आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Restrictions On Heavy Vehicles In The City, "transport" To Have Discipline

शहरात जड वाहनांवर प्रतिबंध, "वाहतुकी'ला लागतेय शिस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - बेशिस्त वाहतुकीमुळे शहरात वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यातच शहरात जड वाहतूक होत असल्यामुळे अनेक वेळा अपघात होतात. त्याला आळा घालण्यात येऊन वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी "दिव्य मराठी'ने वारंवार वृत्त प्रकाशित केले. त्यावर जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांच्या नेतृत्वात वाहतूक शाखेने शहरातील सकाळी ते रात्री १२ वाजेपर्यंत जड वाहतुकीवर बंदी आणली आहे. त्यामुळे वाहतुकीत काही प्रमाणात का होईना शिस्त येणार असून, अपघात कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रस्ते तेच मात्र दररोज शहरातील रस्त्यावर नवीन वाहनांची भर पडत आहे. त्यामुळे साहजिकच रस्त्यावर वाहनांची गर्दी दिसून येते. वाहनांच्या संख्येमुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे. कधी अपघात होईल हे सांगता येत नाही. शहरात एकेरी वाहतूक, पार्किंग स्थळे, टोइंग पथक, शहरातील जड वाहतूक बंद करणे आदी विषयांवर "दिव्य मराठी'ने प्रकाश टाकला होता. त्यावर जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा आणि वाहतूक शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक प्रकाश सावकार यांनी शहरातील मार्गांचे सर्वेक्षण केले. त्यात त्यांना शहरातून मोठ्या प्रमाणात जड वाहने ये-जा करत असल्याचेे दिसून आले. अशा वाहनांना पायबंद घालण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर शहरातून जड वाहतुकीला आळा बसावा म्हणून प्रमुख बाजारपेठ असलेल्या भागांमध्ये सकाळी ते रात्री १२ वाजेपर्यंत जड वाहनांवर प्रतिबंध आणला आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणीसाठी वाहतूक शाखेच्या मदतीला पोलिस मुख्यालयातील जवान आणि पोलिस प्रशिक्षण केंद्रातील पोलिस दिमतीला लावले आहेत.

वाहनांची ये-जा झाली बंद
शालिनीटॉकीज ते अकोट स्टँड चौकापर्यंत, दगडीपूल ते माळीपुरा चौक, अकोट स्टँड चौकाकडून अग्रसेन चौकाकडे येणारा रस्ता, टॉवर चौक ते फतेह चौकाकडे जाणारा मार्ग, दामले चौक ते फतेह अली चौककडे जाणारा रस्ता, बाळापूर नाक्याकडून येणारा मार्ग, वाशीम बायपासकडून शहरात येणारा मार्ग, डाबकी रोड रेल्वे फाटकाकडून शहरात येणाऱ्या मार्गावरील वाहतूक प्रायोगिक तत्त्वावर का होईना, बंद झाली आहे.

सध्या प्रायोगिक तत्त्वावर जड वाहतुकीवर सकाळी ते रात्री १२ वाजेपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. या महिनाभराच्या काळात नागरिकांना यामध्ये काही बदल सुचवायचे असतील किंवा त्यांच्या हरकती असतील तर त्या आमच्याकडे पाठवाव्या. त्यानुसार बदल करण्यात येईल.'' प्रकाशसावकार, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा

यांना दिलासा
जडवाहतूक बंद केलेल्या मार्गावर मुख्य बाजारपेठ आहे. तसेच चार चित्रपटगृहे, पाच धार्मिक स्थळे, १० बँका, शाळा दवाखाने आहेत. त्यामुळे या मार्गावर मोठी वर्दळ असते. जड वाहतुकीमुळे अपघाताची मालिका सुरूच राहत असल्यामुळे आता या मार्गावरील आबालवृद्धांना दिलासा मिळाला.

जागोजागी बॅरिकेट्स
शहरातअवजड वाहनांनी प्रवेश करू नये म्हणून वाहतूक शाखेने जागोजागी बॅरिकेट्स लावले आहेत. त्यामुळे शहरात ट्रक प्रवेश करू शकत नाहीत. तसेच प्रत्येक चौकावर वाहतूक पोलिसांसोबतच मुख्यालयातील पोलिस वाहतूक नियंत्रित करताना दिसून येत आहेत.
अकोला शहरात जड वाहनांवर बंदी घातली आहे. शहरातून जड वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे.