आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समृद्धीसाठी बळीराजा सुखावणे गरजेचे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - देशाच्या विकासाचा, समृद्धीचा विचार करताना खेड्यातील लोकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. देशाला समृद्ध करायचे असेल, तर गावातील लोकांकडे लक्ष वळवावे, गावात राहणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था समजून घ्यावी. देशाच्या समृद्धीसाठी सर्वांचा पोशिंदा बळीराजा सुखावणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन नागपूर येथील प्रा. डॉ. भास्करराव विघे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे शुक्रवार, ११ डिसेंबर रोजी तिसरे राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या तत्त्वप्रणालीनुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने तिसऱ्या राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, यंदाचे हे संमेलन बळीराजाला समर्पित करण्यात आले आहे. संमेलनाच्या उद््घाटन सत्रात संमेलनाध्यक्ष डॉ. भास्करराव विघे यांनी शेतकऱ्यांच्या स्थितीवर भाष्य केले. तुकडोजी महाराज यांचे साहित्य हे कृतिशील असून, त्याचे प्रत्येकाने आचरण केले पाहिजे. महाराजांच्या साहित्यात वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. या साहित्याची, या दृष्टिकोनाची सध्याच्या समाजाला गरज आहे. राष्ट्रसंतांनी शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून साहित्याची निर्मिती केली आहे. शेतकऱ्यांना दुर्लक्षित करून देशाची प्रगती साधता येत नाही. सध्याची शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी राष्ट्रसंतांच्या साहित्याचे आचरण आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. संमेलनात राष्ट्रसंतांच्या साहित्याचे मंथन होणार आहे. मात्र, या साहित्याचा ज्या पैलूतून विचार व्हायला हवा, तो होत नाही, अशी खंत संमेलनाचे उद््घाटक मोझरी येथील बबनराव वानखडे यांनी व्यक्त केली. त्यांनी ग्रामगीतेत तसेच विविध साहित्यांमधून महाराजांनी सांगितलेल्या विचारांचा उलगडा केला. तसेच राष्ट्रसंतांच्या साहित्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन विविध उदाहरणांवरून स्पष्ट केला. एक चांगला माणूस घडण्यासाठी ग्रामगीतेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येक शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण देण्यासाठी ग्रामगीता शिकवली पाहिजे, असे मत शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांनी मांडले. आजची पिढी उत्तम घडण्यासाठी प्रत्येक शाळा, महाविद्यालयात राज्य शासनाने राष्ट्रसंतांचे अध्यासन केंद्र सुरू करावे, असे ते म्हणाले.

अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ, मोझरीचे सरचिटणीस बबनराव वानखडे यांनी राष्ट्रसंतांच्या जीवनातील विविध प्रसंगांना उजाळा देत अनेक पैलू उलगडले. शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, कृष्णा अंधारे यांनी विचार मांडले. आयोजन समितीचे अध्यक्ष रामेश्वर बरगट यांनी प्रास्ताविकात संमेलन कृतिशील होण्याचे मत व्यक्त केले. उद््घाटन सत्राचे सूत्रसंचालन गोपाल गाडगे यांनी केले, तर नितीन ढोरे यांनी आभार मानले. या वेळी आचार्य हरिभाऊ वेरुळकर, एकनाथ दुधे, आमले महाराज, तिमांडे महाराज, अॅड. रामसिंग राजपूत, सुधा जवंजाळ, मथुरा नारखेडे, अरुण सालोडकर, डॉ. सीमा तायडे, अॅड. वंदन कोहाडे, अॅड. संतोष भोरे उपस्थित होते.

ग्रंथदिंडीने वाजला बिगुल : तिसऱ्याराज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचा बिगुल ग्रंथदिंडीने वाजला. ग्रंथ दिंडीची सुरुवात राजराजेश्वर मंदिरापासून झाली. राजराजेश्वर संस्थानचे विश्वस्त यांच्या हस्ते पूजन करून मंदिरापासून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. जयहिंद चौक, सिटी कोतवाली चौक, गांधी रोडमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे दिंडीचा समारोप झाला. या ग्रंथदिंडीत आई रेणूका माता महिला भजनी मंडळ, नवनाथ महिला भजनी मंडळ, संत गजानन महाराज महिला भजनी मंडळ, महाकाली महिला भजनी मंडळ यांचा सहभाग होता. टाळ, मृदंग, भजनांच्या ठेक्यावर, राष्ट्रसंतांच्या जयघोषात ग्रंथदिंडी निघाली. या वेळी डॉ. भास्करराव विघे, आमले महाराज, तिमांडे महाराज, अॅड. रामसिंग राजपूत, मथुराताई नारखेडे, सेवा समितीचे अध्यक्ष रामेश्वर बरगट, डॉ. प्रकाश मानकर, अॅड. संतोष भोरे, ज्ञानेश्वर साकरकर, गोपाल गाडगे, विजय वाहोकार, श्रीपाद खेळकर, गजानन इचे, गणेश चौंडीकर, प्रल्हाद निखाडे, माणिक शेळके, डॉ. राजीव बोरकर, अजय कणसरे, राजेंद्र झामरे, समाधान बंड यांच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीचे पदाधिकारी, गुरुदेव प्रेमी, महिला उपस्थित होते.

भजनांनी पसरले चैतन्य
दुपारी उद्घाटन सत्रानंतर राष्ट्रीय भजन गायन आणि सायंकाळी झालेल्या भजनसंध्या कार्यक्रमाने वातावरणात चैतन्य पसरले. दुपारी झालेल्या कार्यक्रमात चंद्रशेखर चतारे, प्रल्हाद निखाडे आणि रामेश्वर म्हसाळ यांनी बहारदार भजने सादर केली. त्यांना पवन सिडम सागर म्हसाळ यांनी तबल्यावर साथ दिली. सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात प्रा. डॉ. राजीव बोरकर, प्रा. सुनील कोल्हे, प्रा. सोपान वतारे, प्रा. सुनील पारिसे यांनी एकापेक्षा एक सरस भजने म्हटली. त्यांना अनिरुद्ध दळवी आणि अतुल डोंगरे यांनी तबल्यावर साथ केली.

बातम्या आणखी आहेत...