आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. दशरथ भांडेंची घरवापसी; निष्ठावानांमध्ये नाराजीचा सूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रतिभा अवचार डॉ. दशरथ भांडे )
अकोला - भारिप बमसंने सर्व जातीधर्माच्या प्रतिनिधींना आजवर पक्षात चांगले स्थान दिले. मात्र, याच पक्षाच्या भरवशावर मोठे झालेल्या अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. तरीही त्याचा पक्षावर काहीही परिणाम झाला नाही. उलट पक्षाच्या बाहेर जाणाऱ्यांची अवस्था पाणी आटलेल्या तळ्यातील मासळीसारखी झाल्याचे अनेक उदाहरणे आहेतं. मात्र, आता काहींना पक्षाची उबळ येत असल्यामुळे त्यांनी घरवापसी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अशा घरवापसी करणाऱ्यांविषयी पक्षात पाहिजे तशी चर्चाही होत नसून, त्यांच्यामुळे पक्षाला बळकटी येईल काय, असा प्रश्न उपस्थित होत अाहे.
डॉ. भांडे यांच्या पुनरागमनाने राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या. ऐन उमेदीच्या काळात पक्षाला हानी पोहोचवणाऱ्यांमध्ये डॉ. भांडे यांचे नाव अग्रस्थानी होते. त्यांना भारिपने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, अध्यक्ष, आमदार, मंत्री केले. मात्र, त्यानंतर त्यांनी बंडखोरी करत पक्ष सोडला बहुजन महासंघ नावाने पक्ष काढला. त्यानंतर त्यांनी निवडणुका लढवल्या, मात्र त्यांना पराजयाला सामोरे जावे लागले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. पण, तेथे त्यांना कोणतीही संधी मिळाल्यामुळे पुन्हा त्या पक्षाची फारकत घेत त्यांनी बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर रावेर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली. त्यातही पराजय झाल्यामुळे अनेक दिवसांपासून ते भारिपमध्ये पुनरागमन करण्याची वाट पाहत होते. अखेर त्यांनी भारिपमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांच्या पक्षात येण्याने पक्षाला काय फायदा होईल, याबाबत कार्यकर्त्यांत उलटसुलट चर्चा आहे, कोणतेही भरीव काम नसतानाही भारिपने कोणती दूरदृष्टी ठेवून त्यांचा पक्षप्रवेश केला, हा विषय गुलदस्त्यात आहे.

राष्ट्रवादीच्या प्रतिभा अवचार यांचाही प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादीच्या तिकिटावर जिल्हा परिषद सदस्य झालेल्या प्रतिभा अवचार यांनीही भारिपमध्ये प्रवेश केला. भारिपच्या विरोधात आघाडी उघडणाऱ्या अवचार पक्षात किती रुळतील, हा प्रश्नच आहे. जिथे सत्ता तिथे आपण असे धाेरण जर त्यांनी आखल्यास भारिपच्या दिग्गजांसोबत काम करताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी चर्चा आहे.