आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचायत समितीवर सत्तेसाठी काँग्रेस, राकाँ, सेनेची शर्थ,अनंतकुमार पाटील यांची भूमिका संशयास्पद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मानोरा- पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी हालचालींना वेग आला आहे. सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीने आघाडी करुन सदस्य अज्ञातस्थळी रवाना केले आहेत. दुसरीकडे काँग्रेसमध्ये फूट पडल्याने शिवसेना काही अपक्षांना सोबत घेऊन आव्हान देण्याचा प्रयत्न आहे.

यावेळी आघाडीचे नेते, पुढाऱ्यांनी साम दाम दंड भेद याचा पुरेपुर वापर करुन सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न चालवला आहे. दोन्ही आघाड्यांकडून एकमेकांविरुद्ध दबावतंत्राचा वापर चालवला आहे. तालुक्यातील राजकारण चांगलेच तापलेले आहे.

मानोरा पंचायत समिती सभापतिपदासाठी २७ जून रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत सभापतिपद ताब्यात घेऊन सत्ता प्राप्तीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सदस्य अज्ञातस्थळी रवाना केले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीमध्ये माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे, काँग्रेसचे नेते माजी जि. प. अध्यक्ष अरविंद पाटील, माजी वीज मंडळ सदस्य अनिल राठोड आणि त्यांचे सहकारी धुरा सांभाळत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना, माजी आमदार प्रकाश डहाके, माजी आमदार अनंतकुमार पाटील, काँग्रेसचे माजी पं. स. सभापती राजेश नेमाने, शिवसेना तालुकाप्रमुख रवी पवार, जि. प. सदस्य रणजित जाधव पंचायत समितीवर सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याचीही चर्चा सुरू आहे.

सत्तेसाठी चढाआेढ
काँग्रेस, राकाँने सदस्य अज्ञातस्थळी रवाना केले असले तरी शिवसेना पक्षाचे तीन, माजी आमदार डहाके गटाचे दोन अनंतकुमार पाटील गटाचा एक, नेमाने यांची पत्नी सीमा नेमाने असे सात सदस्य या गटाकडे असल्याचे समजते. तेही चमत्कार घडवण्याच्या प्रयत्नात आहेत. सभापतिपद आपल्या गटाला मिळावा म्हणून त्यांनीही जोरदार तयारी चालवली आहे. त्यांना देखील सत्तेसाठी एका सदस्याची गरज आहे. तसे झाल्यास डाव त्यांच्या बाजूने पडू शकतो. सदस्यांपैकी दोन सदस्य आम्हाला पाठिंबा देतील असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.

सत्ता राखण्यासाठी काँग्रेसची धडपड
काँग्रेस, राकाँ आघाडीकडून काँग्रेसच्या विद्यमान सभापती धनश्री अभय राठोड यांचे नाव पुढे करण्यात आले आहे तर उपसभापतिपदासाठी राकाँच्या रजनी गावंडे यांचे नाव आघाडीवर आहे. तर विरोधी आघाडीकडून काँग्रेसशी बंड पुकारणाऱ्या सीमा नेमाने यांच्या नावाची चर्चा आहे. तर उपसभापतिपदासाठी वेळेवर नाव सुचवण्यात येणार असल्याचे समजते. या गटाला समर्थन देणाऱ्याला उपसभापतिपद दिले जाऊ शकते. या आघाडीकडून तशी चर्चा सुरू आहे. दोन्ही गटात चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे. एकंदरीत शिवसेनेला टाय करण्यासाठी एका सदस्याची गरज आहे. तर सभापतिपद मिळवण्यासाठी दोन सदस्यांची आवश्यकता आहे. येत्या काळात काय घडेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आघाडी, युती मजबूत
यावेळी आघाडी आणि युती यांच्याकडून माघार घेण्यास कोणीही तयार नाही. त्यांच्यातून सत्ताप्राप्तीचे संकेत दिले जात आहेत. परंतु घडामोडी कशा होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येणाऱ्या दिवसात काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
बातम्या आणखी आहेत...