आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजोरियांचा सामना होणार नगरसेवकांच्या नाराजीशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(गोपीकिशन बाजोरिया)
अकोला - विधानपरिषदेच्या निवडणुकीला अद्याप वेळ असला, तरी राजकीय पटलावर फासे टाकण्याचे काम मात्र वेगाने सुरू झाले आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून गोपीकिशन बाजोरिया दोनवेळा विजयी झाले आहेत. मात्र, या वेळी त्यांना ही निवडणूक जड जाण्याची चिन्हे आहेत. नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात विकास कामांसाठी निधी दिल्याची नाराजी नगरसेवक थेट व्यक्त करीत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत बाजोरिया यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांना नगरसेवकांच्या या नाराजीचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अकोला, वाशीम आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया यांनी सलग दोनवेळा बाजी मारली आहे. दुसऱ्या वेळी मात्र गोपीकिशन बाजोरिया यांना राध्येशाम चांडक यांनी कडवी झुंज दिली होती. या निवडणुकीकरिता ‘अर्थकारण’ही मोठ्या प्रमाणात चालल्याची चर्चा होती. भाजप-सेनेचे मतदान कमी असतानाही शेवटी गोपीकिशन बाजोरिया यांनी बाजी मारली. मात्र, या साडेपाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी आमदार निवडून देतात. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील विविध प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी संबंधित आमदारांवर येते.

अकोल्याचा विचार केल्यास प्रशासनाविरोधात व्यावसायिकांचे आंदोलने, तसेच मनपातील कर्मचाऱ्यांचा संप या प्रकरणात गोपीकिशन बाजोरिया यांनी जातीने लक्ष घालून या समस्या मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अकोला मनपासह इतर नगरपालिकांमधील रिक्त जागा भरणे, सक्षम अधिकारी, विविध योजना खेचून आणणे, यात परिणामकारक कामगिरी बजावली नाही. एकीकडे ही कामगिरी बजावता आलेली नसताना नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात आमदार निधीतून विकासकामांसाठी निधी मिळाल्याने सर्वच पक्षांचे नगरसेवक उघड नाराजी व्यक्त करीत आहेत.

भारिप-बमसंसह इतरांची भूमिका महत्त्वाची
युतीआणि आघाडी या दोघांकडेही स्पष्ट बहुमत नाही. एकूण ७४१ मतदार आहेत. यांपैकी भाजपचे १२५, भाजप आघाडीचे ६०, तर समर्थित अपक्ष १२, शिवसेनेचे ८६, असे एकूण २८३, तर काँग्रेसचे २०० , राष्ट्रवादी काँग्रेसचे १२, असे ३२२ मतदार आहेत, तर भारिप-बमसं, इतर स्थानिक आघाडी, बसप आदींचे १३६ मतदार आहेत. यात भारिप-बमसंच्या मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने निवडणूक झाल्यास भारिप-बमसंच्या मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

शिवसेना, राष्ट्रवादीच्या मतदारांची संख्या कमी
भाजप-सेनायुतीतून ही जागा शिवसेनेला, तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीतून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आहे. विशेष म्हणजे ज्या पक्षाच्या वाट्याला ही जागा आली आहे. त्या पक्षांच्या मतदारांची संख्याही कमी आहे. तिन्ही जिल्ह्यांत स्थानिक स्वराज्य संस्थेतील शिवसेनेचे मतदान केवळ ८६, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे १२२ मतदार आहेत, तर या उलट भाजपचे १२५ (आघाडी, समर्थन गृहीत धरल्यास १९७) तर काँग्रेसचे मतदार २०० आहेत.

शिवसेनेसाठी अस्तित्वाचा प्रश्न
विधानसभेतशिवसेनेला अकोला, वाशीम जिल्ह्यात एकही जागा जिंकता आली नाही, तर बुलडाणा जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार एक खासदार आहेत. तीन जिल्हे मिळून एक खासदार दोन आमदार असल्याने विधान परिषदेच्या निवडणुकीत युती झाल्यास शिवसेनेला ही निवडणूक जिंकणे आव्हान ठरणार आहे. ही निवडणूक जिंकून आमदारांची संख्या शिवसेनेला तीन करता येणे शक्य आहे. त्यामुळे ही निवडणूक शिवसेनेसाठी अस्तित्वाचा प्रश्न ठरली आहे.

युतीबाबत साशंकता
मागीलदोन्ही निवडणुकीत भाजप-सेनेची युती होती. ही युती या वेळीही कायम राहील, असे बोलले जाते. मात्र, विधानसभा निवडणुकीप्रमाणे होऊनच जाऊ द्या यानुसार युती तुटण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अर्थात युतीबाबतचे धोरण हे वरिष्ठ पातळीवर निश्चित होणार असले तरी दोन्ही पक्षांच्या मतदारांमध्ये मात्र युती बाबत सांशकता व्यक्त केली जात आहे.