आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनता भाजीबाजार आजपासून बेमुदत बंद, मनपाने बाजार हटवण्यास दिली २० दिवसांची मुदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जनता भाजीबाजार हटवण्यावरुन महापालिका प्रशासन आणि स्थानिक व्यापारी आमनेसामने आले आहेत. महापालिकेने बाजार हटवण्यासाठी दिलेला अवधी पुरेसा नाही. मनपा प्रशासनाच्या दादागिरीला आम्ही भीक घालणार नाही, असा पवित्रा घेत व्यापारी, हमाल यांनी भाजीबाजार शनिवारपासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यायी जागा दिल्याशिवाय आम्ही येथून हटणार नाही असा निर्धार महात्मा फुले भाजीबाजार असोसिएशनचे अध्यक्ष सज्जाद खान यांनी व्यक्त केला. 

१९७४ पासून येथील जनता बाजार परिसरामध्ये भाजीबाजार भरतो. हा भाग अतिक्रमित नाही तर मनपाला रितसर करभरणा केला जातो. पावती फाडली जाते. असे असताना महापालिकेकडून बाजार हटवण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. मध्यंतरी मनपा आयुक्तांसमवेत व्यापाऱ्यांची बैठक झाली होती. महिन्यापूर्वी तर रविवारी बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी चार दिवसातच बाजार हटवा, असे निर्देश मनपाकडून देण्यात आल्याचे सज्जाद खान यांनी सांगितले. 

गुरुवार, १२ जानेवारी रोजी मनपाकडून बाजारातील दुकाने पाडण्यात आली. तेव्हा सूचना दिली नव्हती. दरम्यान, नगरसेवक साजीद खान पठाण यांनी मनपा प्रशासनाशी संवाद साधला. तेव्हा आता जनता भाजीबाजार हटवण्यासाठी २० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. पर्यायी जागा दिल्याशिवाय आम्ही हटणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अतिक्रमण हटवण्यासाठी २० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. 

शुक्रवारच्या बैठकीत बेमुदत बंदचा निर्णय 
गुरुवारीअतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली व्यापाऱ्यांची दुकाने हटवण्यात आली. या ठिकाणी मनपाला मॉल बनवायचा आहे, असे सांगण्यात येत आहे. परंतु शुक्रवारी सकाळी व्यापारी, हमाल यांची संयुक्त बैठक झाली. सुरू असलेल्या प्रकाराला विरोध म्हणून भाजीबाजार बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. 

हजार व्यापारी, विक्रेते आणि हमालांचा प्रश्न 
बाजाराशीसंबंधीत सुमारे चार हजार व्यापारी, किरकोळ विक्रेते आणि हमाल यांनी बंदचा निर्धार केला आहे. विदर्भाच्या विविध भागामध्ये अकोल्यातून भाजी जाते. बाजार हटवण्यापूर्वी पर्यायी व्यवस्था काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीनंतर निळकंठ सूतगिरणीमध्ये बाजार नेण्यात येणार होता. परंतु पुढे काहीच झाले नाही. 
बातम्या आणखी आहेत...