आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाकीच्या मदतीला "पोलिस मित्र'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पोलिसमित्र, शांतता समितीचे सदस्य पोलिस यांची सामूहिक प्रभातफेरी सोमवारी सकाळी निघाली. यामध्ये २०० पोलिस मित्रांनी सहभाग नोंदवला. आता हे पोलिस मित्र पोलिसांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. रात्रीची गस्त बंदोबस्त काळात पोलिस मित्र नियमितपणे रस्त्यावर उतरून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणार आहेत.
पोलिस महासंचालक यांनी सर्व पोलिस ठाण्यांमध्ये पोलिस मित्र संकल्पना राबवण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांना दिले. त्याला अनुसरून पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये किमान ५० पोलिस मित्रांची नियुक्ती करण्याचे आदेश ठाणेदारांना दिले. त्यानुसार पोलिस ठाण्यांमध्ये पोलिस मित्र बनवण्यात आले. काही पोलिस ठाण्यांनी पोलिस अधीक्षकांच्या आदेशाचे काटेकोर पालन केले, तर काही पोलिस ठाण्यांमध्ये अजूनही ही संकल्पना राबवण्यात दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे. त्यात खदान पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक छगन इंगळे यांनी त्यांच्या पोलिस ठाण्याच्या अंतर्गत २३८ पोलिस मित्रांची निवड केली आहे.
त्यांची मीटिंग घेऊन त्यांना पोलिस मित्रांची भूमिका आणि पोलिस प्रशासनाला करावयाच्या मदतीबाबत त्यांना मार्गदर्शन करून पोलिसांप्रति त्यांचा विश्वास दृढ व्हावा म्हणून, सोमवारी सकाळी खदान परिसरातून प्रभातफेरी काढली लोकांना पोलिस मित्रांविषयी अवगत केले. या वेळी ठाणेदार छगन इंगळे, सहायक पोलिस निरीक्षक पी. आर. धुमाळ, सहायक पोलिस निरीक्षक मालती कायटे, पोलिस उपनिरीक्षक रामराव राठोड, छाया वाघ, मधुकर पाटील, पोलिस कॉन्स्टेबल अजय गाडगे, अनिल धनभर, गजानन दामोधर, संजय येलोणे, गोकूळ चव्हाण, हातोले यांच्यासह शांतता समितीचे सदस्य कन्हैयालाल रंगवाणी, अनिल गिरपाल, स्वामी, विवेक चव्हाण, पोलिस मित्र खदान पोलिस ठाण्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रभातफेरीमध्ये सहभाग नोंदवला होता.

मोफत प्रशिक्षण, दर रविवारी घेणार वर्ग : ठाणेदार इंगळे
सामाजिकदायित्व म्हणून आपण पोलिस मित्रांतून त्यांचे सुप्त गुण हेरून त्यांना पोलिस दलात आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी त्यांना मोफत प्रशिक्षण देऊन, दर रविवारी त्यांचे वर्ग घेणार आहोत, असे खदान पोलिस ठाण्याचे ठाणेदार छगन इंगळे यांनी सांगितले. ते म्हणाले की, पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांच्या प्रेरणेतून आपण सामाजिक दायित्व निभावणार आहोत. भविष्यात पोलिस दलात कामाला येऊ शकतात, या उद्देशाने आपण १२ वी उत्तीर्ण असलेले तरुण, ज्यांची उंची आणि छाती पोलिस भरतीयोग्य आहे, अशांची निवड प्रशिक्षणासाठी करणार आहोत. त्यांना दर रविवारी सकाळी ७.३० वाजता गोरक्षण रोडस्थित दत्त कॉलनीत असलेल्या खुल्या मैदानावर त्यांना भरतीपूर्व प्रशिक्षण देणार आहोत. मैदानी सरावापासून लेखी परीक्षेचे संपूर्ण मार्गदर्शन करणार आहोत. हे सर्व मोफत करण्यात येणार आहे.

गस्तीसाठी मदत
पोलिस मित्र रात्रीच्या गस्तीत पोलिसांची मदत करत आहेत. दरराेज पोलिस मित्रांच्या ड्यूटी लावून त्यांना कामाविषयी माहिती देण्यात येऊन पोलिसांसोबत रात्रीच्या गस्तीत पोलिसांच्या हातात हात देऊन कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

गणेशोत्सव बंदोबस्त, तणावसदृश परिस्थितीत मिळणार मित्रांची मदत
गणेशोत्सव बंदोबस्त आणि तणावसदृश परिस्थितीत पोलिसांच्या मदतीला पोलिस मित्रांची मदत घेण्याचे आदेश पोलिसांना आहेत. पोलिस मित्र तयार झाल्यानंतर प्रत्येक पोलिस ठाणे त्यांच्या सोयीनुसार पोलिस मित्रांची मदत घेणार आहेत. खदान पोलिस ठाण्यांतर्गत २३८ पोलिस मित्र बनवण्यात आले असून, ५०० पोलिस मित्र प्रत्येक मोहल्ल्यातून बनवणार आहोत, असे ठाणेदार छगन इंगळे म्हणाले.

आपल्या मोहल्ल्यावर ठेवतील पोलिस मित्र नजर
पोलिसांचे संख्याबळ कमी आहे. त्यामुळे पोलिसाच्या खांद्याला खांदा लावून पोलिस मित्र काम करणार आहेत. प्रत्येक क्षेत्रातील निष्णांत पोलिस मित्र म्हणून समावेश करण्याला पोलिसांनी प्राथमिकता दिली आहे. त्यामुळे एखादी घटना घडल्यास त्या त्या क्षेत्रातील पोलिस मित्रांची तपासकामी मदत होणार आहे. रात्री दिवसा पोलिस मित्र गस्त घालणार आहेत. आपआपल्या मोहल्ल्यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक असतील, नवीन भाडेकरू आले असतील, मुलींची छेडछाडीचे प्रकार होत असतील, अवैध धंदे सुरू असतील, तर तेथे राहणाऱ्यांना ते माहीत असतात. त्यानुसार पोलिस मित्र पोलिसांना कळवतील आणि पोलिस चौकशी करून कारवाई करणार आहेत.
पोलिस मित्र, शांतता समितीचे सदस्य पोलिस यांची सामूहिक प्रभातफेरी सोमवारी सकाळी काढण्यात आली. यामध्ये २०० पोलिस मित्रांनी सहभाग नोंदवला.