आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासनाकडून अधिक निधी घेऊन बुलडाण्याला गतवैभव मिळवून देऊ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - नियोजन समितीच्या बैठकीला येत होतो तेव्हाचे बुलडाणा शहर आणि आताचे शहर यामध्ये आता अनेक बदल झाले अाहेत. त्यामुळे बुलडाण्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तसेच ब्रिटीशकालीन संगम तलाव हे पर्यटन क्षेत्र होण्याकरिता निधी उपलब्ध करून देणार, असे आश्वासन राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारीत योजना सन २०१६-१७ अंतर्गत शहरातील विविध प्रभागात प्रस्तावित दोन कोटी २२ लाख रुपये किमतीच्या कामांचे ५० लाख रुपयांच्या रस्ता अनुदानाच्या कामाचे उद््घाटन गुरुवार, २० जुलै रोजी नगर परिषदेच्या प्रांगणात करण्यात आले. या वेळी पालकमंत्री फुंडकर बोलत होते. 
 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा नजमुन्निसा बेगम मो. सज्जाद होत्या. तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उमाताई तायडे, महिला बालकल्याण सभापती श्वेता महाले, भाजपचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, भारिप बमसंचे जिल्हाध्यक्ष भीमराव तायडे, तहसीलदार सुरेश बगळे, नगरसेवक संजय गायकवाड, उदय देशपांडे, भाजप शहराध्यक्षा विजया राठी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकात मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांनी बुलडाणा नगरपालिकेचे ११३ कोटीचे बजेट असून, ४,००० वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम झाले आहे. संगम तलावासाठी तीन कोटी मंजूर झाले. सात कोटी रुपये मिळणे प्रलंबित आहे. पर्यावरण खात्याकडे पर्यटनाचे काम प्रलंबित आहे. त्यामुळे राहिलेला निधी लवकरात लवकर मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच हा ब्रिटीशकालीन वारसा जपण्याचा प्रयत्न पालिका करत असल्याचे सांगितले. 
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजिम नवाज राही यांनी केले, तर नगरपालिका उपाध्यक्ष विजय जायभाये यांनी आभार मानले. कार्यक्रमाला बांधकाम सभापती विजय गवई, महिला बाल कल्याण सभापती वैशाली वावरे, आरोग्य स्वच्छता सभापती उमेश कापुरे, शिक्षण समिती सभापती दीप सोनुने, पाणी पुरवठा सभापती गौसियाबी शेख सत्तार, भाजप गटनेता अरविंद होंडे, काँग्रेस गट नेता आकाश दळवी, वैशाली इंगळे, रजियाबी शे. रहिम नईम कुरेशी, असमा याकूब शेख, आशिष जाधव आदींची उपस्थिती होती. 

नगराध्यक्षा नजमुन्नीसा बेगम यांनी आपल्या भाषणातून शहराच्या विकासाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यावर बोलताना पालकमंत्री म्हणाले की, बुलडाणा शहराच्या इतिहासात प्रथमच नगराध्यक्ष पदावर एका मुस्लिम महिलेची निवड झाली, ही शहरासाठी गौरवाची बाब आहे. शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वांनी त्यांना सहकार्य करावे. नगराध्यक्षांचे भविष्य चांगले असल्याचेही पालकमंत्री फुंडकर म्हणाले. या वेळी नगराध्यक्षा नजमुन्निसा बेगम मो. सज्जाद, जि. प. अध्यक्षा उमाताई तायडे, धृपदराव सावळे आणि जालिंदर बुधवत आदी मान्यवरांचीही या वेळी भाषणे झाली. 

चार वर्षांचा व्हिजन आराखडा तयार करा 
जिल्ह्यातील अन्य शहराला दिशा देणारे शहर, अशी या शहराची ओळख निर्माण करण्यासाठी पुढील चार वर्षांचा विकास आराखडा तयार करा. जी विकासकामे करायची आहेत, त्याचे सविस्तर प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करा. हे प्रस्ताव मंजूर करून विकास कामांसाठी जास्तीत-जास्त निधी आणण्याच्या प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही पालकमंत्री फुंडकर यांनी दिले.