आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार घटकांच्या अंतर्गत मिळणार प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - प्रधानमंत्री आवास योजनेबाबत लोकप्रतिनिधी सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मुळात या योजनेचे उद्दिष्ट २०२२ पर्यंत झोपडपट्टी तसेच इतर भागातील कच्च्या पक्क्या घरात राहणाऱ्या तसेच बेघरांना या योजनेअंतर्गत स्वत:चे घर देण्याचे नियोजन केले आहे. यासाठी योजनेच्या चार घटकाअंतर्गत अंशदान देण्यात येणार असून, टप्प्याटप्प्याने या चार घटकातील नागरिकांना हक्काची घरे मिळणार आहेत.
महापालिकेला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १६०० घरकुलांसाठी ६२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी मंजूर झाल्यापासून नगरसेवकांनी केवळ विशिष्ट भागातील लोकांनाच घरकुलाचा लाभ का दिला, असा प्रश्न प्रशासनासमोर उपस्थित केला आहे. आवास योजनेबाबत निर्माण झालेल्या संभ्रमामुळे अडचणीत भर पडली आहे. या सर्व प्रकारामुळे अद्याप सर्वेक्षणाचे कामदेखील महापालिकेला सुरू करता आले नाही. या योजनेची संपूर्ण माहिती प्रशासनाकडे नाही, परंतु जी माहिती आहे ती योग्यरीत्या लोकप्रतिनिधींना समजून देण्यात अपयश आले आहे. त्यामुळे नेमकी योजना काय, याची माहिती नसल्याने मंजूर झालेला प्रस्ताव रद्द करण्याची मागणी काही नगरसेवकांनी केली आहे.

मुळात ही योजना चार पद्धतीने राबवली जाणार आहे. पहिल्या घटकात शासकीय जागेवरील झोपडपट्टीचा विकासक अथवा कंत्राटदार यांच्या माध्यमातून पुनर्विकास केला जाणार आहे. दुसऱ्या घटकात नवीन घर घेणे, बांधणे किंवा राहत्या घराचा विकास करणे, तिसऱ्या घटकात खासगी विकासकाच्या साहाय्याने परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे, तर चौथ्या घटकात व्यक्तिगत स्वरूपातील घरकुल बांधणे अशा चार घटकाअंतर्गत आवास योजना राबवली जाणार आहे. जो व्यक्ती ज्या घटकात बसत असेल, त्याला त्या घटकाअंतर्गत स्वत:चे घर मिळणार आहे.

परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे : ज्यानागरिकांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी आहे, भाडेकरू आहेत, राहण्यास अयोग्य जागेवर तसेच आरक्षण बाधित जागेवर राहणाऱ्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत ३२३ चौरस फुटाचे घर मिळेल. यासाठी खासगी विकासकाच्या माध्यमातून परवडणाऱ्या घरांची निर्मिती केली जाणार असून, यासाठी दोन लाख ५० हजार अनुदान दिले जाणार आहे.

व्यक्तिगत स्वरूपातील घरकुल योजना : ज्यानागरिकांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी आहे तसेच कोणत्याही भागातील राहण्यास योग्य जागेवर अथवा आरक्षण अबाधित जागेवर स्वमालकीच्या कच्च्या अथवा पक्क्या घरात राहणाऱ्या नागरिकांना या घटकाचा लाभ मिळणार आहे. यासाठी ३२३ चौरस फुटाचे बांधकाम करता येणार असून, यासाठी दोन लाख ५० हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.

अशा आहेत अटी शर्ती : स्वयंसाक्षांकित केलेला उत्पन्नाचा दाखला दोन साक्षीदारांसह, कुटुंबाच्या नावाने देशात कोठेही पक्के घर अथवा शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळाला नसल्याचे स्वयं साक्षांकित केलेला दाखला, घरकुल बांधकामासाठी शासकीय अनुदानाव्यतिरिक्त उर्वरित रकमेची सोय इच्छुक कुटुंबांना करावी लागेल असे स्वयं साक्षांकित केलेले हमीपत्र, नकाशा मंजूर करून नियमानुसार बांधकाम करणे, आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर तसेच स्थळ निरीक्षण केल्यानंतर पात्र इच्छुक अर्जदार चारपैकी अनुकूल घटकाअंतर्गत, शासनाकडून मंजुरी प्राप्त झाल्यानंतर नियमाप्रमाणे लाभार्थ्यास अंशदान मिळणार आहे.

अशी लागतील कागदपत्रं
आधार कार्ड, बँकेचे पासबुक, १०० रुपयांच्या बाँडपेपरवर प्रतिज्ञालेख, घर असल्यास कराची पावती, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड, जागा मालकीची असल्यास सातबाराचा उतारा, बीपीएल असल्यास तसे प्रमाणपत्र, अपंग असल्यास सिव्हिल सर्जनचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

नवीन घर बांधणे अथवा राहत्या घराचा विकास
या घटकाअंतर्गत ज्यांना स्वत:चे घर नाही अथवा घराचा विकास करायचा आहे, ज्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न सहा लाखांपेक्षा कमी आहे अथवा जे भाडेकरू म्हणून राहतात अथवा आरक्षण बाधित जागेवर राहणारे आहेत, असे लाभार्थी या घटकाअंतर्गत येतात. या घटकात ६४० चौरस फुटापर्यंत बांधकाम करावे लागणार असून, ६.५ टक्के सवलतीच्या दरात सहा लाख रुपये कर्ज दिले जाणार आहे.

शासकीय जागेवरील झोपडपट्टीचा पुनर्विकास
पंतप्रधान आवास योजनेच्या घटकात कंत्राटदाराच्या माध्यमातून ३२३ चौरस फुटाचे घर मिळेल. यासाठी दोन लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ २००० च्या पूर्वीपासून आतापर्यंत संबंधित शासकीय जागेवरील झोपडपट्टीमधील राहण्यास योग्य जागेवर आरक्षण अबाधित जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या कुटुंबांना मिळणार आहे. यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.