आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा मुख्य रस्त्यांसह ३० रस्त्यांची होणार कामे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरातील सहा मुख्य रस्त्यांसह एकूण ३० रस्त्यांच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. या आठवड्यात या रस्त्यांच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. यात काही कामे काँक्रिटीकरणाची, तर काही डांबरीकरणाची कामे आहेत. एकीकडे १५ कोटी रुपयांच्या निधीतील कामांना प्रारंभ झाला असताना, येत्या काही महिन्यांत २० कोटी रुपयांच्या निधीतील या कामांना प्रारंभ होणार असल्याने मे महिन्यापर्यंत शहरातील रस्ते चकचकीत होण्याची शक्यता आहे.
आमदार गोवर्धन शर्मा यांनी राज्य शासनाकडे शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २० कोटी रुपयांचा निधी मागितला होता. हा निधी राज्य शासनाने मंजूर केला. या निधीतून रस्त्यांच्या दुरुस्तीसह उमरी स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण केले जाणार आहे. या निधीतून सुचवण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, विभागीय आयुक्ताकडूनही या कामांना मंजुरी मिळाल्याने रस्ता दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. या निधीतून सहा मुख्य रस्त्यांसह विविध प्रभागांतील अंतर्गत रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. प्रशासकीय मंजुरीचे सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यामुळे आता प्रत्यक्ष निविदा प्रक्रियाची कामे सुरू आहेत. या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात या कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. ही सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केली जाणार आहेत. त्यामुळे येत्या काही महिन्यांत ३० रस्त्यांच्या कामांना प्रारंभ होईल.

तूर्तास १५ कोटी रुपयांच्या निधीतून ११ रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे पूर्ण झाली असून, चार रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. परिणामी, मे २०१६ पर्यंत शहरातील खड्डेमय रस्त्यांपासून नागरिकांची सुटका होण्याची शक्यता आहे.

या प्रभागातील रस्त्यांच्या कामाचा समावेश
प्रभाग क्रमांक ५, ६, १६, १७, १८, १९ मधील अंतर्गत विविध रस्त्यांचे डांबरीकरण तसेच काँक्रिटीकरण, तर अयोध्यानगर, आयसीआयसीआय बँक ते ओझोन हॉस्पिटल, पावसाळे ले-आऊट ते नागे ले-आऊट या रस्त्यांसह २४ रस्त्यांच्या कामाचा समावेश आहे.

स्मशान भूमीसाठी ३५ लाख
३० रस्त्यांसह उमरी स्मशानभूमीच्या दुरुस्ती सौंदर्यीकरणासाठी या निधीतून ३५ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांनी केलेली मागणी यानिमित्ताने पूर्ण होणार आहे.

दीड मीटरचे डिव्हायडर
सहापैकीचार रस्त्यांवर दीड मीटर रुंदीचे डिव्हायडर बांधले जाणार असून, दीड मीटरचा फुटपाथ रस्त्याच्या दोन्ही बाजूने बांधला जाणार आहे. त्याच बरोबर भूमिगत गटार योजनेतील पाइप टाकण्यासाठी जागाही सोडली जाणार आहे. त्यामुळे रस्ते प्रशस्त रुंद असतील.

रस्ते होणार रुंद
१५ कोटी रुपयांचे काम करताना रस्त्यांची रुंदी वाढवण्यात आली आहे. त्याच धर्तीवर मुख्य रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. काही रस्ते १८ मीटरचे, तर काही रस्ते १२ ते १४ मीटरचे राहणार आहेत. यासाठी विद्युत खांब हटवणार अाहे. दोन्ही बाजूला फुटपाथही बांधले जातील.

या सहा मुख्य रस्त्यांचा समावेश
शहीद स्मारक चौक ते संत तुकाराम चौक, जुना इन्कम टॅक्स चौक ते पारसकर मोटर्स ते जुना राष्ट्रीय महामार्ग, जिल्हाधिकारी कार्यालय ते महापालिका चौक, अशोक वाटिका ते सरकारी बगिचा, कस्तुरबा हॉस्पिटल ते श्रीवास्तव चौक, रुंगटा हाऊस (महापालिका जवळ) ते चित्रा टॉकीज या सहा मुख्य रस्त्यांचा समावेश अाहे. यात अशोक वाटिका ते सरकारी बगिचा या रस्त्याच्या कामात या निधीसह १५ कोटी रुपयांच्या निधीतूनही काम केले जाणार आहे.

अशा आहेत कामाच्या अटी शर्ती
प्राप्त अनुदानापेक्षा अधिक निधी लागल्यास तो महापालिकेला टाकावा लागेल. दहा लाख रुपयांपेक्षा जास्त कामासाठी ई-निविदा प्रक्रिया राबवावी लागेल. कामाच्या पूर्णत्वाचा अहवाल उपयोगिता प्रमाणपत्रे एजी नागपूर तसेच शासनास जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याची जबाबदारी आयुक्तांची राहील, तर मंजूर कामावर खर्च झाला किंवा नाही, ही जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची राहणार आहे. नियमानुसार तिसऱ्या सक्षम प्राधिकरणाकडून तपासणी करून घेतल्यानंतरच कामाचे देयक प्रदान करावे लागणार आहे.