आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष पथकाच्या छाप्यात दीड लाखांचा गुटखा जप्त, दोघांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा- अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या पथकाने छापा टाकून रविवार, १८ ऑक्टोबर रोजी छुप्या मार्गाने बाजारात विक्रीसाठी जाणारा लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला. या कारवाईदरम्यान एक लाख ४४ हजारांच्या गुटख्यासह दोघांना अटक करण्यात आली. रविवारी पहाटे नांदुरा पोलिस ठाण्यांतर्गत येरळी फाट्यावर ही कारवाई करण्यात आली.
रविवारी सकाळी मारूती ईस्टीम या कारमधून (क्रमांक : एमएच ०६-एम ७१४८) जळगाव जामोद-नांदुरा मार्गावर गुटख्याची वाहतूक केल्या जाणार असल्याची गुप्त माहिती खामगाव येथील अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके यांना मिळाली. या माहितीच्या आधारे अप्पर पोलिस अधीक्षक सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोरकुमार राजपूत, पोलिस हेड काँस्टेबल गुलाबराव काळे, नायब पोलिस काँस्टेबल गजानन बोरसे, पोलिस काँस्टेबल संदीप टाकसाळ, गणेश शेळके यांच्या पथकाने नांदुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील येरळी फाट्यावर रविवारी पहाटे चार वाजता नाकाबंदी केली. या दरम्यान तेथून मारूती ईस्टीम कार जाताना दिसली. पोलिसांनी कार अडवून तिची तपासणी केली. या वेळी त्यामध्ये पान मसाल्याच्या एका पोत्यात ४८ पॅकेट अशी २० पोते गुटखा आढळून आला. या मालाची किंमत ८६ हजार ४०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. तसेच ५७ हजार ६०० रुपयाच्या तंबाखूच्या पुड्याही आढळल्या. अशाप्रकारे एकूण एक लाख ४४ हजार रुपयांचा गुटखा ४० हजारांची कार असे एकूण एक लाख ८४ हजारांचे साहित्य या पथकाने जप्त केले. याप्रकरणी वडाळी येथील रहिवासी असलेला कारचालक परमेश्वर मधुकर वक्टे आणि सर्वेश्वर मधुकर वक्टे या दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास नांदुरा पोलिस करत आहेत.
येरळी फाट्यावर केलेल्या कारवाईत पोलिसांनी जप्त केलेला गुटखा.