आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शकुंतला रेल्वेने ऑटोला उडवले; दोन महिला ठार, पाच जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - रेल्वे रुळ ओलांडताना विना फाटकाच्या क्रॉसिंगवर शकुंतला रेल्वे गाडीने ऑटोला उडवले. ऑटोत बसलेल्या शेतमजूर महिलांपैकी दोघींचा जागीच मृत्यू झाला, तर पाच शेतमजूर गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास दर्यापूर ते कळाशी रेल्वे मार्गावर घडली. अपघातात ठार झालेल्या दोन महिला जखमी हे मूर्तिजापूर तालुक्यातील कानडी येथील आहेत. मंगळवारी सकाळी पावणे नऊ वाजताच्यादरम्यान निरंजन गुलाब गणवीर प्रज्ञा डोंगरे, सुनील पाटील, सावळाबाई पवार, नंदा जाधव, वर्षा गणवीर,अनिकेत चव्हाण, कविता जाधव, सुमन चव्हाण, विनोद सरदार हे एमएच ३० एफ १५३० क्रमांकाच्या ऑटोमधून शेतात कापूस वेचणीसाठी जात होते.
या वेळी दाट झाडीमुळे ऑटोचालकाला अचलपूरहून मूर्तिजापूरकडे जाणारी शकुंतला रेल्वे गाडी किती अंतरावर आहे, याचा अंदाज आला नाही. त्याने रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न केला असता भरधाव आलेल्या शकुंतलेने ऑटोला धडक दिली. या धडकेत ऑटोचा एक भाग काही अंतरावर घासत गेला ऑटो पलटी झाला. त्यात कविता रणजीत जाधव सुमन उकंडा चव्हाण या दोन महिलांचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले.
दूर अंतरावर उभे असलेले दोन जण धावून आले. त्यांनी जखमींना मूर्तिजापूर येथील रूग्णालयात दाखल केले. या प्रकरणी ऑटोचालक फुलसिंग राठोड यांच्या विरुद्ध दर्यापूर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या प्रकरणी ऑटो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अनेक ठिकाणी रेल्वे गेट नाहीत; झाडांमुळे येत नाही गाडीचा अंदाज
शकुंतला रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी रेल्वे गेट नाहीत. रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूला झाडे वाढली आहेत. त्यामुळे अशा मार्गावर रेल्वे किती अंतरावर आहे याचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. त्यामुळे अनेक दुर्घटना घडण्यासाठी रेल्वे गेट नसणे हे कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लाेकांना जीव गमवावा लागत अाहे.

अन् ऑटो अचानकच रेल्वे क्रांसिंगवरच पडला बंद
ऑटो हा अचानक रेल्वेच्या रुळावर बंद पडला. त्यामुळे त्यांच्याजवळ येत असलेली शकुंतला पाहून ऑटोचालक घाबरून गेला. ऑटो हा एकाच रुळावर असल्यामुळे दोघींना आपला जीव गमवावा लागला. ऑटोचालकाच्या अतिघाईमुळे अपघात घडल्याचा आरोप ऑटोमधील शेतमजुरांनी केला आहे.

अकोला रेल्वे पोलिसांची तत्परता
शकुंतला रेल्वे गाडीचा मार्ग हा अकोला रेल्वे पोलिसांच्या हद्दीत येते. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे होमडीवायएसपी इनामदार, अकोला रेल्वे पोलिस ठाण्याचे ठाणेदार एस. डी. वानखडे, पोलिस कॉन्स्टेबल किशोर पाटील, प्रसन्नजीत कुर्वे, अजय मनसकार, अमोल अवचार हे अकोल्यापासून ६० किलो मीटर अंतरावर असलेल्या घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
बातम्या आणखी आहेत...