आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदन भरगड यांची अंतर्गत विरोधकांना धोबीपछाड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - गेल्याकाही महिन्यांपासून काँग्रेसचे महानगराध्यक्ष मदन भरगड यांना हटवण्याबाबत त्यांचे विरोधक अंतर्गत प्रयत्न करत आहेत. मात्र, या प्रयत्नाला यश आलेले नसतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नागपूर विधिमंडळावर सात डिसेंबरला निघणाऱ्या मोर्चाबाबत अमरावती विभागाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. प्रदेशाध्यक्षांचा हा निर्णय भरगड यांच्या विरोधकांसाठी धोबीपछाड ठरला आहे.
काँग्रेस पक्ष सत्तेत असो वा नसो, गटातटाचे राजकारण मात्र सदैव कार्यरत राहते. अकोला महानगर काँग्रेस समितीही यातून सुटलेली नाही. काँग्रेसचे कट्टर समर्थक म्हणून घेणारे पदाधिकारी कार्यकर्ते एकमेकांचे हाडवैरी म्हणून ओळखले जातात. काँग्रेसच्या महानगराध्यक्षपदावर मदन भरगड गेल्या अनेक वर्षांपासून विराजमान आहेत. ते महानगराध्यक्ष पदावर असतानाच महापौर पद, आघाडीप्रमुख आदी पदेही त्यांच्याकडेच होती. त्या वेळीही त्यांच्या अंतर्गत विरोधकांनी त्यांचे पद काढण्याचा आटापिटा केला. पक्षश्रेष्ठींकडे गाऱ्हाणी मांडली, तगादा लावला, साकडे घातले एवढेच नव्हे तर उपोषणाचा इशाराही दिला, परंतु मदन भरगड यांचे काहीही वाकडे झाले नाही. त्यांना पदावरून हटवण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले. परंतु, प्रत्येक वेळी मदन भरगड यांनी त्यांच्या अंतर्गत विरोधकांना चारीमुंड्या चीत केले.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी अशोक चव्हाण यांची नियुक्ती झाल्यानंतर पुन्हा एकदा मदन भरगड यांची महानगराध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यासाठी त्यांच्या अंतर्गत विरोधकांनी कंबर कसली. आता मदन भरगड यांना पद सोडावेच लागणार, यावर पैजाही लागल्या. त्यांचे पद कोणत्या तारखेला जाणार? याचे भविष्यही जाहीर करण्यात आले. परंतु, मदन भरगड यांचे पद कायम राहिले. केवळ पदच कायम राहिले नाही तर हिवाळी अधिवेशनादरम्यान काँग्रेसच्या वतीने नागपूर येथे सात डिसेंबरला युती शासनाच्या विरोधात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चाची जय्यत तयारीही सुरू केली आहे. प्रत्येक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी व्हावेत, यासाठी विविध अध्यक्षांकडे जबाबदाऱ्याही सोपवण्यात आल्या आहेत. मदन भरगड यांच्याकडे अमरावती विभागाची जबाबदारी सोपवून त्यांच्यावर एक प्रकारे विश्वास दर्शवला आहे. हा विश्वास अंतर्गत विरोधकांची तोंडे बंद करणारा ठरला असल्याची चर्चा मदन भरगड यांच्या समर्थकांमध्ये सुरू आहे.
भारतीयजनता पक्षाच्या महानगराध्यक्ष तसेच जिल्हाध्यक्ष (ग्रामीण)च्या निवडणुका जानेवारी, २०१६ मध्ये होत आहे. भाजपचे विद्यमान महानगराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे साडेसात वर्षांपासून या पदावर आहेत. त्यामुळे महानगराध्यक्षपदासाठी अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत. परिणामी, महानगराध्यक्षपदासाठी रस्सीखेच होणार असून, जिल्हाध्यक्षाचा मात्र पक्षाला शोध घ्यावा लागत आहे. या निवडणुका दीड ते दोन महिन्यांवर येऊन ठेपल्याने इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या घटनेनुसार अध्यक्षपदाचा कालावधी तीन वर्षांचा आहे. हा कालावधी जानेवारी महिन्यात संपुष्टात येत आहे. त्यामुळेच महानगराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षपदाच्या निवडणुकींच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचे शहरात चांगले प्राबल्य आहे. त्यामुळे महानगराध्यक्षपदासाठी सिद्धार्थ शर्मा, किशोर मांगटे पाटील, दीपक मायी, डॉ. युवराज देशमुख इच्छुक आहेत. परंतु, ग्रामीण भागात भाजपचे फारसे प्राबल्य नसल्याने जिल्हाध्यक्षाचा शोध भाजपला घ्यावा लागणार आहे. मनोहर राहणे, तेजराव थोरात यांच्याव्यतिरिक्त कोणाचीही नावे समोर आलेली नाहीत, तर दुसरीकडे विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार, खासदार यांच्याकडे पक्षाच्या महानगराध्यक्ष अथवा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आता सोपवली जाणार नाही. हा निर्णय केवळ अपवाद म्हणून अकोला शहर जिल्ह्यासाठी लागू होऊ शकतो. परंतु, तूर्तास किशोर मांगटे पाटील आणि डॉ. युवराज देशमुख यांच्यात चुरस सुरू आहे, तर दुसरीकडे सामान्य कार्यकर्त्यांनी सिद्धार्थ शर्मा यांचे नाव समोर केले आहे. सिद्धार्थ शर्मा उत्तम वक्ता, स्वच्छ चारित्र्य म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून ते पक्षात आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाचे कामही त्यांनी पाहिले आहे. त्यानंतर त्यांच्याकडे पक्षाने फारशी जबाबदारी दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या नावाचा आग्रह होऊ शकतो. त्यामुळे महानगराध्यक्षपदासाठी चुरस होऊ शकते.
एकीकडे महानगराध्यक्षपदासाठी चुरस होत असताना दुसरीकडे ग्रामीणसाठी फारसे इच्छुक नाहीत. विद्यमान जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात हे पुन्हा या पदासाठी इच्छुक नसल्याची माहिती मिळाली आहे, तर यापूर्वी या पदावर काम करणारे मनोहर राहणे हेसुद्धा फारसे इच्छुक नसल्याचे बोलले जाते. परिणामी, पक्षाला जिल्हाध्यक्षाचा शोध घ्यावा लागत आहे. अद्याप या निवडणुकींना वेळ असला, तरी इच्छुक मात्र कामाला लागले आहेत.

दोन जिल्ह्यांच्या जबाबदाऱ्या
मदन भरगड यांच्याकडे अकोला अमरावती या दोन जिल्ह्यांच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. मोर्चाच्या अनुषंगाने २३ २४ नोव्हेंबरला मुंबई येथे होणाऱ्या बैठकीसाठी मदन भरगड यांना उपस्थित राहावे लागणार आहे.

प्रतिस्पर्धीही कमी झाले
विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते घड्याळाची टिकटिक ऐकण्यात मग्न आहेत. ही टिकटिक मनाने ऐकली जात असल्याने मदन भरगड यांचे तगडे प्रतिस्पर्धीही कमी झाले आहेत. याचाही फायदा मदन भरगड यांना मिळाला आहे.