिमहोदयांनी चर्चा करण्याचे सोडून दोन मिनिटात विषय निपटवला. हे पाहून घ्या, असे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना सांगितले. या प्रकाराने विश्रामगृह परिसरात उभ्या असलेल्या कामगारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्याचे उद्योग मंत्री एमआयडीसीमध्ये येणार असल्याने तेथेच मंत्रिमहोदयांची भेट घेऊन कंपनीने केलेल्या अन्यायकारक कार्यमुक्तीच्या विरोधाचा पाढा वाचण्याचे कामगारांनी ठरवले होते. मात्र, मंत्रिमहोदय एमआयडीसीत फिरकलेच नाही. त्यामुळे कामगारांना आपला न्याय मागता आला नाही. त्यानंतर दुपारी वाजता भाजप कार्यकर्ता मेळाव्यास त्यांनी उपस्थिती दर्शवली. शासकीय विश्रामगृहात आयोजित या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. के. सरोवते, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी व्ही. जे. मुरुमकर, स्थानिक व्यवस्थापक डी. एस. इंगळे, कार्यकारी अभियंता कुरापे, अधीक्षक अभियंता कुलकर्णी, उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निरंजन गाढेकर उपस्थित होते. तक्रार येणार नाही याची दक्षता घ्या, कामे प्रलंबित ठेवू नये, असे आदेश दिले.

कामे होत नसतील तर घरी बसा
रस्तादुरुस्ती, नवीन रस्त्यांची कामे, फुटपाथ या कामांशी संबंधित निधीची उपलब्धता, निविदांची प्रकरणे, जिल्हा नियोजनअंतर्गत कामे जलदगतीने पूर्ण करण्यात यावीत, अशी सूचना राज्यमंत्री पोटे यांनी केली. तसेच केंद्र सरकारच्या निधीतून केल्या जाणाऱ्या नवीन कामांचे प्रस्ताव तत्काळ मार्गी लावण्यात यावेत, याशिवाय अनुकंपाच्या प्रकरणांचा निपटारा तातडीने करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी केली.

कामगारांनी केली निदर्शने
कोणत्याहीप्रकारची नोटीस देता एमआयडीसीमधील एडीएम अॅग्रो इंडस्ट्रिजच्या व्यवस्थापनाने २०० कामगारांना कामावरून कमी केले. कोणत्याही प्रकारची नोटीस देताच कामावरून कमी केल्यामुळे कामगारांनी कंपनीसमोरच सोमवारी रात्री ११ वाजता ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर परत मंगळवारी सकाळी कंपनीसमोर निदर्शने केली. तसेच कंपनीने कामगारांना पुन्हा कामावर सामावून घ्यावे कंपनी बंद करू नये, अशी मागणी कामगारांनी केली अाहे.

तीव्र अांदाेलन छेडण्याचा इशारा
एडीएम अॅग्रो कंपनीकडून न्याय मिळाला नाही तर एमअायडीसीमध्ये तीव्र अांदाेलन छेडण्याचा इशारा कामगारांनी दिला अाहे. मलकापुरमध्ये सायंकाळी साडेसहा वाजता झालेल्या कामगारांच्या बैठकीत हा निर्णय कामगारांच्या एकमताने घेण्यात अाला.
मंगळवारी शासकीय विश्रामगृहावर सार्वजनिक बांधकाम, उद्योग, खनिकर्म, पर्यावरण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक झाली.

भूखंडाचे ले-आऊट करून घ्या
एमआयडीसीलापाणीपुरवठ्याबरोबरच वीजपुरवठा, अंतर्गत रस्ते याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. भूखंडाचे ले-आऊट करून त्याचे तातडीने वितरण करण्याची प्रक्रिया वेगाने करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी दिल्या. लघू उद्योजकांशी संबंधित प्रकरणांचा जिल्हा उद्योग केंद्राने तातडीने निपटारा करावा. तसेच उद्योगाचे प्रशिक्षण देण्यावर भर द्यावा. उद्योगासाठी लागणाऱ्या कर्जाची प्रकरणे तत्काळ मार्गी लावावीत, अशी सूचनाही पोटे यांनी अधिकाऱ्यांना केली. सार्वजनिक बांधकाम, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे यांना निवेदन देताना एडीएम अॅग्रो कंपनीचे कामगार.
छायाचित्र: सार्वजनिक बांधकाम, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे यांना निवेदन देताना एडीएम अॅग्रो कंपनीचे कामगार.