आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकूनही टेबल वाजला तर लक्षात ठेवा, पोलिस ठाण्यांत अशीही अंधश्रद्धा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- एक व्यक्ती तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात जातो. स्टेशन डायरीवर कर्तव्यावर असलेला ठाणे अंमलदार कामात असतो. त्यामुळे तक्रारदार व्यक्ती त्यांच्यासमोर असलेल्या बाकड्यावर बसतो. रिकामा माणूस काहीतरी हालचाल करणारच म्हणून सहज त्याचे बोटे हळूच टेबलवर थिरकतात. टेबल वाजतो. तोच ठाणे अंमलदाराचा राग अनावर होतो आणि तक्रारकर्त्याला शिव्यांची लाखोली वाहत त्याचा पाणउतारा होतो. तक्रारदार हिरमुसला होतो. पण, आपल्याला पोलिसाने का हासडले हे त्याच्या लक्षात येतच नाही. कारण काय तर टेबल वाजला म्हणून आज त्याच्याकडे जास्त लोकं तक्रारी घेऊन येतील, अशी अंधश्रद्धा त्याच्या डोक्यात पक्की असते.
पोलिसच अंधश्रद्धेच्या गर्तेत असतील तर काय म्हणावे, असा प्रश्न निर्माण होतो. सर्वच पोलिस ठाण्यांमध्ये ही परिस्थिती दिसून येते. पोलिस शिपायापासून तर पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची ही अवस्था असल्याचे दिसून आली. पोलिसांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने अंधश्रद्धाविरोधी कायद्याचे मार्गदर्शन देण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये शासनाच्या वतीने कार्यशाळा घेण्यात येतात. असे असतानाही पोलिसांमधील अंधश्रद्धा अजूनही गेल्याचे दिसून येत नाही. पोलिस ठाण्यातील टेबल जर चुकूनही वाजला तर होणारे कामही होत नाही, सुरुवातच गोड होत नसेल, तर त्याचा शेवट कसा गोड होणार, असे अनुभव तक्रारदारांना येतात.
पोलिसांमध्ये असा समज आहे की, त्याचा टेबल जर वाजला, तर त्यांच्याकडे बहुसंख्य तक्रारी त्या दिवशी येतात. आपण ड्युटीवर असताना आपल्याकडे काहीही तक्रार येऊ नये आणि आपल्या मागे काम लागू नये, म्हणून पोलिस टेबल वाजवू देत नाहीत. पोलिसांच्या या समजविषयी पोलिस ठाण्यात जाणारा माणूस अनभिज्ञ असतो. म्हणून त्याच्या हातातून नकळत हे घडत असते. पण त्याचा बदला त्याला चुकवावा लागत असतो. त्यामुळे तुम्ही जर पोलिस ठाण्यात चुकून एखादवेळेस गेलाच तर टेबल मात्र वाजवू नका.
पीएसआय म्हणाली, टेबल वाजवू नको!
शहरातीलएका मोठ्या पोलिस ठाण्यात पीएसआय म्हणून दोन महिला नुकत्याच रुजू झाल्या आहेत. शुक्रवारी परराज्यातील एक महिला पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आली होती. ती आणि तिचा चिमुकला एका महिला पीएसआयसमोर असलेल्या बाकड्यावर बसली. महिला आपली कैफियत मांडत होती, तर बाजूला दुसरी महिला पीएसआय उभी होती. या मुलाने अचानक टेबलवर हात मारले आणि टेबल वाजला. तोच उभी असलेली पीएसआय त्या चिमुकल्या मुलावर रागावली आणि टेबल वाजवू नको, म्हणून त्या काहीही समजणाऱ्या बाळावर ओरडली.