आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंधरा रुपयांचे "प्रॉपर्टी कार्ड' मिळते चक्क पंधराशे रुपयांना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जागेचा शासकीय पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणाऱ्या मालमत्ता पत्र म्हणजेच "प्रॉपर्टी कार्ड'साठी नियमानुसार पंधरा रुपये लागत असताना ते कार्ड चक्क पंधराशे रुपयांना मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार रामभरोसे झाल्याने नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड मिळणे कठीण झाले आहे. सिटीझन चार्टर केवळ नावालाच उरला असून, भूमी अभिलेख कार्यालयात एक खिडकी योजना लागू करण्याची गरज निर्माण झाली आहे.
भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी कर्मचारी बाहेर अन् त्रयस्थ व्यक्तींचा कार्यालयात शिरकाव वाढल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. बहुतांश व्यवहार चहाटपरीवर होत असल्याने कार्यालयात दलालांचा वावर वाढला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नव्या इमारतीत तालुका भूमी अभिलेख कार्यालय आहे. त्या बाजूलाच नियंत्रण ठेवणारे जिल्हा भूमी अभिलेख कार्यालय आहे. तालुका कार्यालयामधून नागरिकांंना जमीन हक्क मालकीचे प्राॅपर्टी कार्ड, फेरफार नमुना दिल्या जातात. प्रामुख्याने दुकान, जागा, घर मालकीचे असल्याचा प्राॅपर्टी कार्ड हा शासकीय पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जातो. सातबाराप्रमाणेच नमुना ला महत्त्व आहे. मात्र, तालुका भूमी अभिलेख कार्यालयातून नमुना मिळवण्यासाठी नागरिकांना अतिरिक्त पैसा तर खर्च करावाच लागतो शिवाय मानसिक त्रास होतो तो वेगळाच. ग्रामीण भागातील १४ गावांनी नझुल पॅरामीटरचा प्रस्ताव शासनाकडे पाठवल्याने या गावातील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड तसेच नमुना काढण्यासाठी तालुका भूमी अभिलेख कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो. अकोला तालुक्यातील बोरगावमंजू, दहीगाव गावंडे, कानशिवणी, पातूर नंदापूर, उमरी प्रगणा, डाबकी, घुसर, उगवा, आगर, दहीहांडा, चांदूर, िचखलगाव, गोरेगाव खुर्द, कुरणखेड या गावांचा समावेश होतो. जागेची नक्कल काढण्यासाठी या गावांसह अकोला शहरातील नागरिकांना नमुना साठी तसेच प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी तालुका भूमी अभिलेख कार्यालयाशी संबंध येतो. मात्र, वेळेवर प्रॉपर्टी कार्ड मिळत नसल्याने नागरिक वैतागून गेले आहेत.

अधिकारी दौऱ्यावर तर कर्मचारी चहा प्यायला
जिल्हाभूमी अभिलेख अधिकारी कार्यालयासह तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील चहाटपरींवर फिरताना दिसतात. कार्यालयात खुर्चीवर कमी अन् चहाटपरीवर कर्तव्य बजावण्यात या कार्यालयातील कर्मचारी धन्यता मानत आहेत.

तक्रार करायची तरी कुठे?
जिल्हाभूमी अभिलेख अधिकारी तालुका भूमी अभिलेख अधिकारी नेहमीच दौऱ्यावर असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला तक्रार करायची झाल्यास त्याला तक्रार करण्यासाठीसुद्धा अधिकारी जागेवर मिळत नसल्याचा अनुभव अनेकांना येतो.

जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी दखल
बांधकाम व्यावसायिकांसह नागरिक दस्तऐवजांची प्रत मागण्यासाठी येतात. आखीव पत्रिकेची मागणी केल्यावरही चिरीमिरी दिल्याशिवाय काम होत नाही. या सर्व प्रकाराची जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दखल घेऊन नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

माहिती अपडेट नाही
^जानेवारीते नोव्हेंबर २०१५ दरम्यान नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड वितरित केलेत, याची माहिती तयार नसल्याने १७ नोव्हेंबर रोजी दुपारी पर्यंत देण्यात येईल.'' सारिकाकडू, उपअधीक्षक, तालुका भूमी अभिलेख कार्यालय

नमुना नाही ऑनलाइन
शासनाने सातबारा ऑनलाइन केला. मात्र, नमुना अद्यापही ऑनलाइन केला नाही. त्यामुळे नागरिकांना कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे. शहरात नागरिक ओळखीच्या अाधारावर आपली कामे करून घेतात. मात्र, ग्रामीण भागातील नागरिकांना कागदपत्र मिळवण्यासाठी कसरत करावी लागते.

काय चाललंय नाही कल्पना
तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याला काही विचारले तर संबंधित अधिकारी चहा प्यायला गेल्याचे सांगण्यात येते. कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मोबाइल क्रमांक तर या ठिकाणी लावण्यात आले आहेत, पण त्यापैकी अनेक नंबर स्वीच ऑफ असतात. त्यामुळे कामकाजात अडथळा निर्माण होतो.

जागेच्या नक्कलसाठी फक्त १५ रुपये खर्च येतो. तालुका भूमी अभिलेख कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी वाजेपर्यंत अर्ज केल्यास त्याच दिवशी दुपारी ३.३० ते ५.३० वाजेपर्यंत नक्कल मिळेल, अशा प्रकारची सूचना या ठिकाणी लावण्यात आली आहे. मात्र, हा नियम फक्त सूचनेपुरता उरला असून, नक्कलसाठी नागरिकांना १५ रुपये नाही तर चिरीमिरी दिल्याशिवाय नक्कल मिळत नसल्याचे वास्तव आहे.

तालुका भूमी अभिलेख अधिकारी कार्यालयाच्या उपअधीक्षक जर रजेवर किंवा दौऱ्यावर असल्या तर या कार्यालयाचा कुणीच वाली राहत नाही. त्यांच्या अनुपस्थितीत नागरिकांशी बोलायला किंवा प्रश्न सोडवायला पर्यायी कोणताही अधिकारी या कार्यालयाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे चांगलेच फावते. ते मनमानीपणे कार्य करून नागरिकांशी उद्धटपणे बोलतात.