आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोतया पोलिसांसह लुटारुंची टोळी पकडली, एसपींच्या विशेष पथकाची कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - कमी भावात सोने विकतो, असे म्हणून खरेदीदाराला पैसे घेऊन बोलवायचे. खरेदीदार पैसे घेऊन आल्यानंतर दोघांनी पैसे घ्यायचे आणि तेवढ्यात त्यांच्या टोळीतील दोघे पोलिस बनून यायचे आणि खरेदीदाराला पिटाळून लावायचे. अशा लुटारूंच्या चार जणांच्या टोळीला सोमवारी पहाटे पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने सापळा लावून पकडले.

 

पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, ही कारवाई करण्यात आली. चार दिवसांपासून पोलिसांचे पथक लुटारूंच्या मागावर होते. पथकातील एका पोलिस कर्मचाऱ्याने ग्राहक बनून या टोळीचा म्होरक्या महादेव ज्ञानदेव मुर्तडकर (३३ रा. निहिदा हल्ली मुक्काम पिंजर) याला फोन केला आपण भुसावळ येथून बोलत असल्याचे सांगून सोने पाहिजे असल्याचे म्हटले. त्यावर महादेव याने १३ हजार रुपये तोळा या भावाने अडीच किलो सोने अडीच लाख रुपयांमध्ये देण्याचे कबूल केले. त्यानुसार पोलिसांनी रेडवा येथे रविवारी सापळा रचला. सुरुवातीला महादेव याने ग्राहक बनलेल्या पोलिसाला २० लाख रुपये घेऊन पिंजरला बोलावले नंतर त्याने टाळाटाळ करीत भेटण्याचे ठिकाण बदलवले. पुन्हा ग्राहक बनलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने सतत फोन करून सोने पाहिजे असल्याचे म्हटले. त्यानंतर महादेव याने कारंजा मूर्तिजापूर टी पाँईटजवळ बोलावले या ठिकाणी माचीसच्या डबीमध्ये असलेल्या सोन्याचे तीन शिक्के त्याचाच सोबती गजानन पांडुरंग बुटे रा. पिंजर याने दाखवले. असेच सर्व शिक्के असल्याची खात्री त्याने दिली. लगेच दोन तोतया पोलिस कर्मचारी मंगेश काशीराम राठोड राजू अंबू राठोड (३६, रा. वडगाव) हे दोघे आले पोलिस असल्याचे सांगून धाकदपटशा करू लागले. लगेच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडून तीन दुचाकी चार चाकू पोलिसांनी जप्त केले आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

 

आणखी एक टोळी सक्रिय : सोने दाखवायचे पैसे घेऊन बोलवायचे, ग्राहकांना लुटायचे अशी टोळी १० वर्षापासून वाशीम जिल्ह्यात कार्यरत आहे. वाशीम, अकोला या जिल्ह्यात या टोळीने अनेकांना लुटले आहे. याच टोळीतून बाहेर पडून ही दुसरी टोळी तयार झाल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे.

 

माचिसच्या डबीत दाखवायचे सोन्याचे शिक्के : माचीसच्या डबीत सोन्याचे तीन शिक्के,त्यावर माचीसच्या काड्या लुटारू ग्राहकांना दाखवायचे. सोने ओरिजनल असल्याने ग्राहकांची खात्री पटायची पैसे मोजून घेतल्यानंतर तोतया पोलिस छापा टाकायचे,पळापळ व्हायची, अशी लुटारूंची मोडस ऑपरेंटी आहे.

 

तपासातून अनेक खुलासे समोर येण्याची शक्यता
चौघांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरु आहे. आरोपींनी कबुली दिली असली तरी त्यांनी यापूर्वी कुणाला लुटले. याबाबत खुलासे होण्याची शक्यता आहे. -हर्षराज अळसपुरे, सहायक पोलिस निरीक्षक

बातम्या आणखी आहेत...