आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत सदस्याची हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूर्तिजापूर- दोन भावांमध्ये शेतीच्या कारणावरून सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत सदस्याची सरपंच महिलेच्या पुतण्याने कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केल्याची घटना तालुक्यातील तुरखेड येथे २४ जुलैच्या रात्री ११.३० वाजता घडली.
मूर्तिजापूर तालुक्यातील तुरखेड येथे शुक्रवार, २४ जुलै रोजी रात्री ११.३० वाजता सरपंच महिलेचा पुतण्या दिनेश साहेबराव खंडारे त्याचा भाऊ विनोद खंडारे यांच्यामध्ये शेतीच्या जुन्या वादातून भांडण सुरू होते. या वेळी ग्रामपंचायत सदस्य या नात्याने विलास हरिभाऊ बडे वय ४५ हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता दिनेश खंडारे याने पाठीमागून येऊन कुऱ्हाडीने विलास बडेच्या डोक्यावर आणि हातावर वार केले. जखमी अवस्थेत विलास बडेला उपचारासाठी मूर्तिजापूर येथील सामान्य उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना अकोला येथे पाठवण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, विलास बडे यांचा अकोला येथे पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला.
दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी नंदकुमार काळे, ठाणेदार पी. जे. अबदागिरे, एपीआय वाघमारे, पोलिस पाटील साहेबराव ठाकरे, एएसआय गोपाल शर्मा यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. हत्येनंतर दिनेश खंडारे फरार झाला आहे.

याप्रकरणी जयंत गणेशराव वानखडे यांच्या फिर्यादीवरून मूर्तिजापूर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार अबदागिरे यांच्या मार्गदर्शनात एपीआय एम. ए. वाघमारे, गोपाल शर्मा, शिवानंद मुळे, गणेश पांडे, संदीप गुंजाळ करत आहेत. या हत्याकांडामुळे गावामध्ये खळबळ उडाली अाहे.

तुरखेड येथील ग्रामपंचायत सदस्याची हत्या झाल्यानंतर घटनास्थळाची पाहणी करताना एसडीपीओ पोलिस कर्मचारी. इन्सेट : मृतक विलास बडे