आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रांगोळी, चित्रकला, निबंध, भाषणातून मतदारांची जागृती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मतदानाच्या प्रक्रियेत लोकसहभाग वाढविण्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार असून त्यांच्यासाठी रांगोळी, चित्रकला, निबंध भाषण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाच्या आखणीसाठी आज, मंगळवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत सदर स्पर्धांचा रितसर कार्यक्रम निश्चित करुन तो सर्व शाळा-महाविद्यालयांना पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. प्राथमिक माध्यमिक शिक्षणाधिकारी, निरंतर शिक्षणाधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील गुणवत्ता विकास कक्षाचे प्रभारी या बैठकीला उपस्थित होते. 

बैठकीतील निर्णयानुसार नवमतदार युवक-युवतींसह जुन्या मतदारांचा मतदानातील टक्का वाढवायचा आहे. त्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर निरनिराळ्या स्पर्धा घेतल्या जातील. नववी ते बारावीचे विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी असे दोन गट त्यासाठी तयार करण्यात आले आहेत. या दोन्ही गटांसाठी ‘मी राष्ट्राचा भावी मतदार’ आणि ‘जागृत मतदार-बळकट लोकशाही’या विषयावर निबंध स्पर्धा घेतली जाईल. याशिवाय १० बाय १२ इंचाच्या ड्राईंग शिटवर घोषवाक्य (२० शब्दमर्यादेपर्यंत) तर १८ बाय २४ इंचाच्या ड्राईंग शिटवर निवडणूक/लोकशाही विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे. यासोबतच ‘लोकशाही’ विषयावर रांगोळी स्पर्धा घेण्याचेही या बैठकीत ठरवण्यात आले. 

या सर्व स्पर्धा तालुका आणि जिल्हा अशा दोन्ही शहरांच्या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत. याशिवाय मोठ्या गावांमधिल शाळांनी पुढाकार घेऊनही या उपक्रमांचे आयोजन करावे आणि त्यातील विजेत्यांना राष्ट्रीय मतदार दिनी अर्थात २५ जानेवारीला पुरस्कृत करावे, असेही आजच्या सभेत ठरविण्यात आले. प्रारंभी जिल्हाधिकारी महोदयांनी निवडणूक यंत्रणेत युवकांचा सहभाग कसा वाढेल, यावर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी पुरक असा कार्यक्रम सुचविला. 

२५ला राष्ट्रीय मतदार दिन : आगामी२५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन आहे. या कार्यक्रमाचे स्वरुपही यावेळी ठरविण्यात आले. विविध स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कृत करण्याचा कार्यक्रम यादिवशी घेतला जाणार आहे. या कार्यक्रमाचे तपशिल यथावकाश जारी केले जातील, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.