आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ता रुंदीकरणासाठी सिग्नलचे काम थांबले, अपघातामध्ये होतेय वाढ, रहदारी विस्कळीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - तीनवर्षां पूर्वी मिळालेल्या निधीतून प्रस्तावित केलेले सिग्नलचे काम आता भविष्यात होणाऱ्या रस्ता रुंदीकरणामुळे थांबवण्यात आले आहे. जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाच्या पाच चौकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे नेहरू पार्क चौकात सतत होणाऱ्या अपघातांकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
सन २०१३ मध्ये राज्य शासनाने दिलेल्या २६ कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील महत्त्वाच्या १३ चौकांत सिग्नल व्यवस्था उभारण्याचा निर्णय तत्कालीन आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी महासभेकडून मंजूर करून घेतला होता. ऑगस्ट २०१४ ला महासभेने मंजूर केलेल्या या प्रस्तावाची अंमलबजावणी प्रत्यक्षात ऑगस्ट २०१५ नंतर टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली. दरम्यान, महासभेने प्रस्ताव मंजूर केल्यानंतर अशोक वाटिका चौक, मदनलाल धिंग्रा चौक, टॉवर चौक या तीन चौकांत आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधीतून सिग्नल व्यवस्था सुरू करण्यात आली. त्यामुळे प्रशासनाने पर्यायी तीन चौकांत ही व्यवस्था उभारण्याचा निर्णय घेतला. जे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहेत, त्या रस्त्यातील चौकात सिग्नल व्यवस्था उभारण्यासाठी बांधकाम विभागाची परवानगी घ्यावी लागते.

ही परवानगी घेण्यासाठी विलंब झाल्याने काही चौकांतील सिग्नलचे काम रखडले होते. बांधकाम विभागाने एनओसी दिल्यानंतरही सिग्नल व्यवस्था उभारण्याच्या कामाला गती आली नाही. जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील नेहरू पार्क चौक, हुतात्मा स्मारक चौक, जेल चौक, पत्रकार चौक आणि वाशीम बायपास चौक या महत्त्वपूर्ण पाच महत्त्वपूर्ण चौकांचा समावेश आहे. या मार्गाचे रुंदीकरण केले जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या मार्गाच्या रुंदीकरणाची घोषणादेखील केली आहे.

परंतु, प्रत्यक्षात काम सुरू होण्याच्या अनुषंगाने कोणतीही कार्यवाही झालेली नाही. परंतु रस्त्याचे रुंदीकरण होत असल्याने आणि रस्ता रुंदीकरणात पुन्हा सिग्नल व्यवस्था हलवावी लागणार असल्याने या महत्त्वपूर्ण चौकातील सिग्नलचे काम थांबवण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरील चौकात रहदारी विस्कळीत झाली आहे. तसेच अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. शहरातील सिग्नलचे काम थांबल्यामुळे वाहतूक विस्कळीत हाेण्याचे प्रकार चाैकांमध्ये घडत अाहेत. अनेक ठिकाणी किरकाेळ अपघातही त्यामुळे घडत अाहेत.

नेहरू पार्क चौकात सतत अपघात
या पाच चौकांपैकी नेहरू पार्क चौकात सतत अपघात होत असतात. काही दिवसांपूर्वीच एका महिलेला अपघातात जीव गमवावा लागला होता, तर इतर चौकांतही लहान-सहान अपघात होतात. त्यामुळे या चौकांमध्ये त्वरित सिग्नल व्यवस्था सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गेल्या सहा महिन्यांत किरकाेळ अपघाताच्या घटनाही शहरातील चाैकांमध्ये पाहायला मिळत अाहे. त्यामुळे सिग्नल लवकर सुरू हाेण्याची गरज अाहे.

या चौकात केवळ सिग्नल उभारले
सिव्हिल लाइन चौक, रतनलाल प्लॉट चौक, मुख्य पोस्ट ऑफिस चौक, अग्रसेन चौक आदी चौकांत सिग्नल व्यवस्था उभारली आहे. परंतु, प्रत्यक्ष सिग्नल व्यवस्था सुरू झालेली नाही.
बातम्या आणखी आहेत...