आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पातूरमधील विश्वधाम टेकडीवर आता सर्वधर्मीयांची धार्मिक स्थळे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पातूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवाश्रमचे संस्थापक अध्यक्ष तथा अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक तिमांडे महाराज यांच्या नेतृत्वात येथील विश्वधाम टेकडीवर सर्व जाती धर्मातील संत महात्म्यांची धार्मिक स्थळे साकारण्यात येत आहेत.

रेणुका माता टेकडीच्या मागील बाजूस असलेल्या या टेकडीची जागा निवृत्त मुख्याध्यापक जयराम गाडगे यांनी पातूर सेवाश्रमला दिल्यानंतर स्व. गुरुमाउली लीलाबाई उगले तिमांडे महाराज यांनी या ठिकाणी रस्ते, पाणी वाहून नेणाऱ्या नाल्या, प्रार्थना मंदिर, ध्यान योग, मंदिरे यांची निर्मिती केली, तर अर्चना खांदे या शिक्षिकेनी गुरुकुंज मोझरी येथील प्रसिद्ध रामकृष्णहरी मंदिराची प्रतिकृती साकारण्यासाठी एक वर्षाचे वेतन अर्पण केले होते. त्यानंतर येथे रामकृष्ण हरी मंदिराची स्थापना करण्यात आली. राष्ट्रसंतांच्या तत्त्वप्रणालीनुसार या विश्वधाम टेकडीवर तथागत गौतम बुद्ध, संत सेना महाराज, संत गोरा कुंभार, संत रविदास, संत जनाबाई, संत कबीर, सावता माळी अशा सर्व संत महात्म्यांची मंदिरे उभारली जात आहेत. या सर्व मंदिरांच्या निर्मितीसाठी विविध जातीधर्माच्या संघटना पुढे येत आहेत. राष्ट्रसंतांच्या साहित्याचा प्रचार होण्यासाठी टेकडीवर प्रेसची निर्मिती करण्याचे नियोजन केले आहे. टेकडीवर पिण्याच्या पाण्यासाठी बोअरिंग केले असता अवघ्या १३० फुटांवर पाणी लागले आहे. सर्व जातीधर्मांचा समावेश असलेले शहरामधील हे एकमेव ठिकाण आहे. येथे न्हावी समाज संघटनेकडून लीलाबाईंच्या समाधीस्थळाजवळ संत सेना महाराजांचे मंदिर उभारण्यात आले, तर संत गोरा कुंभार महाराजांच्या मंदिरासाठी कुंभार समाजबांधव पुढे येत आहेत.
या विश्वधाम टेकडीच्या महाद्वारावरील सर्वधमियांसाठी मंदिर खुले असल्याच्या ओळी पातूर ते बाळापूर महामार्गावरून जाणाऱ्यांना आपला द्वेषभाव विसरून एकत्र येण्याचा संदेश देत आहेत. सर्व जाती पंथाच्या लोकांनी एका व्यासपीठावर येऊन समाजात शांतता निर्माण करावी, या उद्देशानेच सर्व धर्मातील संत महात्म्यांची धार्मिक स्थळांची निर्मिती करण्यात येत असल्याचे मत तिमांडे महाराज यांनी व्यक्त केले.

४० वर्षांपासून अविरत सामुदायिक प्रार्थना
स्व.लीलाबाई आणि तिमांडे महाराज यांनी या ठिकाणी तुकडोजी महाराज सेवाधर्माची स्थापना केली. येथे ४० वर्षांपासून अविरत सामुदायिक प्रार्थना राष्ट्रसंतांच्या मानवता धर्माचा प्रचार केला जात आहे.

गोपालकाल्यातही सर्वधर्मसमभाव
विश्वधामटेकडीवर गोपालकाला करताना सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र आणून समानतेचा गोपालकाला सामूहिक भोजन केले जाते. त्यामुळे सर्वधर्मीयांमध्ये या ठिकाणाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे.