अकोला - एका महिलेच्या मोबाइलवर अश्लील चित्रफीत पाठवणाऱ्या आरोपीला खामगाव पोलिसांनी अकोल्यातून अटक केली. महिला खामगाव येथील असून, युवक अकोल्यातील आहे. ही कारवाई शनिवारी करण्यात आली.
खामगाव येथील महिलेच्या मोबाइलवर व्हॉट्सअॅपद्धारे अश्लील चित्रफीत फोटो कुणीतरी अपलोड केले. वारंवार हा प्रकार होत असल्याने महिलेने खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी भादंवि ३५४ अन्वये गुन्हा दाखल करून मोबाइलचे कॉल डिटेल्स तपासले. हा नंबर अकोल्यातील बलोदे ले-आऊटमध्ये राहणारा विक्की बाबूराव इंगळे याचा असल्याचे समजले. या माहितीवरून शनिवारी सकाळी खामगाव पोलिस खदान पोलिस ठाण्यात आले.
या वेळी खदान पोलिस ठाण्याचे ठाणेदार सी. टी. इंगळे यांनी खामगाव पोलिसांसोबत जाऊन विकी बाबूराव इंगळे याला ताब्यात घेतले. खामगाव पोलिस त्याला घेऊन गेले. ही कारवाई शहर पोलिस अधीक्षक प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सी. टी. इंगळे यांनी केली.