आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेतृत्व विकेंद्रीकरणाचा फटका भाजपला बसण्याची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - एकेकाळी नेत्याच्या एका हाकेवर जमा होणारे कार्यकर्ते शिस्तीचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या भारतीय जनता पक्षाला वातावरण अनुकूल असतानाही महापालिका निवडणुकीत मात्र नेतृत्वाच्या विकेंद्रीकरणाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांची संख्या लक्षात घेता, उमेदवारी वाटपावरूनच नेत्यांमध्ये बिनसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत, तर दुसरीकडे या विकेंद्रीकरणामुळे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
प्रभाग रचनेचा फायदा मोठ्या पक्षांना मिळतो, ही बाब लक्षात घेऊन राज्यात सत्तेत असलेल्या भाजपने नगरपालिका तसेच महापालिका निवडणुका प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला. नगरपालिकेत एका प्रभागातून दोन, तर महापालिकेत एका प्रभागातून चार नगरसेवक निवडले जाणार आहेत. यातूनच महापालिका आणि नगरपालिका काबीज करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अकोला महापालिकेत तूर्तास युती सत्तेत आहे. कोट्यवधींच्या विकास कामांच्या भरवशावरच ही निवडणूक लढवली जाणार आहे. मात्र, गटबाजी, नाराजी आदी सर्व बाबी बाजुला सारून काम करावे लागते. एकेकाळी हा सर्व प्रकार भारतीय जनता पक्षात नव्हता, असे नाही. त्याची टक्केवारी नगण्य होती. मात्र, आता सत्तेत आल्यापासून काँग्रेस पेक्षाही अधिक गटबाजी भाजपमध्ये पसरली आहे. आता नेतृत्वाचे विकेंद्रीकरण झाल्याने विविध नेतृत्वात सर्व सामान्य कार्यकर्ता अडकला आहे. त्यामुळेच उमेदवारी वाटपाच्या वेळी प्रत्येक गट आपल्या कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यासाठी आग्रह धरणार आहे. यावरुन नेत्यांमध्येच बिनसण्याची भिती भाजपचा सामान्य कार्यकर्ता व्यक्त करीत आहे. परिणामी योग्य संधी आणि अनुकुल वातावरण असतानाही केवळ नेतृत्वाच्या विकेंद्रीकरणाचा फटका भाजपला बसू शकतो, असे मत सामान्य कार्यकर्ते राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. यासर्व बाबी पक्षश्रेष्ठीपर्यंत गेल्या आहेत. त्यामुळेच एखादवेळी तुम्ही उमेदवाराची यादी तयार करा फायनल आम्ही करू, असा प्रकार प्रदेश पातळीवरून घडण्याची शक्यता आहे. याच अनुषंगाने भाजपने तीन सर्वे केल्याची माहितीही मिळाली आहे. यापैकी एक सर्वे हा राज्यस्तरावरुन तर दोन सर्वे स्थानिक पातळीवर झाल्याची माहिती आहे.

तीन प्रकारचे झाले सर्वे
एकूणतीन सर्वे झाल्याची माहिती असून, पहिला सर्वे विद्यमान नगरसेवकांच्या कामाचा आढावा, त्यांच्या बद्दल नागरिकांमध्ये असलेली भावना, दुसरा सर्वे इच्छुकांबाबतचा तर तिसरा सर्वे हा सर्व सामान्य नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत. असे तीन प्रकारचे सर्वे झाल्याची माहिती मिळाली आहे.
युती बाबतही साशंकता
एकीकडे नेतृत्वाच्या विकेंद्रीकरणाचा घोळ, तर दुसरीकडे शिवसेनेसोबत युती होणार की नाही? याबाबतही सांशकता निर्माण झाली आहे. शिवसेनेने भाजपला मोठा भाऊ मानले तर युती होऊ शकते, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळेच युती झाल्यास भाजपचेही पानीपत होण्याची चर्चा सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...