आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाभरातील ३६ संस्था गुन्हे शाखेच्या "रडार'वर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - राज्यातील बहुचर्चित मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती घोटाळ्याची पाळेमुळे अकोला जिल्ह्यातही रुजली आहेत. जिल्ह्यातील ३६ संस्थांमध्ये घोटाळा झाल्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने या सर्व संस्थांचा तपास सुुरू केला असून, पाच संस्थांचा तपास पूर्ण झाला आहे. त्याचा अहवाल स्थानिक गुन्हे शाखेने वरिष्ठांकडे पाठवला आहे.
विशेष जिल्हा समाजकल्याण कार्यालयाकडून बोगस विद्यार्थ्यांच्या नावावर जमा केलेल्या शिष्यवृत्ती अपहाराच्या रकमेचा आकडा पाच वर्षांत १० हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचा शिष्यवृत्ती घोटाळा झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे संबंधित संस्थांच्या चौकशीचे आदेश पोलिसांना प्राप्त झाले आहेत. या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करण्यासाठी अपर पोलिस महासंचालकांच्या नेतृत्वात विशेष चौकशी पथकाचे गठन करण्यात आले आहे. हे चौकशी पथक सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विकास विभाग, उच्च तंत्रशिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण विभागांकडून विद्यार्थ्यांना देण्यात आलेली केंद्र शासनाची मॅट्रिकोत्तर विविध शिष्यवृत्ती, तसेच शैक्षणिक शुल्क वाटपात गैरव्यवहाराची चौकशी करत आहे. हे चौकशी पथक २५ मार्चपर्यंत मुख्य सचिवांकडे अहवाल सादर करणार आहे. या अनुषंगाने अकोला स्थानिक गुन्हे शाखेने आतापर्यंत पाच संस्थांची चौकशी केली आहे. व्यावसायिक तांत्रिक कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्थांचा त्यात समावेश आहे. करण्यात येणऱ्या चौकशीनंतरच अहवालावरून त्या संस्थांचा या घोटाळ्यात समावेश आहे काय, हे स्पष्ट होणार आहे.

तपासासाठी तीन पथकांचे गठन : सामाजिकन्याय विभाग, आदिवासी विकास विभाग, उच्च तंत्रशिक्षण विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागांकडून राज्यातील विद्यार्थ्यांना देण्यात आलेली केंद्र शासनाची मॅट्रिकोत्तर विविध शिष्यवृत्ती, तसेच शैक्षणिक शुल्क वाटपात गैरव्यवहार झाला किंवा कसे, या संदर्भात चौकशी करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख जितेंद्र सोनवणे यांनी तीन पथके गठित केली आहेत. ही पथके जिल्ह्यातील संबंधित संस्थांची तपासणी चौकशी करणार असल्याने संस्थांच्या संचालकांमध्ये पुढील कारवाईच्या अनुषंगाने भीती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

गुन्हेदाखल करून रक्कम वसूल करणार : पोलिसप्रत्येक शिक्षण संस्थेत जाऊन प्रत्येक विद्यार्थ्यासह संबंधित संस्थाचालकांची चौकशी करत आहेत. शिष्यवृत्ती घोटाळा झालेल्या शिक्षण संस्थांची यादी तयार करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यानंतर त्या संस्थांनी सरकारची फसवणूक करून लाटलेली शिष्यवृत्तीची रक्कम वसूल केली जाणार आहे.

तांत्रिक अभ्यासक्रमाच्या नावाखाली या संस्था आदिवासी विकास सामाजिक न्याय विभाग अशा दोन्ही विभागांकडून शिष्यवृत्ती लाटत होत्या. काही संस्थांनी तर खोटी पटसंख्या दाखवून शिष्यवृत्ती हडप केली आहे. अनेक संस्थांनी स्टडी सेंटर उघडले होते. त्यांनी बारावी शिकलेल्या युवक-युवतींना प्राचार्य बनवले. विशेष म्हणजे काही जणांनी परवानगी नसतानाही विशिष्ट अभ्यासक्रम सुरू केले. त्यातही क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांची नोंद दाखवून शिष्यवृत्तीची रक्कम उकळली आहे. विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा होणे अपेक्षित असताना विद्यार्थ्यांचे बनावट अकाउंट उघडून त्यांच्या खात्यातील रक्कम संस्थांनी हडपली आहे.

या संस्थांची झाली चौकशी
आर्यन अध्यापक सीटीसी महाविद्यालय, अकोला
महाराष्ट्र तंत्रशिक्षण विद्यालय, शंकरनगर, अकोला
गुरुकृपा हस्तकला कार्यानुभव शिक्षक अध्यापक विद्यालय, मुंंडगाव
इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट अँड क्राफ्ट फिचर अँड प्री स्कूल, राऊतवाडी
विदर्भ तंत्रशिक्षण विद्यालय, अकोला