आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाण्यात फिर्यादीला मिळेल आता एफआयआरची संगणकीकृत प्रत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पोलिस ठाण्यातील ठाणे दैनंदिनीची (स्टेशन डायरी) नोंद ऑनलाइन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही पोलिस ठाण्यांमध्ये हाताने लिहिलेल्या एफआयआरची प्रत दिली जाते. ती देणे बंद करून संगणकीकृत प्रत देण्याचे आदेश सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आले आहेत.
पोलिस ठाण्यांचे सर्व कामकाज ऑनलाइन करण्यात आल्यानंतरही प्रशिक्षित पोलिस कर्मचारी वर्गाचा अभाव असल्यामुळे ऑनलाइन माहिती भरण्यास अडचणी येत आहेत. त्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात सीसीटीएनएस प्रणाली अवलंबण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये ऑनलाइन माहिती भरण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिले अाहेत. मात्र, अजूनही पोलिस ठाण्यांमधून फिर्यादीच्या हातात हस्ताक्षरित एफआयआरची प्रत देण्यात येत आहे. ही बाब शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक प्रदीप चव्हाण यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शहर विभागातील सर्व पोलिस ठाण्यांना संगणकीकृत प्रती देण्याचे आदेश दिले आहेत. ठाणे दैनंदिनीमध्ये केल्या जाणाऱ्या सर्व नोंदी तसेच एनसी, एफआयआर, आकस्मिक मृत्यूची नोंद, हरवलेल्या व्यक्ती, अपघात, गहाळ मालमत्तांच्या नोंदी सीसीटीएनएस प्रणालीमध्ये कराव्यात, गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनास्थळ पंचनामा, अटक फॉर्म, जप्ती पंचनामा अंतिम अहवाल याची नोंद वेळोवेळी सीसीटीएनएस प्रणालीमध्ये करावी, असे सक्तीचे आदेश आहेत. सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ऑनलाइन माहिती भरण्यासाठी सीसीटीएनएसचा युजर आयडी पासवर्ड देण्यात आले आहेत.

सीसीटीएनएसचे काम करणाऱ्यांना इतर काम नाही : राज्यभरगुन्ह्यांची माहिती ऑनलाइन टाकणे अत्यावश्यक करण्यात आल्यामुळे प्रत्येक पोलिस ठाण्यात सीसीटीएनएसची माहिती भरण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांना सीसीटीएनएसचे काम करताना इतर कोणतेही काम देऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत.

ऑनलाइन तक्रारी दाखल करणे सुरू
ऑनलाइन तक्रारी दाखल करण्यात येत आहेत. त्यामुळे यापुढे आता तक्रारदाराला एफआयआरची लेखी प्रत मिळणार नसून, संगणकीकृत प्रत देण्याचे आदेश पोलिस ठाण्यांतील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.'' प्रदीप चव्हाण, पोलिस उपअधीक्षक, शहर विभाग.