आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कैदीवार्डमधून आरोपी गायब, पोलिसांनी देवाण-घेवाण करून आरोपीला मोकळीक दिल्याची घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात कैदीवार्ड आहे. या कैदीवार्डमध्ये एका आरोपीला पाच दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांचा राऊंड झाल्यानंतर आरोपी पोलिसांच्या मदतीने वार्डातून बाहेर गेला आणि काही तासानंतर पुन्हा रुग्णालयात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. रात्रभर आरोपी बाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली आहे. मात्र तीन तास कैदी वार्डमध्ये नसल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. 

जिल्ह्यातील एका खूनाच्या प्रकरणातील मुख्य आरोपी न्यायालयीन कोठडीत गेल्या काही महिन्यांपासून आहे. आरोपीसोबत बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी संगनमत केले आरोपीकडून पैसे घेऊन त्यास रात्रीच्यावेळी बाहेर काढले त्यानंतर काही तासांनी पुन्हा रुग्णालयात आरोपी आणि पोलिस दाखल झाले. आरोपी बेडवर तसेच वार्डामध्ये नसल्याचे राऊंडवर आलेल्या डॉक्टरांना दिसून आले. त्यानंतर डॉक्टरांमध्ये कुजबूज सुरु झाली. पोलिसांचे नेहमीचेच म्हणून की काय डॉक्टरांनी आपल्या अंगावर प्रकरण शेकू नये म्हणून आरोपी रुग्ण वार्डमध्ये गैरहजर असल्याची नोंद टाकली. 

तशी माहिती त्यांनी पोलिस प्रशासनाला दिली. जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत संबंधित प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या चार पोलिसांनी देवाण-घेवाण करून आरोपीला सवलत दिल्याची माहिती आहे. 

पोलिस तपासताहेत सीसीटीव्ही फुटेज
आरोपीच्या बंदोबस्तासाठी चार पोलिस तैनात करण्यात आले होते. या चारही पोलिसांनी आरोपीला बाहेर काढण्याची शक्कल लढवली. आरोपीला सवलत मिळत असेल तर आरोपी फायदा घेणारच त्यानुसार आरोपीला पोलिसांनी मदत केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपीला मोकळीक देण्यासाठी संधी दिली. तसा प्रस्ताव पोलिसाकडूनच आला की आरोपीकडून या प्रकरणाचा तपशीलाची चौकशी पोलिस करीत आहेत. दरम्यान, आरोपींना कारागृहातून बाहेर काढल्यानंतर त्यांच्या बंदोबस्ताची जबाबदारी जिल्हा पोलिसांची असते. परंतू काही पाेलिसच अाराेपींना माेकळीक देतात. एखाद्यावेळी काही गंभीर घडले तर त्याची जबाबदारी काेणाची, असाही प्रश्न निर्माण हाेत अाहे. 

अाता पोलिसांवर होणार कारवाई 
कारागृहातील आरोपींना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात येते. आरोपींना कारागृहातून बाहेर काढल्यानंतर त्यांच्या बंदोबस्ताची जबाबदारी जिल्हा पोलिसांची असते. आरोपीला कारागृहातून बाहेर नेणे आणि सुखरूप कारागृहात आणून देणे हे पोलिसांचे काम आहे. आरोपींना रुग्णालयात त्यांच्या नातेवाईकांना भेटता येते. मात्र अनेकदा पोलिस आपल्या पदाचा दुरुपयोग करून आरोपींना मोकळीक देतात, असे प्रकार नित्याचेच असल्याचे माहिती सुत्रांनी दिली आहे. 

कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक म्हणून चंद्र किशोर मीणा यांची ओळख आहे. कोणत्याही आरोपीला त्यांनी आजपर्यंत पाठीशी घातल्याचे एकही प्रकरण नाही. त्यांच्या कार्यपद्धतीनुसार त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून संबंधित पोलिसांविरोधात कारवाईची शक्यता आहे. या पूर्वीसुद्धा किती आरोपींना पोलिसांना संधी दिली. याची सखोल माहिती घेऊन संबधित पोलिसांवर काय कारवाई होते, याकडे लक्ष पोलिस वर्तुळात लक्ष लागून आहे. 
बातम्या आणखी आहेत...